फातिमा शेख ही प्रथम मुसलमान शिक्षिका म्हणजे पुरो(अधो)गाम्यांनी निर्मिलेले खोटे कथानक !

‘फातिमा शेख मुसलमान समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले यांच्यासह ती शाळेत शिकवत होती’, हे खोटे कथानक वर्षानुवर्षे आपल्या माथी मारले गेले अन् लोकांनीही या कथानकाला तथ्य समजले. दिलीप मंडल या आंबेडकरी नेत्याने ‘एक्स’वर फातिमा नावाचे काल्पनिक पात्र ‘आपण निर्माण केले’, हे घोषित केले अन् खळबळ उडाली. म्हणून अशा प्रकारचे अनैतिहासिक आणि समाजात द्वेष पसरवणारे दावे खोडून काढले पाहिजेत, अन्यथा भविष्यात ही फातिमा शेख (?) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य अन् व्यक्तीमत्त्वाला झाकोळून समाज कलुषित करण्याचा प्रयत्न करत राहील.

‘फातिमा शेख (डावीकडील) मुसलमान समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले (उजवीकडील) यांच्यासह ती शाळेत शिकवत होती’, हे खोटे कथानक !

१. दिलीप मंडल यांचा खरा चेहरा

श्री. तुषार दामगुडे

काही दिवसांपूर्वी दिलीप मंडल यांनी ‘एक्स’वर एक माफीनामा प्रकाशित केला. त्यात त्यांनी ‘गेल्या काही काळापासून फातिमा शेख (?) नावाचे काल्पनिक पात्र मी निर्माण केले असून वर्ष २००६ पासून वेगवेगळ्या माध्यमांतून मी ते प्रसिद्धीस आणले आहे; परंतु असे कोणतेही पात्र फुले दांपत्याच्या जीवनात नसून या सगळ्या प्रकाराविषयी मला माफ (क्षमा) करावे’, असा आशय व्यक्त केला आहे. दिलीप मंडल यांच्या या खुलाशाने तथाकथित पुरोगामी वर्तुळात एकच खळबळ उडाली, तसेच ‘बीबीसी’, ‘द वायर’ यांसारख्या वृत्तसंस्थांना असे खोटे लेख प्रकाशित केल्याकारणाने तोंड दाखवायला जागा उरली नाही. अर्थात् दिलीप मंडल यांसारखे सोयीस्कर राजकारणी, ‘बीबीसी’, ‘द वायर’सारख्या साम्यवादी वृत्तसंस्था यापुढे सुधारतील, अशी आशा आपण बाळगायचे कारण नाही; कारण मग त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजनच उरणार नाही. ते एक असो…

२. कथित पुरोगाम्यांनी फातिमा शेख नावाचे खोटे पात्र उभे करून तिच्या नावे पुरस्कार आणि अन्य गोष्टी चालू करणे

आता आपण फातिमाविषयी थोडक्यात माहिती घेऊ. १० ऑक्टोबर १८५६ या दिवशी सावित्रीबाई फुले या आजारी असतांना त्यांनी त्याविषयी जोतिबा फुले यांना कळवतांना लिहिलेल्या एका पत्रात ‘फातिमास त्रास पडत असेल; पण ती कुरकुर करणार नाही’, अशी एक ओळ लिहिली आहे. या एका ओळीचा धागा पकडून राईचा पर्वत करण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांना केवळ एक ओळही पुरेशी आहे. या पत्रात ज्या फातिमाचा उल्लेख आहे, ती फातिमा कोण ?, ती यहुदी, मुसलमान, ख्रिस्ती यांपैकी कोणत्या धर्मातील आहे ? त्या नेमके काय काम करतात ? त्या शिकल्या आहेत कि नाहीत ?, त्या कुठून आल्या ?, किती काळ होत्या ?, त्यांनी किती मुसलमान मुलींना शिकण्यासाठी फुलेंच्या शाळेत आणले ?, तिचे आडनाव शेख आहे, असे काही म्हणजे काही कळत नाही.

असे असले, तरी तथाकथित पुरोगाम्यांनी या एका ओळीवरून ‘फातिमा’ हिचे आडनाव ‘शेख’ असून ती मुसलमान समाजातील पहिली स्त्री शिक्षिका असून सावित्रीबाई फुले यांच्यासह शाळेत शिकवत होती. फातिमा शेख मनुवाद्यांच्या विरोधात लढणारी योद्धा होती. फातिमा शेखचे अस्सल ‘छायाचित्र’ वगैरे अनैतिहासिक कथा रचली, असे स्पष्ट दिसते. या खोट्या कथांचा वापर करून ‘विकिपीडिया’वर ‘पेज’ सिद्ध केले गेले आणि तिथे काही संदर्भ पुरावे म्हणून ठेवले. या संदर्भाचा वापर करून ‘गूगल’वर ‘डुडल’ बनवले (चित्र ठेवणे), तमिळनाडू सरकारने फातिमा शेखच्या नावे पुरस्कार चालू केला, भिडे वाड्यावर स्थलदर्शक म्हणून लावलेल्या पाटीवर फातिमा शेखचा उल्लेख आला, सावित्रीबाईंच्या प्रतिमेत फातिमा शेखचा समावेश झाला, पुणे विद्यापीठ अन् हिंदू बनारस विद्यापीठ येथे तिच्या विषयावर ‘डॉक्टरेट’ (विद्यावचस्पति) पदवी दिली गेली, कोंढव्यात तिच्या नावाने नगर उभे राहिले; पण हे सगळे करतांना ज्यांचे दावे केले जात आहेत, त्याचे मूळ पुरावे कुठे आहेत ?

३. फातिमा शेख नावाचे संदर्भ कोणत्याही साहित्यात आढळून न येणे

फातिमा शेख (?) नावाचे पात्र उभे करण्यासाठी तथाकथित पुरोगामी समग्र फुले साहित्याचा संदर्भ देतात. म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य महाराष्ट्र सरकारने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केले आहे अन् ते इंटरनेटवरही सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे. संपूर्ण फुले साहित्यात तेवढा ‘फातिमास त्रास पडत असेल; पण ती कुरकुर करणार नाही’, हा एक ओळीचा उल्लेख सोडला, तर कुठेही, काहीही आढळत नाही. (फुले साहित्याचे अभ्यासू तज्ञ स.गं.मालशे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मा.गो. माळी चरित्रातील पत्रे, छायाचित्रे यांवर अभ्यासू आक्षेप घेतले आहेत. (संदर्भ : तारतम्य पुस्तक))

फुले साहित्याखेरीज फातिमाचा दावा करण्यासाठी ज्या पुस्तकातील उल्लेखांचे संदर्भ दिले जातात, ती सगळी पुस्तके अगदी अलीकडची असून यातील कुठल्याही पुस्तकात मा.गो. माळी यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही संदर्भाचा उल्लेख नाही. फुले साहित्याचे अभ्यासक असलेले प्रा. हरि नरके आणि साम्यवादी विचारसरणीचे सूरज ऐंगडे यांनीही फातिमा संदर्भात आक्षेप घेऊन पुराव्यांची मागणी केली आहे, हे लक्षात घ्यावे लागते.

जोतिबा फुले यांनी शाळा चालू करतांना ब्रिटीश सरकारशी जे व्यवहार केले, ते उपलब्ध असल्याने आपल्याला तत्कालीन बरीच माहिती मिळते. त्या माहितीनुसार ही शाळा चालू ठेवण्यासाठी जोतिबा फुले, केशव जोशी, बापू मांडे, अण्णा सहस्रबुद्धे, विष्णु भिडे, जगन्नाथ सदासीवजी आदी सहयोगी असल्याचे समजते. शाळेचा व्यय भागवण्यासाठी अनेक ब्रिटीश अधिकारी आणि स्थानिक व्यक्तींमध्ये चिपळूणकर-मेहेंदळे-परांजपे आदी अनेक व्यक्तींनी रोख रक्कम दिल्याचे समजते. त्या शाळेत शिकवले जाणारे विषय, तसेच कोणत्या इयत्तेसाठी कोण शिक्षक आहेत, त्याचाही उल्लेख आढळतो. त्यातील एक शिक्षक म्हणून नारायण शास्त्री टोकेकर आणि दुसरे शिक्षक म्हणून विनायक पंत यांचा उल्लेख आढळतो; पण हे सगळे नाकारून फातिमा नामक तथाकथित पात्र नेमके कशासाठी सिद्ध करायचे, हा प्रश्न निर्माण होतो.

४. ब्राह्मण जात आणि हिंदु धर्म यांच्याविषयी गरळओक करण्यासाठी…

काही सामान्य व्यक्तींनी व्यक्तीगत लाभासाठी किंवा अज्ञानातून असे केले, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते; पण कबीर कला मंच, सचिन माळी, शीतल साठे यांच्यासारखे शहरी नक्षलवादी संशयित लोक जेव्हा एखादा विषय पुढे आणतात, तेव्हा आधीच सावध व्हावे लागते; कारण काही चुकीच्या गोष्टी अगदीच निरुपद्रवी दिसत आहेत म्हणून प्रारंभीला दुर्लक्षित केल्यानंतर काही वर्षांनी त्याची वाईट फळे चाखावी लागतात, हे आपल्याला आता अनुभवाने ठाऊक आहे. या फातिमा शेख (?)च्या आडून प्रारंभीला ब्राह्मण जातीसंदर्भात समाजात विष कालवायचे आणि त्यानंतर हिंदु धर्माविषयी गरळओक करायची, हा शहरी नक्षलवादी डाव सहज ओळखता येतो.

त्यामुळे या तथाकथित फातिमा शेख (?) आणि तत्सम प्रकारांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी राजकीय मंडळी किंवा शहरी नक्षलवादी काय म्हणतात, याकडे लक्ष न देता संधी मिळेल, तिथे अशा प्रकारची अनैतिहासिक अन् समाजात द्वेष पसरवणारे दावे खोडून काढले पाहिजेत. त्यासाठी आपण स्वतः चौकस राहून संबंधितांना संदर्भ-पुरावे मागण्याचे धाडस दाखवले पाहिजे, अन्यथा भविष्यात ही फातिमा शेख (?) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अन् व्यक्तीमत्त्व यांना झाकोळत काही तरी भलतेच रूप धारण करून कलहाचे कारण बनल्याखेरीज रहाणार नाही.

– श्री. तुषार दामगुडे, पुणे.

(साभार : श्री. तुषार दामगुडे यांचे फेसबुक आणि साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)

संपादकीय भूमिका

कथित पुरो(अधो)गाम्यांकडून समाजात द्वेष पसरवण्यासाठी केले जाणारे दावे हिंदूंनी धाडसाने खोडून काढले पाहिजेत !