‘सनातन धर्मात सूर्याची नित्य-उपासना करण्यास सांगितली आहे. त्यानुसार ‘सूर्याला अर्घ्य कसे द्यावे ?’, यासंदर्भातील विश्लेषण पुढे दिले आहे.
१. सूर्याला अर्घ्य कोण देऊ शकतो ?
ये चार्घ्यं सम्प्रयच्छन्ति सूर्याय नियतेन्द्रियाः ।
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः स्त्रियः शूद्राश्च संयताः ।।
– ब्रह्मपुराण, अध्याय २८, श्लोक ३७
अर्थ : इंद्रियसंयमन करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्रिया सूर्याला अर्घ्य समर्पित करतात.
म्हणजे इंद्रियसंयमन (साधना) करणार्या प्रत्येकाला सूर्याला अर्घ्य देण्याचा अधिकार आहे.
१ अ. स्त्रियांसाठीचा नियम : स्त्रीने मासिक पाळीच्या ५ व्या दिवसापासून सूर्याला अर्घ्य द्यावे.’
(साभार – ‘सनातन धर्म’ यू ट्यूब वाहिनी)

२. अर्घ्य देण्याचे स्थान ‘जलेष्वर्घ्यं प्रदातव्यं जलाभावे शुचिस्थले ।
सम्प्रोक्ष्य वारिणा सम्यक्ततोऽर्घ्यं तु प्रदापयेत् ।।
अर्थ : अर्घ्य पाण्यामध्ये (जलाशयामध्ये) द्यावे. पाणी नसल्यास पवित्र ठिकाणी द्यावे. (तेथे) पाण्याने प्रोक्षण करून योग्य रितीने अर्घ्य द्यावे.
सूर्याला अर्घ्य एखाद्या जलाशयाच्या जवळ, एखाद्या नदीच्या किनारी, मंदिरात किंवा घराच्या छतावर द्यावे. घराची आगाशी किंवा घरात तांबे, कांस्य किंवा अन्य धातू यांच्या पात्रात सूर्याला अर्घ्य देऊ शकतो.
३. अर्घ्य कधी द्यावे ?
प्रातःकाळी सूर्याेदयानंतर २ घंट्यांपर्यंत सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याेदयानंतर २ घंट्यांनंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास १ प्रायश्चित्त अर्घ्य द्यायचे असते. अशा वेळी आरंभी १ प्रायश्चित्त अर्घ्य देऊन सूर्याकडे क्षमायाचना करून त्यानंतर सूर्याला ३ वेळा अर्घ्य प्रदान करावे.
४. अर्घ्य देण्यासाठी लागणारी सामुग्री
‘गन्धाक्षतपुष्पयुक्तानि त्रीण्यर्घाणि दद्यात् ।’, म्हणजे ‘गंध, अक्षता आणि पुष्प यांसहित तीन अर्घ्ये द्यावीत.’
५. अर्घ्य देण्याची कृती
अ. पूर्व दिशेला तोंड करून सूर्याच्या दिशेने अर्घ्य द्यावे. घरातून सूर्य दिसत नसल्यास किंवा ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसत नसल्यासही पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावे.
आ. घरात सूर्याला अर्घ्य देण्यासाठी विशिष्ट स्थान नसल्यास घरात पूजा करतो, त्या ठिकाणी उभे राहून भूमीवर तांबे किंवा कांस्य (ब्रॉन्झ) या धातूचे पात्र ठेवून त्यात अर्घ्य द्यावे.
इ. ओंजळीत पाणी घेऊन किंवा हातांत पाणी असलेले धातूचे पात्र घेऊन नम्रपणे, म्हणजे थोडे खाली वाकून हातांतील पाणी खाली ठेवलेल्या धातूच्या पात्रात सोडावे. पाणी सोडतांना पुढील मंत्र म्हणावा.
ई. ज्यांना संध्यावंदनाचा अधिकार आहे किंवा ज्यांना गुरूंकडून गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली आहे, त्यांनी गायत्री मंत्र म्हणावा. या व्यतिरिक्त इतरांनी पुढील मंत्र म्हणावा.
ॐ एही सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगत्पते ।
अनुकम्पय मां भक्त्या गृहाणार्घ्यं दिवाकर ।।
अर्थ : हे सूर्या, हे सहस्रांशो, हे तेजोराशे, हे जगत्पते, माझ्यावर दया कर. हे दिवाकरा, भक्तीभावाने दिलेल्या या अर्घ्याचा स्वीकार कर.
स्त्रियांनी अर्घ्य देतांना ‘ॐ घृणि सूर्याय नमः ।’ (याचा अर्थ तेजस्वी सूर्याला नमस्कार असो.), हा मंत्र म्हणावा.
उ. त्यानंतर स्वतःभोवती गोल फिरून प्रदक्षिणा घालावी. असे एकूण ३ वेळा सूर्याला अर्घ्य प्रदान करावे.
ऊ. अर्घ्य दिल्यानंतर पात्रातील पाणी तुळस सोडून अन्य रोपांना घालू शकतो. घराची आगाशी किंवा छत यांवरून अर्घ्य देतांना खाली असलेल्या तुळशीच्या रोपावर अर्घ्याचे पाणी पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
ए. शास्त्रानुसार देवतांचे पूजन केल्यावर प्रदक्षिणा अनिवार्य असते. देवाभोवती फिरून प्रदक्षिणा घालणे शक्य नसल्यास स्वतःभोवती गोल फिरून ३ किंवा ७ प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर सूर्याला साष्टांग नमस्कार करावा.
प्रणिधाय शिरो भूमौ नमस्कारपरो रवेः ।
तत्क्षणात्सर्वपापेभ्यो मुच्यते नात्र संशयः ।।
– भविष्यपुराण, ब्राह्मपर्व, अध्याय ८०, श्लोक १०
अर्थ : जो भूमीवर मस्तक ठेवून सूर्याला नमस्कार करतो, त्याच क्षणी निःसंशय त्या व्यक्तीचे सर्व पाप त्याला सोडून जाते.
साष्टांग प्रणाम करणे शक्य नसल्यास मस्तक झुकवून सूर्याला नमस्कार करावा.
६. अर्घ्य देण्याच्या संदर्भातील काही नियम
अ. ओंजळीने किंवा पात्रातून अर्घ्य देतांना दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीला स्पर्श न करता मोकळे ठेवावेत.
मुक्तहस्तेन दातव्यं मुद्रां तत्र न कारयेत् ।
तर्जन्याङ्गुष्ठयोगेन राक्षसी मुद्रिका स्मृता ।
राक्षसी मुद्रिकार्घ्येण तत्तोयं रूधिरं भवेत् ।।
अर्थ : (अर्घ्य देतांना) मोकळ्या हाताने द्यावे, तेथे मुद्रा करू नये. तर्जनी आणि अंगठा यांचा संयोग झाल्यास ती ‘राक्षसी मुद्रा’ मानली जाते. राक्षसी मुद्रेने अर्घ्य दिल्याने ते जल रक्ताप्रमाणे होईल (असे मानले जाते).
आ. सूतके तु सावित्र्याञ्जलिं प्रक्षिप्य प्रदक्षिणम् ।
कृत्वा सूर्यं तथा ध्यायन् नमस्कुर्यात् पुनः पुनः ।।
अर्थ : सुतक असतांना सूर्याला मानस अर्घ्य देऊन, प्रदक्षिणा घालून आणि ध्यान करून पुनःपुन्हा (३ वेळा) नमस्कार करावा.
इ. अर्घ्य देतांना त्या पाण्याचे शिंतोडे स्वतःच्या पायावर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
ई. काही जण स्नान केल्यानंतर अंगपोसाने (पंचाने) शरीर पुसतात आणि तोच अंगपोस कमरेला गुंडाळून सूर्याला अर्घ्य देतात. हे शास्त्रानुसार अनुचित आहे.’
(साभार – ‘सनातन धर्म’ यू ट्यूब वाहिनी)
संग्राहक : श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२४)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन सूर्याला अर्घ्य दिल्याने झालेले लाभ !
‘पूर्वी मला एका ज्योतिष्याने प्रतिदिन सूर्याला अर्घ्य देण्याविषयी सांगितले होते. तेव्हा मी याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना कळवले असता त्यांनी मला कळवले, ‘‘तसे करावे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर ‘स्वतःला काय पालट जाणवतो ?’,
याचा अभ्यास कर आणि ही सूत्रे लिहून दे.’’ त्यानंतर मी तसे प्रयत्न चालू केले. त्याचे पुढील लाभ लक्षात आले.
१. माझ्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली. मला अधूनमधून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी असे त्रास होत असत. त्याची वारंवारता न्यून होऊन १ – २ वर्षांनी हे त्रास होऊ लागले.
२. एके दिवशी ५ घंटे नामजप केल्यानंतर मला स्वतःच्या शरिरात दैवी ऊर्जा जाणवते. त्या तुलनेत प्रत्येक दिवशी सूर्याला अर्घ्य देतांना सूर्याकडून स्वतःला मिळणारी दैवी ऊर्जा अनेक पटींनी अधिक असते. यातून ‘कुठलेही परिश्रम न करता निसर्गतः सूर्याकडून पुष्कळ दैवी ऊर्जा प्राप्त होते’, हे लक्षात आले.
अर्घ्य दिल्याने मला वरील शारीरिक आणि आध्यात्मिक या स्तरांवरील लाभ होत असल्याबद्दल मी सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२४)