८२ वर्षांच्या मराठी भाषिक वृद्धासमवेत हिंदी भाषेत बोलण्याची अधिकार्‍याची अरेरावी !

मुंबईच्या ‘महापेक्स’ प्रदर्शनातील घटना

रमेश पारखे

मुंबई – येथे आयोजित केलेल्या ‘महापेक्स’ प्रदर्शनात डोंबिवली येथून आलेल्या रमेश पारखे या ८२ वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आले. या वेळी ‘या प्रकरणी तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचे काहीच वाकडे होणार नाही’, असे प्रदर्शनातील अधिकार्‍याने सांगितले. संबिधत ज्येष्ठ व्यक्तीने अधिकार्‍याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

पारखे यांनी प्रदर्शनात त्यांना हवे असलेले साहित्य मराठी भाषेत मागितले. त्या कक्षावरील अधिकारी त्यांना म्हणाला, ‘‘तुम्ही जर हिंदीत बोलला नाहीत, तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. तुम्हाला हिंदीत बोलावेच लागेल. तुम्ही जा, कुठेही जा, तक्रार करा, आमचे काहीही बिघडणार नाही.’’ या वेळी ‘महाराष्ट्रात राहून अशा प्रकारे दादागिरी करणे योग्य नाही’, असे पारखे यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

मराठीत बोलणे आणि मराठीतून व्यवहार करणे यांसाठी राज्यशासन प्रोत्साहन देत आहे; मात्र अधिकारी मराठीजनांना अन्यायपूर्ण वागणूक देत आहेत, हे दुर्दैवी आहे. शासन अशा प्रकारे आडकाठी आणणार्‍यांवर कारवाई करणार का ?