इतरांचा विचार करणार्‍या आणि साधकांवर वात्सल्यभावाने प्रेम करणार्‍या मडगाव, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) भारती मंगेश प्रभु (वय ८७ वर्षे) !

‘२५.१.२०२५ या दिवशी मडगाव, गोवा येथील श्रीमती भारती मंगेश प्रभु (वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. ५.२.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुले आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (श्रीमती) भारती मंगेश प्रभु

१. श्री. रामचंद्र (शिरीष) मंगेश प्रभु  (मोठा मुलगा), मडगाव, गोवा.

१ अ. प्रेमभाव : ‘आई घरासमोरील मार्गाने जाणार्‍या अनेक जणांशी आपुलकीने बोलत असे. एकदा एक व्यक्ती पावसात भिजत जात होती. तेव्हा आईने त्या व्यक्तीला बोलावून तिला छत्री दिली. आईने त्या व्यक्तीला सांगितले, ‘‘तू भिजत जाऊ नको. ही छत्री तुलाच ठेव.’’ तिने अनेक जणांशी अशा प्रकारे जवळीक साधली होती. आई त्या व्यक्तींना नामजप करण्याविषयी सांगत असे.

१ आ. सेवेची तळमळ : आई गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मिळवण्यासाठी जात असे. तिला कधी सेवा करायला बाहेर पडणे शक्य नसल्यास ती मला ‘अर्पण घेऊन ये’, असे सांगत असे. आईला शारीरिकदृष्ट्या शक्य असेपर्यंत ती सेवा करत होती. त्यानंतर तिने आमच्याकडून सेवा करून घेतली.

१ इ. इतरांचा विचार करणे : ‘मी काही दिवसांपूर्वी आईला विचारले, ‘‘पाळी- उसगाव (गोवा) येथे तुझ्या भावाच्या घरी जाऊया का ? रामनाथी आश्रमात जाऊया का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘नको. त्यांना कशाला त्रास द्यायचा ?’’

१ ई. ‘ती सतत परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात आहे’, असे मला जाणवत होते. 

१ ऊ. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. आईचे निधन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशीही आईचा चेहरा तेजस्वी दिसत होता. तिच्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसत नव्हत्या.

२.‘ती शांत झोपली आहे’, असे मला वाटत होते.

३. आईच्या पार्थिवाला अग्नी दिल्यावर चितेच्या ज्वाळा पिवळ्या रंगांच्या दिसत होत्या.

मी आई आणि परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’

२. श्री. गुरुराज प्रभु (धाकटा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४९ वर्षे), वाराणसी आणि सौ. वृंदा बापट (मुलगी), फोंडा, गोवा.  

२ अ. काटकसरी : ‘आई ‘घरातील कोणतीही गोष्ट वाया जाऊ नये, त्या वस्तूचा सदुपयोग व्हावा’, यासाठी प्रयत्नरत असे, उदा. कलिंगडाच्या साली काढून त्याची भाजी करणे, जुने कपडे किंवा एखादी वस्तू टाकून देण्याऐवजी गरजूंना देणे.

२ आ. प्रेमभाव  

१. एखाद्या व्यक्तीचे दुःख किंवा अडचण पाहून आई शक्य असेल तेवढे त्या व्यक्तीला साहाय्य करण्याचा प्रयत्न करायची.

२. आईशी कुणी अयोग्य पद्धतीने वागले, तरीही आई त्या व्यक्तीशी प्रेमाने वागत असे. ती आम्हाला सांगत असे, ‘‘समोरची व्यक्ती अयोग्य वागली; म्हणून आपण तसेच वागायचे नाही. त्यांचे काही अयोग्य असेल, तर ते देव पाहून घेईल.’’

२ इ. प्रामाणिकपणा : आईने आमच्यावर लहानपणापासूनच प्रामाणिकपणाचे संस्कार केले. एखादा भाजीवाला किंवा बसवाहक यांच्याकडून चुकून जरी अधिक पैसे मिळाले, तरीही आई लगेच त्यांना पैसे परत देत असे.

२ ई. स्वीकारण्याची वृती : आमच्या घरची आर्थिक स्थिती काही वेळा बेताची असे. त्या वेळी किंवा अन्य कठीण प्रसंगी आईचे काही गार्‍हाणे नसे.

२ उ. अपेक्षा नसणे : आईची ‘मुलांनी तिच्यासाठी काहीतरी करावे’, अशी अपेक्षा नव्हती.

२ ऊ. धर्मप्रेम : आईला ‘अधर्म आणि भ्रष्टाचार’ यांविषयी चीड वाटत असे आणि तसे ती वेळप्रसंगी व्यक्तही करत असे.

२ ए.  देवावरील श्रद्धा : तिने जीवनातील कठीण प्रसंगी कधी देवाला दोष दिला नाही किंवा देवाची भक्ती करणे सोडले नाही. तिने शरीर साथ देईपर्यंत शक्य तेवढी व्रतवैकल्ये, कठोरतेने सोवळे पाळणे आणि आचारधर्मानुसार आचरण केले.

२ ऐ. ईश्वराशी अनुसंधान असणे : ती शेवटच्या आजारपणात अधून मधून देवाला नमस्कार करून प्रार्थना करत असे. मी तिला ‘नामजप करत आहेस ना ?’, असे विचारल्यास ‘काही वेळा नामजप करते’, असे सांगत असे.’

३. सर्वश्री अमोल हंबर्डे, अमोल वानखेडे, अनिरुद्ध राजंदेकर, चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) (मूळ रहाणार विदर्भ, महाराष्ट्र, सध्या रहाणार फोंडा, गोवा) आणि श्री. जगदीश इंगोले, वर्धा

‘एप्रिल १९९९ मध्ये गोवा राज्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू झाली. त्यानिमित्त विदर्भातून आम्ही एकूण दहा साधक या सेवेसाठी आलो होतो. त्या वेळी आमची सोय मडगाव येथील सेवाकेंद्रात केली होती.

३ अ. ‘विदर्भातील साधकांना महाप्रसादात पोळ्या खाण्याची सवय आहे’, हे ओळखून वात्सल्यभावाने त्या साधकांसाठी पोळ्या करणार्‍या भारती प्रभुआजी ! : गोवा येथील लोकांना नियमित भात खाण्याची सवय असल्याने त्या वेळी सेवाकेंद्रात महाप्रसादामध्ये पोळ्या करत नव्हते. त्यामुळे विदर्भात रहाणार्‍या साधकांना असुविधा होऊ लागली. त्या वेळी भारती प्रभुआजी सेवाकेंद्रात नियमित सेवेला येत असत. त्या स्वयंपाकघरात थोडा वेळ सेवा करत असत. ‘आम्ही अल्प प्रमाणात महाप्रसाद ग्रहण करतो’, हे एक दिवस प्रभुआजींच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी आम्हाला वात्सल्यभावाने विचारले, ‘‘ विदर्भातील लोक अल्प प्रमाणात महाप्रसाद ग्रहण का करतात ?’’ त्या वेळी आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आम्हाला इतका भात खायची सवय नाही.’’

आमची अडचण आजींच्या लक्षात आल्यानंतर त्या प्रत्येक रविवारी आमच्यासाठी पोळ्या करत असत. आम्ही जवळपास प्रत्येक रविवारी त्यांच्या घरी जाऊन पोळी भाजीचा प्रसाद ग्रहण करत होतो. त्यांना अनुमाने ५० पोळ्या कराव्या लागत असत. त्या आमच्यासाठी आनंदाने पोळ्या करत असत. त्या रविवारी त्यांच्या मुली सौ. वृंदा बापट आणि आताच्या कै. (सौ.) स्वाती जोशी यांना साहाय्यासाठी बोलावत असत.

३ आ. प्रभुआजींनी साधकांना ‘तुमचे कपडे धुलाई यंत्रात धुण्यासाठी घेऊन या’, असे आवर्जून सांगणे : त्या वेळी प्रभुआजींच्या घरी धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन) होते. त्या आम्हाला प्रेमाने सांगत असत, ‘‘तुम्ही महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी आमच्या घरी येतांना तुमचे धुवायचे कपडे घेऊन या.’’ आम्ही प्रत्येक रविवारी त्यांच्याकडे जातांना समवेत आमचे कपडे धुण्यासाठी नेत असू. त्या वेळी आमच्या गोवा येथील २ मासांच्या वास्तव्यात प्रभुआजी आम्हा सगळ्यांच्या आजी बनल्या आणि आमच्या सदैव स्मरणात राहिल्या.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १.२.२०२५)