पुणे येथे ‘हुक्का पार्लर’कडून हप्ता घेणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण काळातील !

(चित्र सौजन्य : LocalPune)

पुणे – येथील लुल्लानगरातील ‘विजेता रूफटॉप हॉटेल’ चालकांकडून २० सहस्र रुपयांचा हप्ता घेणे आणि हॉटेलवर होणार्‍या कारवाईची आगाऊ माहिती देणे या आरोपांवरून प्रशिक्षण कार्यकाळातील पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याला निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचा अवमान करून पोलीस विभागाची शिस्त आणि घेतलेली प्रतिज्ञा (शपथ) विसरून पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी निलंबनाचे आदेश दिले.

पोलिसांनी लुल्लानगर येथील ‘विजेता रुफटॉप हॉटेल’वर कारवाई केली. हॉटेल चालकाचा भ्रमणभाष कह्यात घेतला. त्याची पडताळणी केली असता पवार आणि त्यांचे संभाषण आणि संदेश देवाण-घेवाण झाल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल चालकाने सांगितले की, पवार आणि आमच्यात संभाषण होत होते. ते प्रतिमास २० सहस्र रुपये हप्ता घेत होते. कारवाई होण्याचे संदेश ते आम्हाला आगाऊ कळवत होते. (या हॉटेलमध्ये असे काय चालू  होते की, त्याच्यावर सारखी कारवाई करण्यात येत होती ? याची माहितीही समोर आली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • प्रशिक्षण काळातच भ्रष्टाचार करणारे पोलीस अधिकारी पुढे काय दिवे लावणार आहेत, हे लक्षात येते. यातून समाजामध्ये भ्रष्टाचार किती मुरला आहे आणि नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे स्पष्ट होते !
  • प्रशिक्षण कार्यकाळातील पोलीस अधिकारी लाचखोरी करत असेल, तर त्यांना कोणत्या दर्जाचे प्रशिक्षण मिळते, यावर शंका निर्माण होते !
  • पोलिसांना प्रशिक्षण देण्यासह नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे मार्गदर्शन करणेही आवश्यक आहे !