Neha Hiremath Murder Case : माझ्या मुलीच्या हत्येमागे काही आमदारांचा हात ! – काँग्रेसचे नगरसेवक असणार्‍या नेहाच्या वडिलांचा आरोप  

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील नेहा हिरेमठ हिच्या हत्येचे प्रकरण

नेहा हिरेमठ व वडील निरंजन हिरेमठ

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या हत्येला ९ महिने झाले, तरी न्याय मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ‘राज्य सरकारने १२० दिवसांत न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण कोणतीही प्रगती झालेली नाही. या खुनामागे काही आमदारांचा हात आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. हिरेमठ यांनी या आमदारांचे नाव सांगितले नाही. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात काही मोठ्या व्यक्तींचा हात असल्याचा आरोप आहे.

१८ एप्रिल २०२४ या दिवशी हुब्बळ्ळीच्या विद्यानगरमधील बीव्हीबी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनी नेहा हिरेमठ यांची निर्घृण हत्या झाली होती. आरोपी फयाज याने प्रेम नाकारल्याच्या रागातून नेहाची हत्या केली होती. पोलिसांनी काही वेळातच फयाजला अटक केली; मात्र अद्याप फयाज याला शिक्षा झालेली नाही.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांनाही काँग्रेसच्या नगरसेवकाला न्याय मिळत नाही, तेथे सामान्य जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल !