संपादकीय : शेणाच्‍या वायूची गाडी !

सुझुकी या जपानी आस्‍थापनाने वर्ष १९८१ मध्‍ये भारतातील ‘मारुति’ या आस्‍थापनाशी भागीदारी केली आणि ‘मारुति ८००’ ही गाडी वर्ष १९८३ मध्‍ये भारतात आणली. पुढील ४० वर्षे अक्षरशः भारतातील एक लोकप्रिय चारचाकी म्‍हणून तिने भारतियांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवले. पुढे या आस्‍थापनाने विविध वाहने विकसित केली आणि आता तिने भारतियांच्‍या ‘मूळ स्रोता’ला हात घालून शेणापासून निर्माण होणार्‍या वायूवर (‘गॅस’वर) चालणारी चारचाकी बनवली आहे. देहलीतील ‘मोबिलिट ग्‍लोबल एक्‍सपो २०२५’ या वाहनांच्‍या प्रदर्शनामध्‍ये ही गाडी ठेवण्‍यात आली होती. ही गाडी शेणापासून निर्माण केलेल्‍या ‘बायोमिथेन’ या वायूवर चालू शकते. मागील प्रदर्शनामध्‍ये या आस्‍थापनाने ‘कंप्रेस्‍ड बायोमिथेन गॅस’ (सीबीजी)वर चालणारी ‘ब्रेझा’ गाडी ठेवली होती. हे आस्‍थापन ती गाडी बाजारात आणण्‍याची शक्‍यता आहे.

प्रदूषणाला पर्याय नाही !

सध्‍या विदेशाप्रमाणे भारतातही वाहनांची संख्‍या प्रचंड प्रमाणात वाढल्‍याने ती प्रदूषणाचे एक मोठे कारण ठरलेली आहे. पेट्रोलला पर्याय म्‍हणून डिझेल आले, तरी तेही प्रदूषणकारी आहे. पेट्रोल आणि डिझेल यांनी होणारे प्रदूषण न्‍यून व्‍हावे; म्‍हणून विजेवर चालणारी वाहने आली आहेत; परंतु प्रत्‍यक्षात विजेवर चालणार्‍या वाहनांमुळे अधिक कार्बन डायऑक्‍साईड निर्माण होतो. ‘एक इलेक्‍ट्रिक वाहन ४६ टक्‍के, म्‍हणजे ५ ते १० टन, तर एक पेट्रोलवरील वाहन २६ टक्‍के कार्बन डायऑक्‍साईड निर्माण करते’, असे एका अहवालातून पुढे आले आहे. अनेक इलेक्‍ट्रिक गाड्यांमध्‍ये ‘निकेल’ हे द्रव्‍य वापरले जाते. निकेलचे उत्‍खनन हे पर्यावरणासाठी अत्‍यंत धोकादायक आहे. याखेरीज इलेक्‍ट्रिक वाहनांमध्‍ये ‘लिथेनियम’ आणि ‘कोबाल्‍ड’ हे धातू वापरल्‍यामुळे त्‍यातून सामान्‍य गाड्यांपेक्षा अधिक कार्बन डायऑक्‍साईड बाहेर पडतो. ‘इमिशन अ‍ॅनालिटिक्‍स’च्‍या अहवालानुसार इलेक्‍ट्रिक वाहनाचे वजन अधिक असल्‍याने ‘ब्रेक’ आणि ‘टायर’ यावर अधिक दाब पडून सामान्‍य वाहनांपेक्षा १ सहस्र ८५० पट अधिक उत्‍सर्जित घटक बाहेर पडतात, तसेच भारतासारख्‍या देशांत बहुतांश प्रमाणात वीज कोळशापासून निर्माण होत असल्‍याने तो जाळल्‍याने कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जित होतो. त्‍यामुळे काळानुसार इलेक्‍ट्रिक वाहनेही प्रदूषणाला पर्याय ठरू शकत नाहीत, हे लक्षात येते. या पार्श्‍वभूमीवर आता ‘मारुति’ आस्‍थापनाने आणलेला नवा ‘शेणाच्‍या वायूच्‍या गाडी’चा पर्याय आशादायक वाटू शकतो.

‘शेणा’चे अलौकिकत्‍व !

आपल्‍याकडे ऋषिमुनींची कामधेनू आहे, शिवाचे वाहन नंदी आहे, दत्त आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या समवेत गोमाता आहे. गोवंशाला देवत्‍व प्राप्‍त झाल्‍यानेच कि काय, सनातन भारतीय संस्‍कृतीने दैवत मानलेल्‍या गोवंशियांच्‍या शेणात ‘शुद्धीकरणाचे’ अलौकिक तत्त्व आहे. हवा (वातावरण), माती (भूमी), धान्‍य, वनस्‍पती सर्वच गोष्‍टी शेणाने शुद्ध राहू शकतात, हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. गायीच्‍या शेणाचे अनन्‍यसाधारण आध्‍यात्मिक महत्त्व आता जगाला पटत चालले आहे. देशी गायींचे शेण वापरून केलेल्‍या अग्‍निहोत्रासारख्‍या विधीने निर्माण होणार्‍या संरक्षककवचामुळे अणूबाँबच्‍या किरणोत्‍सर्गापासूनही संरक्षण होते. अशा या ऊर्जावान शेणाचे लाभ प्राचीन भारतीय पूर्वापार जाणत होते आणि त्‍यामुळेच भारताची भूमी अत्‍यंत सुपीक अन् कृषी अत्‍यंत समृद्ध होती, ज्‍यावर एवढा प्रचंड मोठा देश चालत होता. आता विज्ञानयुगातही या शेणातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात कामी येण्‍याचे संकेत आहेत. कलियुगातही मानवाला लागणार्‍या सुखसोयींमध्‍येही गोवंशच एक प्रकारे त्‍यांचे योगदान देणार आहे.

प्रदूषण टाळणारा बायोगॅस !

शेणामध्‍ये ६५ टक्‍के कार्बन डायऑक्‍साईड आणि २५ टक्‍क्‍यांहून अधिक मिथेन वायू असतो; परंतु शेणाचे बायोगॅसमध्‍ये रूपांतर झाल्‍यावर शेणातील मिथेनचे प्रमाण ५० टक्‍के होते. शेणापासून निर्माण होणारा बायोगॅस प्रदूषण टाळण्‍यास मोठे साहाय्‍य करतो.

परत ‘गो-प्रधान’ देशाकडे ?

‘मारुति’ आस्‍थापनाचे सहकारी ‘सुझुकी मोटर कॉर्पोरेशन’चे अध्‍यक्ष आणि प्रतिनिधी संचालक तोशिहिरो सुझुकी यांनी म्‍हटले आहे, ‘जगभरातील प्रदूषण रोखण्‍यासाठी केवळ इलेक्‍ट्रिक वाहने पुरेशी पडणार नाहीत. वाहनाचे इंधन आणि प्रदूषण यांचा वापर न्‍यून करण्‍यासाठी बायोमिथेन गॅस (सीबीजी), बायोमास आणि पर्यायी इंधनचालित वाहने विकसित करण्‍याचा विचार चालू आहे.’ तोशिहिरो सुझुकी यांनी नूतनीकरणयोग्‍य ऊर्जास्रोत म्‍हणून गायीच्‍या शेणाचा पर्याय शोधला आहे. यातून प्रदूषणरहित ऊर्जा निर्माण होऊ शकते. १० गायी किंवा त्‍यापेक्षा न्‍यून गायी एका वाहनाला एका दिवसासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करू शकतात. शेणाच्‍या इंधनाचा व्‍ययही न्‍यून आहे. त्‍यामुळे आत्‍मनिर्भर बनू पहाणारा भारत याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

पुरोगामी भारतियांसह भारतीय परंपरेचा द्वेष करणार्‍यांना ही एक मोठी चपराकच आहे. गोमातेच्‍या रक्षणासाठी लढणार्‍या धर्मसम्राट स्‍वामी करपात्री महाराज यांची इंदिरा गांधी सरकारने हत्‍या केली आणि अद्यापपर्यंत भारतात गोतस्‍करी चालूच आहे. भारतात गोवंश अत्‍यल्‍प राहिला आहे. भारतात वर्ष २०२४ मध्‍ये सुमारे देशी-विदेशी मिळून ३०७ दशलक्ष गोवंश होता. वर्ष २०१२ मध्‍ये केवळ देशी गायींची संख्‍या १५१ दशलक्ष होती. देशी गायी गेल्‍या २५ वर्षांत २५ टक्‍क्‍यांहून न्‍यून झाल्‍या आहेत. देशी गायींचे शेण हे अधिक चांगले मानले गेलेले आहे. गोमातेचे महत्त्व सांगणार्‍या भारतात गोवंशियांच्‍या हत्‍या झाल्‍या आहेत, हे विसरून चालणार नाही. हा सर्व इतिहास आणि वर्तमानातील प्रदूषणाच्‍या पर्यायासाठी गोवंशियांची निर्माण झालेली आवश्‍यकता पहाता परत एकदा नव्‍याने भारताला ‘गो-प्रधान’ देश बनवण्‍याची आवश्‍यकता लक्षात येते. अजूनही जगाच्‍या तुलनेत भारतात मुबलक गोवंश आहे. त्‍या दृष्‍टीने जगातील आस्‍थापनांचे भारताकडे लक्ष आहे. आगामी काळात भारत बायोगॅस उत्‍पादनांची बाजारपेठ बनण्‍याची शक्‍यताही नाकारता येत नाही. गोवंशियांच्‍या शेणापासून मिळणारी ही शाश्‍वत ऊर्जाच परत एकदा कलियुगातील मानवाच्‍या रक्षणासाठी धावून आली आहे. भारतियांसाठी ही अंतर्मुख करणारी गोष्‍ट नव्‍हे का ?

गोवंशियांच्‍या शेणाच्‍या रूपातील शाश्‍वत ऊर्जा टिकवण्‍यासाठी देशात गोवंशियांचे संवर्धन आणि गोवंशहत्‍या बंदी कायदा करणे महत्त्वाचे !