प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे सध्या चालू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने विशेष भाग २
भाग १. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/875220.html
१. कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू, संत आणि महंत यांचे आखाडे
‘कुंभमेळ्याला संपूर्ण भारतातील साधू आणि संत येतात. हे साधू कोणत्या ना कोणत्या आखाड्याशी जोडलेले असतात. ‘आखाडा’ हा शब्द ‘अखंड’ या शब्दाचे अपभ्रंश रूप आहे. अखंड (आखाडा) म्हणजे सतत आणि एकत्रित संघटना. प्राचीन काळात भारतात इतर पंथ उदयास आल्याने धर्माचे अस्तित्व धोक्यात आले. त्यामुळे ज्ञानोपासनेच्या कार्यासमवेतच या परकीय आक्रमकांचा सामना करण्यासाठी सशस्त्र दल सिद्ध करण्यात आले आणि त्यांना ‘आखाडा’ म्हटले गेले. उत्तर भारतात गोदावरी नदीपर्यंत रहाणारे साधू एकूण १३ संघांमध्ये रहातात. हे १३ संघच १३ ‘आखाडे’ समजले जातात.
१ अ. शैव (दशनामी) आखाडे : शैव आखाडे, म्हणजे साधूंचे आखाडे, जे भगवान शिव यांना त्यांचे देव मानतात. त्यात महानिर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जुना (भैरव), आवाहन आणि अग्नि, असे एकूण ७ आखाडे आहेत.
१ आ. वैष्णव आखाडा : भगवान विष्णु आणि प्रभु श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण यांची उपासना करणार्या संतांच्या आखाड्यांना ‘वैष्णव आखाडे’ म्हणतात. दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी हे ३ मुख्य वैष्णव आखाडे आहेत. यात १८ उपआखाडे आणि खालसा यांचाही समावेश आहे. खालसा म्हणजे मंडलेश्वर, महामंडलेश्वर किंवा संबंधित आखाड्यातील महंतांचा स्वतंत्र गट. कुंभमेळ्यात प्रत्येक खालसा छावणी स्वतंत्रपणे उभारली जाते. आखाडे हे खालसाचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येक खालसा स्वतंत्र असतो; परंतु खालसा किंवा त्यांच्याशी संबंधित साधूंची काळजी आखाड्यांकडून घेतली जाते.
अ ई. उदासीन आखाडा : उदासीन आखाड्यामध्ये उदासीन पंचायती मोठा आखाडा आणि उदासीन पंचायती नवीन आखाडा, हे २ आखाडे आहेत. याखेरीज शिखांचा निर्मल आखाडाही उदासीन नावाने आहे. हा आखाडा गुरु गोविंदसिंह यांच्या प्रेरणेने स्थापन झाला आहे.
शैव पंथाच्या आखाड्यांचे वैशिष्ट्य

आद्यशंकराचार्यांनी शैव परंपरेतील संघटित साधूंचे गिरि, पुरी, भारती, तीर्थ, वन, अरण्य, पर्वत, आश्रम, सागर आणि सरस्वती, अशा १० गटांमध्ये वर्गीकरण केले. या संघटित गटांनाच ‘दशनामी आखाडा’ म्हणून ओळखले जाते. या आखाड्यांचे ७ प्रकार आहेत. प्रत्येक आखाड्याची देवता आणि ध्वज यांत विविधता आहे. शैव संन्याशांना आखाड्यांमध्ये धार्मिक उपक्रम आणि शस्त्रास्त्र यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये क्षात्रतेज दिसून येते.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
वैष्णव पंथाच्या आखाड्यांचे वैशिष्ट्य

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य आणि श्री भावानंदचार्य यांचे शिष्य श्री बालानंद यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांना त्यांचे आराध्य दैवत म्हणून स्वीकारले. त्यांनी ४ वैष्णव संप्रदायांचे संघटन करून ३ बैरागी (वैष्णव) आखाडे स्थापन केले. वैष्णव आखाड्यांमध्येही शस्त्रे आणि शास्त्रे यांचा कठोर सराव केला जातो. इतर वैष्णव आखाड्यांची नावे निरलंभी, संतोषी, महानिर्वाणी आणि खाकी आहेत. या साधूंना ‘बैरागी’ किंवा ‘अलख’ संबोधले जाते. इतर धर्मीय आक्रमणकर्त्यांपासून हिंदू आणि त्यांची मंदिरे यांचे रक्षण करणे, हेच या आखाड्यांचे मुख्य कर्तव्य आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
२. सर्व साधूंचे आखाडे उत्तर भारतात असण्याचे कारण
कुंभमेळ्यात सर्वत्र जमणारे सर्व आखाडे उत्तर भारतातील आहेत. दक्षिण भारतात साधूंचा एकही आखाडा नाही. हिंदु धर्मावरील आक्रमणांचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारतात झाला. त्या तुलनेत दक्षिण भारत शांत राहिला. याचा परिणाम म्हणून दक्षिणेत ज्ञान मार्गावर आधारित विद्वत्ता आहे, तर उत्तरेत बलोपासनामार्गी भक्ती आहे.
३. आखाडे आणि त्यांची व्यवस्था
येथील साधूंच्या आखाड्यांची परंपरा अद्वितीय आहे. आखाड्यांशी संबंधित बहुतेक साधूसंन्यासी शास्त्रे आणि शस्त्र यांमध्ये पारंगत आहेत. कुंभमेळ्यात एका आखाड्यातील सर्व साधू एकाच ठिकाणी रहातात. तेथे ते आपापसांत चर्चा करतात आणि भविष्यातील योजना ठरवतात. आखाड्यांमध्ये साधूचे स्थान त्याच्या आध्यात्मिक क्षमतेच्या आणि मानसिक संयमाच्या आधारे निश्चित केले जाते. स्थान ठरवतांना कोणताही जातीय भेदभाव किंवा उच्च-नीच दर्जा विचारात घेतला जात नाही. आखाड्यांमध्ये शिस्तीचे पालन न करणार्या साधूंना कठोर शारीरिक किंवा आर्थिक शिक्षा दिली जाते. प्रत्येक आखाड्यात महामंडलेश्वर, मंडलेश्वर, महंत असे काही प्रमुख असतात. या पदासाठी ‘परमहंस’ ही पदवी प्राप्त केलेल्या अत्यंत नम्र, विद्वान आणि ब्रह्मभक्त साधूंची निवड करण्यात येते. धर्मग्लानीमुळे सध्या या क्षेत्रातही आदर्शांचे पालन केले जात नाही, हेही तितकेच खरे आहे.
४. कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणारे साधू शस्त्रसज्ज असण्यामागील कारण
हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या इस्लामी आक्रमणकर्त्यांचा प्रतिकार करण्यास तत्कालीन हिंदु राजसत्ता काही प्रमाणात असमर्थ ठरली. त्यामुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी साधू-संन्याशांनी शस्त्रे उचलली. नागा संप्रदाय आणि दशनामी संन्याशी एकत्र झाले. त्यांनी शक्तीचे प्रतीक असलेला भाला त्यांचे शस्त्र म्हणून धारण केला. त्यांना मल्लविद्या आणि तलवार इत्यादी शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले.
‘प्राचीन आध्यात्मिक परंपरा जपणारे शस्त्रधारक’ आणि ‘धर्माच्या रक्षणासाठी लढणारे शस्त्रधारक’, अशा दोन भागांमध्ये नागा-दशनामी संन्यासी विभागले गेले होते. या संन्याशांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले. केवळ संन्याशीच नाही, तर बैराग्यांनीही अन्य धर्मीय आक्रमकांविरुद्ध अनेक वेळा सशस्त्र युद्धे लढून धर्माचे रक्षण करण्याचे मोठे काम केले. ज्ञानसंपन्न असूनही शस्त्रसज्ज झालेले शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू-संन्यासी यांच्यामुळेच नि:शस्त्र शांतीप्रिय हिंदु समाजाला दिलासा मिळाला आणि सिंधच्या सीमेवर इस्लामचे आक्रमण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत थांबले. हे एक ऐतिहासिक सत्य आहे.
५. साधू-संन्यासी यांची राष्ट्ररक्षणार्थ क्षात्रधर्माची काही उदाहरणे

अ. वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाने हरिद्वारमधील कुंभमेळ्यात साधूसंत आणि भाविक यांच्यावर आक्रमण केले होते. तेव्हा संन्याशांचे भगवे धर्मध्वज पाहून मोगल सैन्यातील मराठा सैनिक साधूंच्या बाजूने लढले. त्यामुळे मोगल सैन्याचा पराभव झाला.
आ. वर्ष १७४८ मध्ये अहमद शाह अब्दालीने केलेल्या आक्रमणात आणि वर्ष १७५७ मध्ये मथुरेवर झालेल्या आक्रमणात असंख्य संन्याशांनी हौतात्म्य स्वीकारले.
इ. राजेंद्रगिरी नावाच्या नागा साधूच्या नेतृत्वाखाली वर्ष १७५१ ते १७५३ या काळात झाशीजवळील ३२ गावांमध्ये मोगल राजवट उलथवून टाकण्यात आली आणि तेथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकवण्यात आला.
ई. वर्ष १७५१ मध्ये फरूखाबाद येथील बंगश अफगाण सरदार अहमद खानने प्रयागराजमध्ये हिंसाचार आणि लूटमार केली अन् ४ सहस्र उच्चकुलीन महिलांचे अपहरण केले. त्या वेळी कुंभ महोत्सवासाठी त्रिवेणी संगमावर आलेल्या ६ सहस्र नागा साधूंनी बंगश अफगाण सरदाराच्या सैन्यावर आक्रमण केले आणि अपहरण केलेल्या महिलांची सुटका केली. या संघर्षात अनेक अफगाण सरदार मारले गेले.
उ. वर्ष १८५५ मध्ये हरिद्वार येथील कुंभमेळ्यात औमाननंदजी (आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु) आणि त्यांचे गुरु पूर्णानंदजी यांनी वर्ष १८५७ च्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची योजना आखली अन् संन्याशांच्या साहाय्याने तो लढा संपूर्ण देशभर पसरवला. वर्ष १८५८ मध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात दशनामी संन्याशांच्या छावणीत दस्त बाबा यांच्या साक्षीने नानासाहेब धोंडूपंत, बाळासाहेब पेशवे, तात्या टोपे, अजमुल्ला खान आणि जगदीशपूरचे राजा कुंवर सिंह यांनी इंग्रजांना हाकलून लावण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेच्या वेळी शेकडो साधू-संत उपस्थित होते.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/882855.html
आध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञान यांचे भव्य संमेलन असलेला कुंभमेळा

१ . कुंभमेळ्यातील संतदर्शन सोहळा भाविकांना दर्शनभक्तीची प्रेरणा देतो, तर धर्म, अध्यात्म, रामायण, भागवत इत्यादी विषयांवर साधू-संतांचे प्रवचन आणि व्याख्याने भक्तांना श्रवणभक्तीची प्रेरणा देतात. कुंभस्थळावरील अनुमाने १० सहस्र मंडपांपैकी बहुतेक ठिकाणी धार्मिक विषयांवर प्रतिदिन मार्गदर्शन केले जाते.
२. कुंभमेळ्यामध्ये हिमालयातील गुहेत ध्यान करणारे सिद्धपुरुष, काश्मीरहून कन्याकुमारीला पायी प्रवास करणारे संन्यासी आणि शस्त्रधारी आखाड्यांचे साधू-संत यांचे दर्शन होते. जेव्हा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जाणवते की, ते ज्ञान आणि अनुभव यांचे जिवंत हिमालय आहेत. असे असतांनाही त्यांची नम्र आणि प्रेमळ दृष्टी सर्वांना सामावून घेणार्या महासागरासारखी विशाल आहे. त्यामुळेच कुंभमेळ्याचा महान उत्सव, म्हणजे विविध योग मार्गांच्या साधू-संतांचे अमूल्य दर्शन लाभाची संधी आहे.
३. प्राचीन काळापासून कुंभमेळा धार्मिक जागृतीसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. प्रारंभी कुंभमेळ्यात केवळ विद्वान, योगी, संत, ऋषी इत्यादी सहभागी होत असत. तेथे सनातन धर्म, संस्कृती आणि व्यावहारिक नीतीमत्ता यांच्या दृष्टीकोनातून संशोधनाचे काम साधू-संतांनी केले. या संशोधनातून कुंभपर्व स्थळावर विविध मतांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे काम चालू झाले आणि ते आजही चालू आहे. त्यांच्यात होणार्या चर्चेतून देशभरातील राजपुरुष, विद्वान आणि सामान्य लोक यांना धार्मिक शिकवण मिळते. या कारणास्तव कुंभमेळा भारताचे धार्मिक वैभव राखण्यासाठी लाभदायक ठरला. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा परकीय आक्रमक भारतात अराजकता पसरवत होते आणि हिंदु संस्कृतीच्या मूल्यांना बलपूर्वक चिरडत होते, तेव्हा कुंभमेळ्यांनी धर्माच्या रक्षणासाठी ब्रह्मास्त्राची भूमिका बजावली.’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.