कुंभमेळ्याचे खगोलशास्त्रीय विज्ञान आणि ग्रहगणना !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने…

भाग १.

‘कोणतेही निमंत्रण नसतांना कोट्यवधी हिंदु भाविक आणि साधू-संत यांना एकत्रित करणारा कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. सत्ययुगाच्या इतिहासाची महान आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेला हा कुंभमेळा सहस्रो वर्षांपासून चालत आलेला आहे. कुंभमेळा हा भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक आहे. कुंभमेळ्याचे हे काळपर्वच भारताच्या खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या उंचीचे एक उदाहरण आहे. हे हिंदूसंघटनाचे प्रतीक आहे, तसेच श्राद्ध विधीपासून योगाभ्यासापर्यंतचे विविध प्रकारचे आध्यात्मिक घटक अन् साधक यांचा हा मेळा आहे. साधू-संतांपासून सामान्य लोकांपर्यंत ‘सर्व जिवांचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, या आध्यात्मिक सत्याचा पुरस्कार करणारा हा मेळा आहे. सहस्रो लोकांनी कुंभमेळ्यात सहभागी होणे, याचा अर्थ देवतांचे अस्तित्व स्वीकारणे, भारतीय शास्त्रांना पुरावा म्हणून स्वीकारणे, साधूंच्या साधनेचा आदर करणे, संतांच्या आदर्शांचे पालन करण्याचा प्रयत्न करणे, धर्मशास्त्र आणि अध्यात्म यांच्या विविध पैलूंची देवाणघेवाण करणे, हा आहे. अशा महान कुंभमेळ्याचे महत्त्व जाणून घेऊया.

संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

१. जगभरातील हिंदूंसाठी महत्त्वाचा असलेला कुंभमेळा आणि कुंभपर्वक्षेत्र यांचे महत्त्व !

कुंभमेळा हे केवळ भारतीय संस्कृतीच्या महानतेचे प्रदर्शन नाही, तर संतांचा सहवास प्रदान करणारे एक आध्यात्मिक संमेलनही आहे. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या ४ क्षेत्रांमध्ये प्रत्येक १२ वर्षांनी होणार्‍या या उत्सवाला हिंदु जीवन तत्त्वज्ञानात महत्त्वाचे स्थान आहे. कुंभमेळ्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अद्वितीय आहे.

श्री. रमेश शिंदे

येथे कोट्यवधी भाविक गंगास्नान, ध्यान, दान, पूर्वजांना अर्पण, श्राद्ध समारंभ, संतांची भेट आणि धार्मिक चर्चा यांसारख्या धार्मिक कार्यांसाठी येतात. हा भक्तांचा उत्सव आहे. याखेरीज देव, ऋषी, संत आणि ३३ कोटी तीर्थ हेही या कुंभपर्वात सहभागी होतात, जी एक अद्वितीय घटना आहे. कुंभमेळ्याची घोषणा ही ‘हिंदू एकता’ आहे. कुंभमेळा हा हिंदूंचे धार्मिक आणि सांस्कृतिक अमरत्व यांचे सूचक आहे. हा कुंभमेळा विदेशी लोकांना हिंदु धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो. या कुंभमेळ्याचा आध्यात्मिक लाभ केवळ धर्मश्रद्धापूर्वक आचरण करणार्‍या भाविकांनाच मिळू शकतो. कृतयुगात (सत्युगात) समुद्रमंथन झाले, तेव्हापासून कुंभमेळे चालू झाले, अशी श्रद्धा आहे.

अ. ‘कुंभ’ या शब्दाचा लोकप्रिय अर्थ ‘कलश’, ‘भांडे’ किंवा ‘घडा’ असा आहे. ‘कलश’ हे पावित्र्य आणि मांगल्य यांचे प्रतीक आहे. ऋग्वेदिक ब्रह्मकर्मसम्मुचयानुसार कलशाच्या मुखात भगवान विष्णु, कंठात रुद्र (महादेव), तळात ब्रह्मा, मध्यभागी मातृकागण आणि कुशीमध्ये ७ समुद्र आणि ७ द्वीप यांनी युक्त पृथ्वी सामावलेली आहे. अशाच प्रकारे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद त्यांच्या भागांसह कलशामध्ये वास करतात.

आ. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ ही १२ राशींपैकी एक राशी आहे. कुंभपर्वच्या संदर्भात वर उल्लेख केलेले दोन्ही अर्थ स्वीकारार्ह समजले जातात.

इ. मानवी देहाचे प्रतीक कुंभ : मानवी शरिराला ‘पार्थिव’ (पृथ्वी तत्त्वाचे वर्चस्व असलेले) म्हणतात. कुंभक, म्हणजेच भांडे हे मानवी शरिराचे प्रतीक समजले जाते; कारण शरीर हे मातीचे बनलेले असते आणि मृत्यूनंतर ते मातीतच विलीन होते. पाप, वासना, लैंगिक इच्छा, क्रोध अशा विविध दुर्गुणांनी भरलेल्या शरिरासारखे भांडे रिकामे करण्याची वेळ ही कुंभमेळा असते.

संत नामदेव महाराज यांना ‘देव माझ्याशी बोलतो’, ‘देव माझ्यासमवेत नाचतो’, अशा विचारांविषयी अहं होता. त्यामुळे एक दिवस संतांच्या सभेत संत मुक्ताबाई म्हणाल्या, ‘‘नामदेवाचा कुंभ अहंकाराने भरलेला आहे; म्हणून नामदेव अजूनही कच्चा आहे.’’ आपली सर्व भांडीही न भाजलेली आहेत; कारण आपल्याला आपले स्वरूप, संपत्ती, कामगिरी इत्यादी किंवा यांपैकी कोणत्या तरी गोष्टींचा अभिमान असतो. त्याच वेळी आपले मन वासना, क्रोध इत्यादी अनेक दुर्गुणांनी भरलेले असते. कुंभमेळा हे अनेक पापे, इच्छा, वासना, क्रोध अशा अनेक दुर्गुणांनी भरलेले शरीर रिकामे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आणि वेळ आहे.

कुंभमेळ्यात (त्या ठिकाणी आणि त्या वेळी) केलेले दान, धार्मिक कृत्य, नामसाधना किंवा ध्यान इत्यादींचे फळ इतर कोणत्याही ठिकाणी केलेल्या अशा कृतींपासून मिळणार्‍या फळांहून १ सहस्र पट अधिक असते. आपल्या आध्यात्मिक प्रगतीला गती देण्यासाठी देवाने आपल्याला कुंभमेळ्याच्या रूपात एक सुवर्णसंधी दिली आहे; कारण कुंभमेळ्यात अनेक देव, ज्ञानी, विविध योगमार्गांचे संत आणि ऋषिमुनी एकत्र येतात आणि त्यांच्या सहवासाचा लाभ अतिशय अल्प कालावधीत एकाच ठिकाणी मिळतो. कुंभमेळ्याला जाऊन तेथे केवळ स्नान करून आपल्याला फारसा लाभ होणार नाही. तीर्थक्षेत्रातील कुंभमेळ्यात आपण आपल्या इच्छा, स्वभावदोष आणि अहंकार यांनी भरलेले आपले मन, बुद्धी अन् अहंकार रिकामे करू, तेव्हाच आपल्याला देवता, देवी अन् संत यांचे आशीर्वाद मिळतील, तसेच आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

२. कुंभमेळ्याविषयी पुराणांमध्ये असलेली माहिती

आपण सर्वांनी कुंभमेळ्याच्या उत्पत्तीची कथा ऐकली आहे. अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांनी एकत्र येऊन क्षीरसागर (दुधाचा समुद्र) मंथन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रमंथनासाठी सर्पराजा वासुकीला मेरू पर्वत, म्हणजेच मंदार पर्वत फिरवण्यासाठी दोरी बनण्याची विनंती करण्यात आली. वासुकी नाग दोरी बनला आणि त्याने मेरू पर्वताला त्याच्याभोवती गुंडाळले. त्याच्या डोक्याकडे राक्षस होते आणि शेपटीकडे देव होते. अशा प्रकारे समुद्रमंथन झाले. या समुद्रमंथनातून हलाहल विष, कामधेनू गाय, पांढरा घोडा उच्चैःश्रवा, ४ दात असणारा हत्ती ऐरावत, कौस्तुभमणि, पारिजात कल्पवृक्ष, रंभा यांसारख्या  स्वर्गीय अप्सरा, श्री लक्ष्मीदेवी, सुर म्हणजे मद्य, सोम म्हणजेच चंद्र, हरिधनू म्हणजे धनुष्य, शंख, देवांचा वैद्य धन्वन्तरि, अमृतकलश, म्हणजे कुंभ इत्यादी १४ रत्ने बाहेर आली. ज्या क्षणी भगवान धन्वन्तरि अमृताचे भांडे हातात घेऊन समुद्रातून बाहेर आले, त्या क्षणी ‘अमृत पिऊन राक्षस अमर झाले, तर ते उत्पात माजवतील’, असे देवांच्या मनात आले. त्यामुळे त्यांनी इंद्राचा मुलगा जयंतला संकेत दिला. त्याप्रमाणे तो धन्वन्तरिच्या हातातून अमृताचा कुंभ घेऊन स्वर्गाकडे निघाला. हा अमृताचा कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात १२ दिवस आणि १२ रात्री युद्ध झाले. या युद्धात अमृताचा कुंभ १२ वेळा खाली ठेवण्यात आला. त्या वेळी सूर्यदेवाने अमृत कलशाचे रक्षण केले. चंद्राने कलशातील अमृत उडून जाऊ नये, याची काळजी घेतली आणि गुरुने राक्षसांशी युद्ध करून कलशाचे रक्षण केले. त्या वेळी सूर्य, चंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष युतीमुळे कुंभातून अमृताचे बिंदू पडणार्‍या १२ ठिकाणी कुंभमेळा साजरा केला जातो. या १२ ठिकाणांपैकी ८ ठिकाणे इतर लोकांमध्ये आहेत आणि उर्वरित ४ ठिकाणे ही भूलोकातील प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक आहेत. या ठिकाणी ज्या तिथीला आणि ग्रहस्थितीला अमृतबिंदू पडले, त्या तिथीला अन् ग्रहस्थितीला कुंभमेळा साजरा केला जातो. कुंभमेळ्यात या अमृतकुंभाचेही स्मरण केले जाते.

३. कुंभमेळ्याचा कालावधी आणि स्थाने ठरवण्यामागील शास्त्र

प्रत्येक १२ वर्षांनी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे हा पुण्ययोग येतो. गुरु ग्रहाला राशीचक्रातून प्रवास पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. त्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो, म्हणजेच प्रत्येक १२ वर्षांनी गुरु ग्रह राशीचक्राभोवती फिरतो आणि कुंभ राशीत येतो. या वेळेला कुंभपर्व म्हणतात आणि या वेळी पृथ्वीवर हिंदूंचा  कुंभमेळा आयोजित केला जातो. ज्याप्रमाणे गुरु कुंभ राशीत असतांना ‘कुंभपर्व’ साजरा केला जातो, त्याचप्रमाणे गुरु सिंह राशीत असतांना ‘सिंहस्थ’ मेळा साजरा केला जातो आणि गुरु कन्या राशीत असतांना ‘कन्यागत’ मेळा साजरा केला जातो.

कुंभमेळा कधी आणि कुठे आयोजित करावा, हे ग्रहांच्या गणितावर आधारित आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्धात चंद्र, रवि आणि गुरु यांनी देवांना विशेष साहाय्य केले. त्यामुळे कुंभमेळ्याचा कालावधी त्यांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार ठरवला जातो.

जर गुरु कुंभ राशीत असेल आणि सूर्य मेष राशीत असेल, तर हरिद्वारमध्ये; जर गुरु मेष राशीत असेल आणि सूर्य मकर राशीत असेल, तर प्रयागमध्ये; सिंह राशीत गुरु असेल आणि मेष राशीत सूर्य असेल, तर उज्जैनमध्ये, तसेच सिंह राशीत गुरु आणि सिंह राशीतच सूर्य असतो, तेव्हा नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो.

हरिद्वारे कुम्भयोगो मेषार्के कुम्भगे गुरौ ।
प्रयागे मेषसंस्थेज्ये मकरस्थे दिवाकरे ।।

उज्जयिन्यां च मेषार्के सिंहस्थे च बृहस्पतौ ।
सिंहस्थितेज्ये सिंहार्के नाशिके गौतमीतटे ।।

सुधाबिन्दुविनिक्षेपात् कुम्भपर्वेति विश्रुतम् ।।

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/880349.html