भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या (‘यू.एन्.’च्या) ‘शांतीरक्षा अभियाना’त अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्य, समर्पण आणि व्यावसायिकता यांची जगभरात प्रशंसा झाली आहे. ‘यू.एन्.’च्या शांतीरक्षा कार्यात सक्रीय सहभाग हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सीरियातील अशाच शांती कार्यात मोलाचे योगदान देऊन भारताचे नाव उज्ज्वल करणारे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने भारतीय सैन्याच्या ‘जागतिक शांतीरक्षा अभियाना’चा थोडक्यात आढावा.

१. ब्रिगेडियर अमिताभ झा यांच्याविषयी…
सीरियातील हिंसाचार जगाला प्रतिदिन नवे हादरे देत आहे. गेल्या दीड वर्षांपेक्षाही अधिक काळ तेथील शांतता प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी झटणारे भारताचे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे योगदान मोठे होते. ब्रिगेडियर अमिताभ झा हे एक भारतीय लष्करी अधिकारी होते, ज्यांनी सीरियातील गोलन हाईट्स येथे संयुक्त राष्ट्राच्या निर्सैनिकीकरण दलाचे (‘यू.एन्.डी.ओ.एफ्.’चे) ‘डेप्युटी फोर्स कमांडर’ म्हणून काम केले.

ब्रिगेडियर झा यांनी भारतीय लष्करात ‘गोरखा रायफल’चे अधिकारी म्हणून सेवा केली. ब्रिगेडियर झा यांना विविध खेळांतही रुची होती. ते अनेक सांघिक खेळ खेळत. पर्वतांमध्ये गिर्यारोहण करत. भारतीय लष्करात खडतर परिस्थितीत सेवा दिलेल्या ब्रिगेडियर झा यांचा लष्करी मुत्सद्देगिरी, भूराजकीय प्रश्न, पारंपरिक युद्धनीती या विषयांचा सखोल अभ्यास होता. सियाचेन ग्लेशियर येथे काम करतांना त्यांनी त्यांच्या खंबीर नेतृत्वाने आदर्श घालून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांनी पुढे विविध स्तरांवर नेतृत्वाची धुरा सांभाळली. ते एक अनुभवी आणि खंबीर नेते होते.
२. ब्रिगेडियर अमिताभ झा यांनी पार पाडलेले विविध उत्तरदायित्व
इस्रायल-सीरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही मासांत तेथील तणाव वाढला. सीरियातील बंडखोर गटांच्या वाढत्या हिंसाचारामुळे येथील परिस्थिती संवेदनशील झाली आहे. परिणामी शांतता दले आणि स्थानिक जनतेसाठी तेथील वातावरण अतिशय असुरक्षित झाले आहे. सततचा बाँब वर्षाव, प्रचंड प्रमाणात रक्तपात आणि अस्थिर वातावरणात काम करतांनाही ब्रिगेडियर झा यांनी त्यांच्या दायित्वाप्रती असलेल्या कटिबद्धतेचा कधीही विसर पडू दिला नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात युद्धबंदी कराराची कार्यवाही, मानवतावादी दृष्टीकोनातून साहाय्य, युद्धसदृश परिस्थितीत अडकून पडलेल्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे इत्यादी दायित्व सक्षमपणे पार पाडले. अतिशय गुंतागुंतीची नाजूक परिस्थिती असतांनाही त्यांची कर्तव्याप्रतीची निष्ठा कायम राहिली. गोलान हाईट्स येथे नेमणूक होण्यापूर्वी ते डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टमंडळात ‘लष्करी निरीक्षक’ म्हणून कार्यरत होते.
ब्रिगेडियर झा यांच्या नेतृत्वाखाली ‘यू.एन्.डी.ओ.एफ्.’ने गोलन हाईट्समध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इस्रायल आणि सीरिया यांच्या अधिकार्यांशी संवाद साधून तणाव न्यून करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिक जनतेला साहाय्य करण्यासाठी अनेक सामाजिक आणि मानवतावादी कार्य केले. ते एक खंबीर आणि अनुभवी सैनिक होते, ज्यांनी त्यांच्या सहकार्यांचे मनोबल वाढवले. एकंदरीत ब्रिगेडियर अमिताभ झा यांनी गोलन हाईट्सवर संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि मृत्यूची खात्रीच असलेल्या प्रदेशातही जागतिक शांततेसाठी प्रत्येक संकटाला नेटाने तोंड देण्याविषयीची त्यांची निष्ठा प्रेरणादायी आहे.
३. संयुक्त राष्ट्रांच्या विविध अभियानात भारतीय सैनिकांचा सहभाग
१७९ भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सेवा देतांना प्राण गमावले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सनदीमध्ये सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. ‘संयुक्त राष्ट्र शांती सेना’ वर्ष १९४८ मध्ये स्थापन केली. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा अभियानात भारताचा एक गौरवशाली इतिहास आहे. भारत संयुक्त राष्ट्रांचा एक संस्थापक सदस्य आहे आणि तेव्हापासून जागतिक शांतता अन् सुरक्षितता राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारतीय सैनिक केवळ लढाऊ भूमिकेतच नव्हे, तर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि ‘लॉजिस्टिक सपोर्ट’मध्येही (उत्पादनाची वाहतूक आणि साठवणूक यांमध्येही) महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भारतीय लष्कराच्या महिला तुकड्यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात प्रशंसनीय काम केले आहे.

अ. जागतिक शांतता आणि सुरक्षा : भारतीय सैनिकांनी जगभरातील संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यात मोलाचे साहाय्य केले आहे.
आ. मानवतावादी साहाय्य : भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्त लोकांना साहाय्य केले आहे. भारतीय सैनिकांनी स्थानिक लोकांना साहाय्य करण्यासाठी अनेक मानवतावादी कार्ये केली आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिरे, बांधकाम, पुनर्वसन कार्य आणि आपत्कालीन साहाय्य यांचा समावेश आहे.
४. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारतीय सैनिकांनी दिलेले योगदान
संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा कार्यात सक्रीय सहभागामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उत्तरदायी आणि ‘शांतताप्रिय देश’ म्हणून प्रतिमा उंचावली आहे. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील योगदानाचा समृद्ध वारसा आहे आणि तो शांतीरक्षकांचा सर्वांत मोठा योगदानकर्ता आहे. भारताने आतापर्यंत अशा शांतता मोहिमांमध्ये अनुमाने २.७५ लाख सैनिकांचे योगदान दिले आहे आणि भारताचे ५ सहस्र ९०० सैनिक सध्या संयुक्त राष्ट्रांच्या १२ मोहिमांमध्ये तैनात आहेत. त्यामध्ये महिला कर्मचारी, अधिकारी, लष्करी निरीक्षक यांचा समावेश आहे आणि ज्यात काँगोमधील ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन फॉर स्टॅबिलायझेशन मिशन’ (संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची शांतता राखण्याची मोहिम) आणि ‘युनायटेड नेशन्स इंटरिम मिशन इन अबेई’ (अबेई येथील संयुक्त राष्ट्रांची अंतरिम मोहिम) यांचा समावेश आहे. वर्ष १९५० मध्ये कोरियामध्ये त्यांच्या पहिल्या वचनबद्धतेपासून भारतीय सैनिकांनी त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी सार्वत्रिक प्रशंसा मिळवून शांतता मोहिमांची मागणी करत जटील देखरेख केली आहे. अनेक भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेमध्ये शौर्य गाजवले आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.