संपादकीय : खेळ आणि इस्लाम !

उझबेकिस्तान देशाचा बुद्धीबळपटू आणि ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव याने सामन्याच्या आधी भारतीय बुद्धीबळपटू अन् ग्रँडमास्टर आर्. वैशाली हिच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

इस्लामी देश असणार्‍या उझबेकिस्तान देशाचा बुद्धीबळपटू आणि ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव याने सामन्याच्या आधी भारतीय बुद्धीबळपटू अन् ग्रँडमास्टर आर्. वैशाली हिच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यामुळे प्रथम वैशाली हिलाही आश्चर्य वाटले; मात्र तिने स्वतःला सावरले. वैशाली हिने या सामन्यात याकुबबोएव याला चितपट केले. सामना जिंकल्यानंतर वैशाली हिने याकुबबोएव याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला नाही. या सूत्रावरून तिने वाद घालणे किंवा स्वतःचे सूत्र मांडणे, असे काहीही न करता थेट कृतीने उत्तर दिले, हे एका अर्थी बरेच झाले. यानंतर याकुबबोएव याच्यावर टीका होऊ लागल्यावर त्याने या कृतीमागे ‘धार्मिक’ कारण असल्याचे सांगितले. ‘इस्लाममध्ये परस्त्रीला स्पर्श करणे निषिद्ध असल्याने हस्तांदोलन केले नाही’, असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर अनेकांनी वर्ष २०२३ मध्ये त्याने भारतीय बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिच्याशी हस्तांदोलन केल्याची याकुबबोएव याला आठवण करून दिली. त्या वेळी त्याने ‘त्या वेळी मी चूक केली होती’, असे सांगितले. ‘मी याविषयी आधी आयोजकांना कल्पना द्यायला हवी होती’, आदी थातुरमातुर कारणे सांगत याकुबबोएव याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. याकुबबोएव याने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टनुसार इस्लामनुसार बुद्धीबळ हा ‘हराम’ (निषिद्ध) खेळ नाही; मात्र जगभरातील अनेक मुल्ला-मौलवींच्या मते बुद्धीबळ हा इस्लामसाठी ‘हराम’ आहे. तसे पाहिले, तर याकुबबोएव हा देश-विदेशांत फिरतो, वृत्तवाहिन्यांना मुलाखती देतो, छायाचित्रे काढतो, हेही सर्व इस्लामनुसार ‘हराम’ आहे, हे त्याला कुणी तरी सांगायला हवे. असो. वास्तविक याकुबबोएव ज्या धर्माचा महिमा गात आहे किंवा ‘ज्या धर्मात परस्त्रीला सन्मान दिला जातो’, हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या धर्मातील लोक महिलांवर जे पाशवी अत्याचार करत आहेत, ते लपून राहिलेले नाहीत. परस्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण जर इस्लाममध्ये दिली जाते, तर त्याच धर्माचे नाव घेणार्‍या लोकांनी भारतात ‘लव्ह जिहाद’ करून लाखो तरुणींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. जर या धर्मात परस्त्रीचा खरोखरच सन्मान केला जात असता, तर राणी पद्मिनी हिच्यासमवेत ५० सहस्र राजपूत स्त्रियांनी जोहार केला नसता. खेळाडू किंवा सामान्य व्यक्ती याने धर्मपालन करण्याविषयी कुणालाही आडकाठी नसावी; मात्र त्यात दिखाऊपणा नसावा. याकुबबोएव याच्या कृतीतून हा फोलपणा आणि त्याहून अधिक धर्मांधता दिसून आली. इस्लामी देशांतील खेळाडू ज्या वेळी मुसलमानेतर आणि त्याहून अधिक हिंदूंसमवेत खेळतात, त्या वेळी तो केवळ खेळ न रहाता ‘जिहाद’ असतो. क्रिकेटमध्ये याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. अनेक पाकिस्तानी खेळाडूंनीही याविषयी भाष्य करून ‘भारतासमवेत खेळणे, हा जिहाद आहे’, असे म्हटले जाते. या कारणास्तवच सामन्याच्या वेळी अनेक भारतीय खेळाडूंना इजा पोचवणे, त्यांच्या विरोधात आक्रमक हावभाव करणे आदी कुकृत्ये करतांना दिसतात. त्यामुळे याकुबबोएव याची कृती हलक्यात घेऊ नये. हा केवळ हस्तांदोलन न करण्याचा विषय नाही. यामागील मानसिकताही समजून घ्यायला हवी. तूर्तास तरी ‘खेळाला धर्म नसतो’ किंवा ‘खेळतांना धर्म बाजूला ठेवा’, असे म्हणणार्‍यांची टोळी कुठल्या बिळात लपली आहे ? हा प्रश्न आहे !

गीतोपदेश आणि प्रशासन !

 

उत्तरप्रदेशातील संभलचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया यांनी वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेणे, हा एक सुखद धक्का म्हणावा लागेल. मागील बरीच वर्षे आय.ए.एस् अधिकारी किंवा प्रशासनातील अधिकारी हे त्यांची निधर्मी प्रतिमा जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतांना दिसत असत; मात्र मागील काही वर्षांपासून हे चित्र पालटले आहे. अधिकार्‍यांनी मंदिरांमध्ये जाणे, पूजा करणे यांसारखी वृत्ते समोर येत आहेत. त्यातही सध्या डॉ. पेन्सिया यांचे नाव भारतभर गाजत आहे. संभलमधील मुसलमानबहुल भागांमध्ये हिंदूंची प्राचीन मंदिरे मुक्त करण्याची जी मोहीम हाती घेण्यात आली आहे, त्याचे नेतृत्व डॉ. पेन्सिया करत आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले, सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि नंतर आय.ए.एस्. झालेले डॉ. पेन्सिया यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. उत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार जरी कार्यरत असले, तरी मुसलमानबहुल भागांमधील हिंदूंची कह्यात घेतलेली मंदिरे सोडवणे आणि सरकारचा आदेश कार्यान्वित करणे, हे वाटते, तेवढे सोपे नाही. त्यासाठी इच्छाशक्तीच लागते. ही इच्छाशक्ती डॉ. पेन्सिया यांनी दाखवली. ती दाखवतांना त्यांना दबाव आला नसेल का ? त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले नसेल का ? त्यांचे सहकारी, तसेच पोलीस आणि प्रशासन यांची कारवाई करण्यासाठी मानसिकता बनवणे, हे आव्हान पेलणे डॉ. पेन्सिया यांनी कसे पेलले असेल ? याचे उत्तर ते करत असलेल्या साधनेत आहे. यावरून साधनेचे महत्त्व अधोरेखित होते.

कोणत्याही वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीमध्ये स्थिरता, तत्परता, निर्णयक्षमता आदी गुणांचा समुच्चय असणे आवश्यक असते. काही जणांमध्ये हे गुण उपजत असतात, काही जण कष्ट करून किंवा अनुभवाने ते आत्मसात करतात. तरीही आपत्कालीन किंवा कसोटीच्या वेळी संयम दाखवून योग्य निर्णय घेणे, हे बहुतांश जणांना शक्य नसते. त्यामुळे गुण आत्मसात करणे चांगलेच; मात्र योग्य वेळी ते उपयोगात आणण्यासाठी मनोबल हवे. हे मनोबल वाढवण्यासाठी ‘गीतोपदेश’ सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. सध्या मुलांना शाळांमध्ये गीता शिकवण्यात यावी, यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. शासनाच्या या निर्णयाला ‘शिक्षणाचे भगवेकरण’ असे संबोधून विरोधक, निधर्मीवादी आणि पुरो (अधो) गामी त्याच्यावर टीका करत आहेत. वास्तविक गीतेमध्ये जी उदात्त शिकवण देण्यात आली आहे, त्यावरून मुलांनाच नव्हे, तर प्रशासनातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनाही ती शिकवणे अन् त्याही पुढे जाऊन ती आत्मसात करायला लावणे आवश्यक आहे. जनतेच्या तक्रारी सातत्याने न कंटाळता ऐकणे आणि त्यांचे निवारण करणे, ही सोपी गोष्ट नाही. त्याही पुढे जाऊन कोणत्याही मोहाला न भुलता, म्हणजेच स्वहिताचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करणे महत्त्वाचे असते. अशा सर्व प्रसंगांना, परिस्थितीला सामोरे जाऊन आत्मोद्धार कसा साध्य करायचा, हे गीतेमुळे साध्य होऊ शकते. त्यामुळे गीतोपदेश देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावर मोहीम हाती घ्यावी !

इस्लामी देशातील खेळाडूंसाठी खेळ हे ‘जिहाद’चे माध्यम असते, हे लक्षात घ्या !