निरोगी जीवनासाठी व्यायाम – ४६
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. आतापर्यंत आम्ही या लेखमालेतून ‘व्यायामाचे महत्त्व, आजारानुसार योग्य व्यायाम’ इत्यादी माहिती दिली आहे, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसनही केले आहे. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगिकारण्याचा हा प्रवास आपणा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘अर्धांगवायू’, या आजाराची माहिती आणि या आजारात व्यायामाचे होणारे लाभ’ जाणून घेऊया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/874616.html
१. अर्धांगवायूमुळे व्यक्तीच्या मेंदूचा एखादा भाग निकामी होणे आणि शरिराच्या त्या भागाचे नियंत्रण सुटून त्याची हालचाल बंद किंवा विक्षिप्त होणे
‘पूर्ण शरिराला नियंत्रित करणार्या मेंदूला रोग होणे’, हे ऐकायला भयावह वाटते. मेंदूचा रोग झालेल्या व्यक्तीला ‘स्वतःचा तोल सांभाळणे, हाता-पायांची हालचाल सुरळीतपणे करणे आणि स्पष्टपणे बोलणे’, अशा अनेक क्रियांमध्ये बाधा निर्माण होते.
मेंदूच्या अनेक आजारांपैकी ‘अर्धांगवायू’ हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा अल्प पडल्याने किंवा मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदूचा एखादा भाग निकामी होतो. मेंदूचा भाग हात, पाय किंवा चेहरा या भागांचे नियंत्रण करत असल्याने अर्धांगवायूमुळेे त्याचे नियंत्रण सुटते आणि शरिराच्या त्या भागाची हालचाल बंद होते किंवा विक्षिप्त होऊ लागते. बाह्यतः बघायचे झाले, तर अशा रुग्णाचा हात, पाय किंवा चेहरा विक्षिप्त स्थितीत रहात असल्याचे आढळते.
२. व्यायामामुळे होणारे लाभ !

२ अ. व्यायामामुळे मेंदूमध्ये सुप्त स्वरूपात असलेल्या नसा कार्यान्वित होऊन त्या भागाचे कार्य करू शकणे : मेंदूचा हा निकामी झालेला भाग पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता अत्यल्प असते. त्यामुळे ‘रुग्णाची स्थिती पूर्ववत् होण्याची शक्यताही अल्प असते’, असे पूर्वी समजले जात असेे. अर्धांगवायूमुळे शरिराचा निकामी झालेला भाग बरा होत नसला, तरी ‘व्यायामामुळे मेंदूमध्ये सुप्त स्वरूपात असलेल्या नसा कार्यान्वित होऊन त्या भागाचे कार्य करू शकतात. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या सुदृढ नसा हे कार्य (adjustment) करून पूर्णत्वास नेऊ शकतात’, हे गेल्या काही दशकांत शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
२ आ. विशिष्ट प्रकारचे व्यायाम अनेक मास केल्यावर रुग्ण स्वावलंबी होऊन समाधानाने जगू शकणे : अर्धांगवायू झाल्यावर पहिले काही आठवडे औषधे घेणे अनिवार्य असते. त्यानंतर ‘व्यायाम’ हा मुख्य उपचार असून त्याच्या जोडीला किंवा ‘पुन्हा अर्धांगवायू होऊ नये’, यासाठी औषधांचा उपयोग होतो. ‘व्यायाम न करणार्या रुग्णांपेक्षा व्यायाम करणारे रुग्ण स्वावलंबी होण्याची शक्यता ६० टक्के अधिक असते आणि मृत्यूची किंवा रुग्णालयामध्ये भरती होण्याची शक्यता ४३ टक्के अल्प असते’, असेे लक्षात आले आहे. रुग्णाच्या आजाराचेे स्वरूप पाहून तज्ञांनी सांगितलेले विशिष्ट प्रकारचे व्यायाम अनेक मास केले की, रुग्णाची स्थिती पूर्ववत् होते किंवा न्यूनतम तो स्वावलंबी होऊ शकतोे. त्यामुळे तो समाधानाने जगू शकतो.
३. सशक्त व्यक्तीने व्यायाम केल्यास तिचा कायापालट होऊ शकणे
शरिराच्या साध्या हालचाली केल्याने रुग्णाच्या मेंदूवर पुष्कळ प्रभाव पडतो, तर ‘सशक्त व्यक्तीने व्यायाम केल्यावर त्याचे मन, बुद्धी आणि व्यक्तीमत्त्व यांवर किती परिणाम होईल ?’, याची कल्पना करावी. या विचाराने आणि उत्साहाने व्यायाम केला, तर सशक्त व्यक्तींचा कायापालट होणार नाही का ?’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (१४.१.२०२५)