निरोगी जीवनासाठी व्यायाम – ४४
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम यांची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात ‘शरिरात परिवर्तन कशा प्रकारे होते आणि योग्य व्यायाम केल्याने अन् काळजी घेतल्याने आजारपणातून बाहेर पडणे कसे शक्य होते’, यांविषयी जाणून घेऊया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/873902.html

१. सृष्टी परिवर्तनशील असणे आणि ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, या नियमानुसार शरिरातही परिवर्तन होत असणे
‘दिवस-रात्र, ऊन-पाऊस, थंडी -ऊन, अशी सृष्टीतील अनेक परिवर्तने आपण प्रतिदिन बघतो. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या नियमानुसार याप्रमाणेच शरिरातही काहीतरी होत असते. ‘आपली प्रकृती आज जशी असेल, तशीच उद्या असेल’, असे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. ‘या सृष्टीत एकच क्रिया अविरतपणे चालू आहे, ती म्हणजे ‘परिवर्तन.’
२. आपल्या शरिरात डोळ्यांना न दिसणारे पालट होतच असणे आणि शरिराने प्रति ४ मासांनी नवीन रूप धारण केलेले असणे
आपले शरीर हे नेहमीप्रमाणेच दिसत असले, तरीही आपल्या डोळ्यांना न दिसणारे पालट शरिरात होतच असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, ‘प्रति काही दिवसांनी शरिराचे काही भाग पूर्णपणे नवीन झालेले असतात, उदा. आपल्या त्वचेच्या पेशी प्रति ४ आठवड्यांनी पालटलेल्या असतात, तर पोटातील पेशी प्रति ५ दिवसांनी पालटतात. रक्तातील काही पांढर्या पेशी प्रति२ दिवसांनी नवीन निर्माण होतात, तर लाल रक्तपेशी अधिकाधिक १२० दिवस टिकतात आणि नंतर नवीन पेशी निर्माण होतात.’ तसे पहायला गेलो, तर ‘आपल्या शरिराने प्रति ४ मासांनी नवीन रूप धारण केलेले असते’, असे म्हणू शकतो.
३. नित्य सवयींकडे दुर्लक्ष केल्यास हळूहळू स्वास्थ्याला उतरती कळा लागणे आणि आजारपण चालू झाल्यास त्यातून बाहेर पडण्यास दुप्पट श्रम करावे लागणे
सृष्टीच्या या अद्भुत लीलेतून आपल्याला महत्त्वाचा बोध घेण्यासारखा आहे. आपण शरिराला कधीच गृहीत धरू शकत नाही. सर्व चांगले चालू असतांना आपण नित्य सवयींकडे (वेळेत उठणे, दात घासणे, व्यायाम करणे, स्नान करणे, चांगले जेवण करणे इत्यादी) दुर्लक्ष केल्यास हळूहळू स्वास्थ्याला उतरती कळा लागते. एकदा आजारपण चालू झाले की, त्यातून बाहेर पडायला दुप्पट श्रम करावे लागतात.
४. शरिरात सतत नवीन पेशी निर्माण होणे अन् पथ्य पाळल्यावर आणि उपचार केल्यावर कालांतराने स्वास्थ्य सुधारत असणे अन् शरिरात सतत होत असलेल्या या परिवर्तनामुळेच अनेक रुग्ण गंभीर आजारातून बाहेर पडत असणे
आपण रुग्णाईत आहोत, यासाठी निराश होण्याचीही आवश्यकता नाही. आपल्या शरिरात सतत नवीन पेशी निर्माण होत असतात. पथ्य पाळल्यावर आणि उपचार केल्यावर आपण कालांतराने स्वास्थ्य सुधारण्याची अपेक्षा करूच शकतो. अनेक रुग्ण गंभीर आजारांतून बाहेर पडल्याची काही उदाहरणे ऐकली असतील, ती शरिरात सतत होत असलेल्या या परिवर्तनांमुळेच आहेत.
५. शरिराला योग्य त्या प्रमाणात पोषण, विश्रांती आणि उत्तेजना दिली, तर रुग्ण व्यक्ती लक्षणीय ध्येय साधू शकणे
‘हृदयविकार, अर्धांगवायू (लकवा मारणे) मेंदूचे किंवा अन्य गंभीर आजार वगळता, मान, कंबरदुखी, सांधेदुखी, स्नायू-नसा यांवरील ताण, अशक्तपणा, कृशपणा, लठ्ठपणा अशा अनेक आजारांतून बाहेर पडणे’, हे आपल्या आवाक्यातील आहे. शरिराला योग्य त्या प्रमाणात पोषण, विश्रांती आणि उत्तेजना दिली, तर आपण लक्षणीय ध्येय साधू शकतो.
६. प्रत्येक व्यक्तीसाठी शारीरिक प्रगती करण्याच्या वाटा प्रकृतीने आखलेल्या असणे; मात्र व्यक्तीने योग्य मार्गदर्शनानुसार चिकाटीने व्यायाम करणे महत्त्वाचे असणे
अनेक जण सांधेदुखी, कमरेचे दुखणे, स्नायू-नसांचे दुखणे अनेक वर्षे सहन करत रहातात. त्यावर औषधोपचारांनी काही परिणाम होत नाही; म्हणून हतबलही होतात. आताच्या अनुभवांनुसार सांधेदुखीचे निवारण २ – ३ मासांत, तर स्नायूंवरील ताण काही आठवड्यांतच दूर होतो. नसांच्या त्रासांतही ३ – ४ मासांत चांगला प्रभाव पडतो. अलीकडे हाडे आणि सांधे यांच्या काही शस्त्रकर्मांनंतर २ – ३ दिवसांतच रुग्ण चालू, फिरू शकतो आणि तो पूर्णपणे पूर्ववत् होण्यास केवळ दोन ते अडीच मास पुरतात. हे सर्व योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्याने शक्य होते. व्यक्ती सशक्त किंवा अशक्त असो, प्रत्येकासाठी शारीरिक प्रगती करण्याच्या वाटा प्रकृतीने आखलेल्या असतात. केवळ योग्य दिशादर्शन घेऊन चिकाटीने अवलोकन करणे महत्त्वाचे आहे.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (४.१.२०२५)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise