निरोगी जीवनासाठी व्यायाम – ४३
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गाेनॉमिक्स’ (ergonomics) चे तत्त्व आणि आजारानुसार योग्य व्यायाम’, यांविषयीची माहिती सादर करणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘व्यायामातील सातत्य आणि स्वतःतील क्षमतेचा योग्य वापर करून बळ वाढवण्यासाठी प्रयत्न कसा करायचा ?’, त्याविषयी जाणून घेऊया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872239.html
१. शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असणे
आपल्याला अनेक जंतूंपासून सुरक्षित ठेवणारी आणि आजारी पडल्यास संसर्गाशी लढून आपल्याला बरे करणार्या आपल्या रोगप्रतिकारक शक्तीत सतत वाढ होत असते. मलेरिया, विषमज्वर (टायफॉईड) इत्यादींसारख्या आजारांमधून लवकर बरे होण्याचे प्रमाण आता पूर्वीपेक्षा वाढले आहे. अगदी कोरोना महामारीचेच उदाहरण घ्या. त्यावर कालांतराने मात करण्याची क्षमता शरिरानेच निर्माण केली आहे.

२. प्रत्येक क्षणी अद्ययावत् होणार्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच मनुष्य निरोगी राहू शकत असणे
आपण जेव्हा एखाद्या नवीन जंतूंच्या संपर्कात येतो, तेव्हापासूनच शरीर त्याविरुद्ध लढायला विशिष्ट पांढर्या रक्तपेशी सिद्ध करायला आरंभ करते. एकदा तो रोग बरा झाला, तरीही जंतूंशी पुन्हा संपर्क आला, तर शरीर लढण्यास सिद्ध असते. अशा प्रकारे प्रत्येक क्षणी अद्ययावत् होणार्या या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच आपण निरोगी राहू शकत आहोत. सृष्टी आणि शरीर कधीही एकाच स्थितीत न थांबता सतत नवीन पालट करत असते. त्यात कधीच खंड पडत नाही.
३. अनेक जण नैसर्गिकता म्हणून आपल्या आहारात पालट करून सेंद्रीय अन्न, देशी तूप, गीर गायीचे दूध अशा गोष्टींचा आहारात समावेश करतात. निसर्गातील ‘सातत्य, शिस्त आणि परिवर्तन’, हे गुण अंगी बाणवून स्वतःची प्रगती करणे आवश्यक आहे.
४. व्यायाम करतांना सातत्य, क्षमतेचा योग्य वापर आणि व्यायामाचा कालावधी वाढवल्यास स्नायूंची दीर्घकाळ कार्यरत रहाण्याची क्षमता बळावणे
व्यायामातील सातत्य हे तीव्रता, कालावधी आणि वारंवारता यांमध्ये असायला हवे.
अ. आपण जर वजन उचलण्याचे व्यायाम करत असू, तर आपल्याला झेपेल इतके वजन उचलण्यात सातत्य असले, तरच आपली क्षमता वाढते. आपली क्षमता चांगली असतांना आपण अल्प तीव्रतेचे वजन उचलल्यास आपली क्षमता लवकर वाढत नाही.
आ. धावणे, चालणे आणि पोहणे, असे व्यायाम करतांना तीव्रता वाढवणे, हे गती आणि चढाव (incline) पालटल्याने साध्य होते. व्यायाम करण्याचा कालावधी वाढवल्यानेही स्नायूंची दीर्घकाळ कार्यरत रहाण्याची क्षमता बळावते.
इ. योगासने करतांना एक आसन किती वेळ आणि किती वेळा करतो, यामध्ये पालट करून प्रगती साध्य करता येते, तसेच एकेका आसनात सोप्या आसनांपासून कठीण आसनांपर्यंतचे टप्पे असतात. त्यानुसार तीव्रता वाढवत जाऊ शकतो.
५. व्यायाम करतांना सर्व बारकावे जाणून घेऊन केल्यास त्यातून शरिरावर पडणारा ताण जाणवत एक वेगळेच समाधान मिळत असणे आणि यासाठी व्यायाम मनापासून उत्साहाने करणे आवश्यक !
व्यायाम सर्व बारकाव्यांनिशी करण्यामध्ये व्यायामातील शिस्त दडलेली आहे. शाळेत शिकत असतांना ज्यांना कवायतीचे प्रकार करण्याचा कंटाळा असतो, ते प्रशिक्षकाचे लक्ष नसतांना चांगलीच सवलत घेतात. त्याचप्रमाणे व्यायाम केवळ करायचे; म्हणून केल्याने आपण त्याच्या लाभांपासून वंचितच रहातो. व्यायाम करतांना सर्व बारकावे जाणून घेऊन करत राहिलो, तर त्यातून शरिरावर पडणारा ताण जाणवत एक वेगळेच समाधान मिळते. यासाठी व्यायाम मनापासून उत्साहाने करणे आवश्यक आहे. लक्षपूर्वक व्यायाम केल्याने केवळ व्यायाम करण्याची क्षमताच नाही, तर दिवसभरातील कार्यक्षमताही अधिक प्रमाणात वाढल्याचे संशोधनातून निदर्शनास आले आहे.
६. व्यायामामध्ये प्रगतीकारक पालट करत गेल्याने शारीरिक क्षमता तर वाढतेच; पण शरीर आणि मन यांच्या टप्प्याला एक नवीन चेतना आल्याचे जाणवते अन् व्यायाम करण्यात अधिक रुची निर्माण होते.
अशा प्रकारे व्यायाम करतांना वरील सूत्रे लक्षात घेऊन स्वत:च्या क्षमतेचा अभ्यास करूया किंवा तज्ञांच्या साहाय्याने आवश्यक ते पालट करत बलवर्धन करूया !’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (४.१.२०२५)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise