भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची शरद पवार यांच्यावर टीका
मुंबई – दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीनसारखा ‘लष्कर-ए-तोयबा’चा हस्तक आणि इस्लामी आतंकवादी याच्या ‘एन्काऊंटर’मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहा यांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती. दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही, हे माननीय शरद पवार विसरले आहेत, अशा परखड शब्दांत भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतांना ‘तडीपारीची शिक्षा झालेले गृहमंत्री याआधी झालेले नाहीत’, असे म्हटले होते. यावर विनोद तावडे यांनी ‘एक्स’द्वारे प्रत्युत्तर दिले.
विनोद तावडे यांनी म्हटले, ‘‘दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते, तर त्यांच्या संदर्भातही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का ? श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने कारागृहात होते, ते नंतरच्या काळात मंत्री आणि पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयीही हेच म्हटले असते का ? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितले पाहिजे.’’