प्रामाणिक आणि इतरांना साहाय्य करणारे ठाणे येथील कै. यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) !

१.१.२०२५ या दिवशी ठाणे येथील यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) यांचे निधन झाले. १३.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. यशवंत शहाणे

१. सौ. रूपाली अभय वर्तक (कै. यशवंत शहाणे यांची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सौ. रूपाली वर्तक

१ अ. ‘बाबांचे जीवन शिस्तबद्ध होते. त्यांनी साधना, व्यायाम, वाचन आणि अन्य कामे यांत बाबांनी स्वतःला एवढे व्यस्त ठेवले होते की, त्यांना वेळ पुरत नसे.

१ आ. ‘काटकसर’, ‘चिकाटी’, ‘परिपूर्ण कृती करणे’ आणि ‘संयम’, हे गुण त्यांच्यात होते.

१ इ. साधनेला आरंभ आणि मुलीला साधना करण्यास प्रवृत्त करणे : आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर अभ्यासवर्ग घेतले. त्याचे विज्ञापन त्या वेळच्या वर्तमानपत्रात येत असे. ते विज्ञापन वाचून माझे बाबा त्या अभ्यासवर्गांना जाऊ लागले. नंतर ते संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना आणि सेवा करू लागले. मी महाविद्यालयात असतांना त्यांनीच मला साधना आणि सेवा करण्यास प्रवृत्त केले.

१ ई. केलेल्या विविध सेवा : आरंभीच्या काळात ‘सत्संग घेणे, प्रवचने करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे अन् त्यांसाठी विज्ञापने घेणे, इंग्रजी ‘बालसंस्कार डॉट कॉम’, या संकेतस्थळाच्या संदर्भातील सेवा करणे’, या सेवा त्यांनी केल्या.

१ उ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चुका व्हायला नकोत’, अशी तळमळ असणे : बाबांनी तरुण वयात ‘केसरी’ या वृत्तपत्रात काम केले होते. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करत असत आणि त्यातील चुका मला सांगत असत. ‘सनातन प्रभात’मध्ये चुका व्हायला नकोत’, अशी त्यांची पुष्कळ तळमळ होती. कधी त्या चुकांवर माझ्याकडून स्पष्टीकरण दिले जात असे. तेव्हा ते मला मुळापर्यंत जाऊन चुकीचा अभ्यास करण्यास सांगत असत आणि ‘कार्यपद्धतीत काही चूक आहे का ?’, याविषयी विचार करण्यास भाग पाडत.

१ ऊ. साधनेची मूलभूत तत्त्वे अंगिकारलेली असणे : बाबांनी गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील काही मूलभूत तत्त्वे अंगिकारली असल्यामुळे ते शेवटपर्यंत व्यष्टी स्तरावर साधनारत राहू शकले. ते सेवा करत नसले, तरी मनाने ‘सनातन’मध्येच होते. शेवटच्या काळात त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन पंचांग’ यांतील विज्ञापने पडताळणे इत्यादी प्रासंगिक सेवा केल्या.

१ ए. इतरांना साहाय्य करणे : शेवटच्या काळात त्यांनी साधकांच्या मुलांना इंग्रजीचे व्याकरण विनामूल्य शिकवले. ते अनेकांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करून साहाय्य करत असत.’

२. सौ. रूपाली अभय वर्तक (कै. यशवंत शहाणे यांची मुलगी), श्री. अभय विजय वर्तक (कै. यशवंत शहाणे यांचे जावई) आणि श्री. योगेश्वर कौस्तुभ फाटक (कै. यशवंत शहाणे यांच्या मुलीचा भाचा (नणंदेचा मुलगा)), पनवेल.

श्री. अभय वर्तक

२ अ. रुग्णाईत असतांनाही शांत आणि स्थिर असणे : ‘१४.११.२०२४ या दिवशी बाबांना (यशवंत शहाणे यांना) पक्षाघाताचा झटका आला. तेव्हापासून दीड मासाच्या काळात ३ वेळा त्यांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. त्या कालावधीत त्यांनी एकदाही चिडचिड केली नाही किंवा ते एकदाही रागावून बोलले नाहीत. पुष्कळ त्रास होत असूनही ते कधी अस्वस्थ झाले नाहीत.

२ आ. सकारात्मकता आणि स्वीकारण्याची वृत्ती : रुग्णाईत असतांना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही त्यांना सांगितलेले प्रत्येक सूत्र ते स्वीकारत होते. ते पूर्णपणे सकारात्मक होते. ते एवढ्या समजूतदारपणे वागत होते की, आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनाही त्याचे आश्चर्य वाटले.

२ इ. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असूनही त्यांची विनोदबुद्धी जागृत होती. त्यामुळे त्यांच्या त्याही स्थितीत आम्हाला हसू यायचे आणि वातावरण हलकेफुलके व्हायचे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ६.१.२०२५)