Indian Dies In Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात आणखी एका भारतियाचा मृत्यू

  • नोकरीचे आमीष दाखवून भारतियांची सैन्यात करण्यात आली आहे भरती

  • रशियाने त्याच्या सैन्यात भरती असलेल्या भारतियांना आश्‍वासन देऊनही परत पाठवले नसल्याचे उघड

मॉस्को (रशिया) – गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौर्‍याच्या वेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आश्‍वासन दिले होते, ‘युक्रेनमध्ये रशियाच्या वतीने लढणार्‍या भारतीय सैनिकांना परत पाठवले जाईल’; परंतु तसे झाले नाही. युक्रेन युद्धात आणखी एका भारतियाचा मृत्यू झाला आहे. बिनिल टी.बी. (वय ३२ वर्षे) असे या सैनिकाचे नाव आहे. बिनिल केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील रहिवासी होता. बिनिलचा नातेवाईक जैन टी.के. (वय २७ वर्षे) हाही युक्रेनच्या युद्धात गंभीररित्या घायाळ झाला होता. युक्रेनने केलेल्या ड्रोन आक्रमणात बिनिलचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रशियाच्या सैन्यासाठी लढणार्‍या केरळमधील भारतीय सैनिकाचा हा दुसरा मृत्यू आहे. या भारतियांना रशियाच्या सैन्यात इलेक्ट्रिशियन, स्वयंपाकी, प्लंबर यांसारख्या साहाय्यक कर्मचार्‍यांच्या नोकरीचे आमिष दाखवून युद्धाच्या आघाडीवर पाठवले जात आहे.

१. बिनिलचा नातेवाईक सनिश म्हणाला की, बिनिलची पत्नी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात होती. तिला आता कळवण्यात आले आहे की, बिनिलचा मृत्यू झाला आहे.

२. भारतीय अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांना रशियाच्या सैन्याकडून याबद्दल माहिती मिळाली आहे.

३. केरळमध्ये परदेशात रहाणारे संघटनेचे अधिकारी अजित कोलासरी म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही बिनीलला परत आणण्याचा प्रयत्न करत होतो. केरळमधील किती लोक अजूनही रशियाच्या सैन्यात अडकले आहेत, हे आम्हाला ठाऊक नाही. अडचणीत आल्यानंतर जेव्हा ते आम्हाला सांगतात, तेव्हाच आम्हाला त्याबद्दल माहिती मिळते.

४. बिनिल आणि त्याचा नातेवाईक टीके दोघेही गेल्या काही महिन्यांपासून भारतात परतण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्यांना तसे करण्याची अनुमती देण्यात आली नाही. बिनिलने भारतीय दूतावासाकडेही साहाय्य मागितले होते; पण कोणतीही सुनावणी झाली नाही. बिनिलने त्याच्या शेवटच्या संदेशात म्हटले होते की, त्याला युद्धाच्या आघाडीवर पाठवण्यात आले आहे, जिथे अधिक धोका आहे.

५. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, रशियाचे सैन्य त्यांना निघून जाण्यास सांगत नाही, तोपर्यंत ते कोणतेही साहाय्य देऊ शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

रशियाने आश्‍वासन देऊनही भारतियांना परत न पाठवणे, हा भारताचा विश्‍वासघात आहे. केवळ अमेरिकाच नाही, तर भारताला आता रशियापासूनही सतर्क रहायला हवे, हे लक्षात येते !