महाविद्यालयाने विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची दिली होती अनुमती !
पणजी, १७ जानेवारी (वार्ता.) – सांखळी येथील शासकीय महाविद्यालयाने गणवेश परिधान करण्यासंबंधी नवीन धोरण अंगीकारतांना विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची अनुमती दिल्याचे समजल्यावर बजरंग दलाच्या गोवा विभागाने महाविद्यालयाच्या या कृतीला जोरदार विरोध केला. विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची अनुमती दिल्यास महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थी महाविद्यालयात भगवी शाल, पगडी आणि धोतर नेसून महाविद्यालयात येण्यास प्रारंभ करणार असल्याची चेतावणी बजरंग दलाने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिली. बजरंग दलाच्या आंदोलनानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गावस यांनी १७ जानेवारी या दिवशी एक नोटीस काढून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येतांना महाविद्यालयाचा गणवेश परिधान करूनच येण्यासंबंधी नोटीस प्रसिद्ध केली आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गावस नोटिसीत म्हणतात, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षी (वर्ष२०२४-२५मध्ये) विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गणवेश परिधान करूनच यावे, अन्यथा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.’’
बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेले महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच इतर सदस्य यांनी १७ जानेवारी या दिवशी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महाविद्यालय प्रशासनाने विशिष्ट समुदायातील विद्यार्थिनींना ‘हिजाब’ घालण्याची अनुमती दिल्याचा विषय मांडला. बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेले विद्यार्थी आणि सदस्य म्हणाले, ‘‘काही विद्यार्थ्यांना त्यांचा धार्मिक पोशाख घालण्यास अनुमती देणे आणि इतरांवर गणवेश परिधान करण्याचा नियम लादणे, हा विद्यार्थ्यांशी भेदभाव करण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांमध्ये समानता यावी आणि त्यांना शिस्त लागावी, तसेच सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळावे, हा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी गणवेश घालण्यामागील उद्देश आहे.’’