
प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यात माता अमृतानंदमयी यांच्या ‘अमृता हॉस्पिटल’कडून २ मोठी अत्याधुनिक फिरती रुग्णालये (मोबाईल मेडिसीन युनिट) असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘अमृता हॉस्पिटल’ कोच्चि (केरळ) आणि फरिदाबाद येथील रुग्णालयांकडून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या फिरत्या रुग्णालयांसमवेत एकूण १३ डॉक्टर आणि ६० कर्मचारी असा ताफा आहे. कुंभक्षेत्री सेक्टर क्रमांक ७ येथे असलेल्या अमृतानंदमयी यांच्या तंबूच्या ठिकाणी १७ जानेवारी या दिवशी एका रुग्णावर याच रुग्णालयात एक छोटे शस्त्रकर्मही डॉक्टरांनी केले. या ताफ्यातील डॉक्टर महाकुंभमेळ्यातील सरकारच्या रुग्णालयातही सेवा देत आहेत.

काय आहे मोबाईल मेडिसीन युनिट ?

‘मोबाईल मेडिसीन युनिट’विषयी अधिक माहिती देतांना या युनिटचे समन्वयक श्री. जयन यांनी सांगितले की, हे अत्याधुनिक सुविधा असलेले फिरते रुग्णालय आम्ही गत १८ हून अधिक वर्षांच्या रुग्णसेवेच्या अनुभवातून सिद्ध करून घेतले आहे. यात अत्याधुनिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरी), इसीजी यंत्र, इको सुविधा, अल्ट्रासाऊंड सुविधा, एक्स रे सुविधा, नेबुलायझर, एक छोटे शस्त्रकर्मगृह, अतीदक्षता विभाग इत्यादी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे एक फिरते रुग्णालय असून अशा २ रुग्णालयांची व्यवस्था केली आहे. ही बस सौर ऊर्जा, थेट वीज, विद्युत् जनित्र अशा विविध ऊर्जेवर चालू शकते.