छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज माझे नाव दुसरेच काहीतरी असते !

राज्‍यपाल श्री. सी.पी. राधाकृष्‍णन् यांचे प्रतिपादन

राज्‍यपाल श्री. सी.पी. राधाकृष्‍णन्

कोल्‍हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचा दीक्षांत समारंभ !

कोल्‍हापूर – विद्यापिठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्‍थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्‍कृष्‍ट पुतळा त्‍यांच्‍या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. मी फक्‍त ६ वर्षांचा असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जीवनाविषयी शिकलो. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज माझे नाव दुसरेच काहीतरी असते. मी सी.पी. राधाकृष्‍णन् म्‍हणून येथे नसतो, असे वक्‍तव्‍य मा. राज्‍यपाल तथा शिवाजी विद्यापिठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्‍णन् यांनी १७ जानेवारी या दिवशी येथील शिवाजी विद्यापिठाच्‍या दीक्षांत समारंभात बोलतांना केले आहे.

राज्‍यपाल म्‍हणाले की, कोल्‍हापूर ही श्री महालक्ष्मी अंबाबाईची पवित्र भूमी आहे. शिवाजी विद्यापिठाच्‍या ६१ व्‍या वार्षिक दीक्षांत समारंभात तुमच्‍यासोबत उपस्‍थित रहातांना मला पुष्‍कळ आनंद होत आहे. आजच्‍या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्‍त करणार्‍या सर्व पदवीधर विद्यार्थ्‍यांचे मी अभिनंदन करतो. राष्‍ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदक आणि पीएच्.डी. मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मी विशेषतः अभिनंदन करतो. कोल्‍हापूर ही महान शासक छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, जे देशभरात शिक्षणाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्‍या समुदायांमध्‍ये प्रगतीशील धोरणांसाठी ओळखले जातात.