
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्या ‘व्हाईट हाऊस’वर २२ मे २०२३ या दिवशी आक्रमण केल्याच्या प्रकरणी भारतीय नागरिक साई वर्षित कंडुला (वय २१ वर्षे) याला ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. चौकशीमध्ये त्याने सांगितले होते की, त्याला सरकारवर नियंत्रण मिळवून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची हत्या करायची होती. त्यासाठी ६ मासांपासून नियोजन केले होते.
१. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार या आक्रमणाचा उद्देश ‘अमेरिकेतील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथवून टाकणे आणि नाझी विचारसरणीने प्रेरित हुकूमशाही प्रस्थापित करणे’, हा होता.

२. कंडुला याने भाड्याने घेतलेल्या ट्रकद्वारे आक्रमण केले होते. त्याने व्हाईट हाऊस आणि प्रेसिडेंट पार्क यांचे संरक्षण करणार्या कुंपणाला ट्रक धडकवला होता. पहिल्या धडकेनंतर त्याने ट्रक मागे घेतला आणि पुन्हा धडकवण्याचा प्रयत्न केला. दुसर्या प्रयत्नात ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि इंजिनमधून धूर निघू लागला.
३. भारतातील चंदननगर येथे जन्मलेला कंडुला अमेरिकेचा कायमस्वरूपी रहिवासी होता आणि त्याच्याकडे ‘ग्रीन कार्ड’ (अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांना कायमस्वरूपी रहाण्यासाठी दिलेले कार्ड) होते.