‘भूमाता ब्रिगेड’च्या प्रमुख तृप्ती देसाई यांचे गंभीर आरोप

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
पुणे – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर ‘भूमाता ब्रिगेड’च्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘मकोका’ लावण्यात आलेल्या वाल्मिक कराड यांचा दिंडोरीच्या आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे उपाख्य गुरुमाऊली यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे असल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.
१. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील आश्रमामध्ये १५ आणि १६ डिसेंबर या दिवशी वाल्मिक कराड अन् विष्णु चाटे मुक्कामी होते.
२. दिंडोरी हे आध्यात्मिक स्थान आहे. तिथे त्यांना का ठेवले गेले ? त्यांना आश्रमाच्या प्रमुखांनी आश्रय दिला असेल, तर त्याचेही अन्वेषण एस्.आय.टी.च्या अधिकार्यांनी करावे.
३. वाल्मिक कराड यांनी गेल्या वर्षी या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते, त्या प्रकरणी जानेवारी २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना बैठक झाली होती. या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे पुत्र चंद्रकांत मोरे उपस्थित होते. वाल्मिक कराड यांनी मध्यस्थी केल्याने त्यांना आश्रमामध्ये आश्रय दिला असावा, असा संशयही देसाई यांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप !
दिंडोरीचे प्रमुख अण्णासाहेब मोरे ज्यांना ‘गुरुमाऊली’ म्हटले जाते, त्यांच्यावर महिलांनी लैंगिक शोेषणाचे आरोप केले आहेत. त्याविषयी काही महिलांनी आमच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणी आणखी काही पुरावे सापडल्यानंतर पत्रकार परिषद घेऊ. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत, त्याविषयीचा ‘पेन ड्राईव्ह’ उघडला, तर अनेक महिलांचे लैंगिक शोेषण केल्याचे उघड होणार आहे, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. |