
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वर्ष २०१० पासून कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसून गेल्या १४ वर्षांपासून आरोग्य अधिकारी हे प्रभारी स्वरूपात काम पहात आहेत. कोल्हापूर शहराचा सततचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि आरोग्याच्या विविध समस्या पहाता येथे कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश आबीटकर यांना आरोग्य मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्या जिल्ह्यात, विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेत आरोग्य अधिकारी नसणे दुर्दैवी आहे. तरी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमण्यात यावे, या मागणीसाठी आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) हे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्वीकारले. शासनस्तरावर पाठपुरावा चालू आहे, असे त्यांनी शिष्टमंडळास सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, एकवीरा मंदिराचे पुजारी श्री. अनिकेत गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :गेल्या १४ वर्षांपासून आरोग्य अधिकार्याची नेमणूक केली न जाणे ही कोल्हापूर महानगरपालिकेची असंवेदनशीलताच होय ! |