‘पुणे परिवार संस्थे’च्या वतीने मणीपूरमधील नागरिकांना साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम !

पुणे – देशाची सर्व भूमी आपली आहे. त्यामुळे ईशान्य भारताला दूर करून चालणार नाही. मणीपूर इंग्रजांना कधीच जिंकता आले नाही. आवश्यकतेनुसार मणीपूरमधील लोकांना साहाय्य करणे, हे आपले कर्तव्य आहे. अखिल भारताचा विचार करण्याचा पिंड महाराष्ट्राचा आहे. हा पिंड छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पोसला आहे. त्यांनी वसवलेल्या पुण्यातून मणीपूरमधील जनतेला साहाय्य करणे चालू झाले आहे. पुणे येथील लोकांच्या हातून सत्कार्य घडत आहे, असे मत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी मांडले.
मणीपूरमधील नागरिकांना सहकार्य करण्याच्या भावनेतून येथील ५१ हून अधिक गणेशोत्सव मंडळे एकत्र येऊन, काही सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्या सहकार्याने ५ सहस्र ब्लँकेट्स आणि जेवणाच्या भांड्यांचे ५ सहस्र संच मणीपूरमधील नागरिकांना देत आहे. हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम ‘पुणे परिवार संस्थे’च्या वतीने १५ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार टी.एच्. श्यामकुमार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पुणे येथील गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक कार्यातील सहभाग कौतुकास्पद आहे. मणीपूरमधील लोकांना केलेले साहाय्य मोलाचे ठरेल.’’