‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवा ! – मिलिंद एकबोटे

मिलिंद एकबोटे

सातारा, १७ जानेवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र औंध या धर्मक्षेत्राची देवता ही महाराष्‍ट्रातील असंख्‍य कुटुंबांची कुलदेवता आहे; परंतु या ठिकाणी जनावरांच्‍या बाजारात पवित्र गोमाता पशूवधगृहासाठी खरेदी करण्‍यात येते. दुर्दैवाने हा प्रकार यात्रेच्‍या कालावधीत घडतो, हे अत्‍यंत क्‍लेशदायक आहे. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी प्रशासनाने ‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवावी, अशी मागणी ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्‍यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

श्री. मिलिंद एकबोटे म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्रात प्राणी संरक्षण कायदा प्रचलित आहे. या कायद्याप्रमाणे गाय, बैल, कालवड आणि पुनरुत्‍पादनक्षम म्‍हैस अन् तिचे पारडे यांच्‍या वधास पूर्णतः प्रतिबंध आहे. यामुळे महाराष्‍ट्रातील पशूधन सुरक्षित राहिले पाहिजे, तसेच त्‍यांचा वध होता कामा नये. याचे उत्तरदायित्‍व प्रशासनाचे आहे; परंतु पोलीस प्रशासन हे उत्तरदायित्‍व सक्षमपणे पार पाडण्‍यास पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्‍यामुळे श्रीक्षेत्र औंध या तीर्थक्षेत्राच्‍या ठिकाणी महाराष्‍ट्र प्राणी संरक्षण कायद्याची पायमल्ली होते. यामुळे तीर्थक्षेत्राच्‍या पावित्र्याला कलंक लागतो आणि हिंदु समाजाच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍या जातात. ही वस्‍तूस्‍थिती आहे. आठवड्यांच्‍या पशूबाजारात कसाई मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहातात. याकडे स्‍थानिक प्रशासन डोळेझाक करते. पशूंचा बाजार कसाईमुक्‍त झाला, तर पर्यावरणाला उपयुक्‍त परिस्‍थिती निर्माण होईल. शेतातील कामांसाठी बैलांची उपलब्‍धता वाढेल. शेतकरीवर्ग नैसर्गिक शेती करण्‍याकडे वळेल. समाजाला विषमुक्‍त अन्‍न मिळू शकेल. यामुळे जनतेला आरोग्‍याचा लाभ होऊन जीवन रोगमुक्‍त होईल. त्‍यामुळे प्रशासनाने पशूधन वाचवण्‍यास प्राधान्‍य दिले पाहिजे. गोमातेला केवळ ‘राजमाता’ घोषित करून उपयोग नाही, तर गोवंशियांचा वध थांबला पाहिजे. राज्‍याच्‍या पशूसंवर्धन खात्‍याच्‍या अहवालाप्रमाणे दिवसेंदिवस गोवंश आणि म्‍हशी यांच्‍या संख्‍येत घट होत आहे. त्‍यामुळे ठिय्‍या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.