जामसंडे, देवगड शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास साहाय्य होणार
देवगड – जामसंडे, देवगड शहराला पाणीपुरवठा करणार्या तालुक्यातील दहिबांव येथील अन्नपूर्णा नदीवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जामसंडे, देवगड शहराचा पाणीप्रश्न लवकर सुटण्यास साहाय्य होणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही मान्यता मिळाली आहे.
देवगड शहराला प्रतिवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या गेली अनेक वर्षे आहे. त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हती. त्यामुळे मंत्री राणे यांनी कणकवली येथे देवगड शहराच्या पाणीप्रश्नाविषयी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये देवगड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ले-सातंडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करणे आणि जोपर्यंत ही योजना कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत देवगडसाठी अस्तित्वात असलेली दहिबांव अन्नपूर्णा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुस्थितीत आणणे हे २ महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते. त्यानुसार आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचा आदेश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकार्यांना दिला होता. त्यानुसार दहिबांव अन्नपूर्णा नदीवरील नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी मंत्री राणे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. या नव्या अंदाजपत्रकानुसार नवीन पंप बसवणे, ‘पंप हाऊस’ची दुरुस्ती, जलवाहिनीची दुरुस्ती, जामसंडे भागातील जलवाहिनीची दुरुस्ती, तसेच नेनेनगर येथील पाणी साठवण टाकीची दुरुस्ती करणे आदी कामे अग्रक्रमाने करण्यात येणार आहेत.