वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ‘रेड डाई क्र. ३’ नावाच्या कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी घातली आहे. अमेरिकेत बर्याच काळापासून ‘टॉफी’, ‘कुकीज’ यांसह अनेक पदार्थांना (कँडी आणि रंगीत पेये, तसेच काही औषधे) रंग देण्यासाठी याचा वापर केला जात होता. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की, ‘रेड डाई क्र. ३’मुळे प्राण्यांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता बळावते.
१. ‘रेड डाई क्र. ३’च्या वापराच्या दुष्परिणामांविषयी पूर्वीच्या अभ्यासांमध्येही चिंता व्यक्त करण्यात आली होती. वर्ष २०१२ च्या एका अहवालात म्हटले होते की, यामुळे प्राण्यांमध्ये कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
२. ‘कॅलिफोर्निया ऑफिस ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ हॅझार्ड ॲसेसमेंट’ने २०२१ मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून होते की, काही प्रकारच्या ‘कँडी’ आणि ‘कुकीज’ यामध्ये हे कृत्रिम रंग वापरले जात राहिले. यामुळे मुलांमध्ये लक्ष अल्प होणे, चिडचिडेपणा आणि इतर मानसिक विकार यांसारख्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढू शकतो.
३. पर्यावरणीय कार्यगटाचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष केन कुक यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ‘हा निर्णय ग्राहकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी एक विजय आहे.’
४. कर्नाटक सरकारनेही ११ मार्च २०२४ या दिवशी कापसाच्या कँडी आणि गोबी मंच्युरियन यांमध्ये वापरण्यात येणार्या ‘रोडामाइन-बी’ या कृत्रिम रंगावर बंदी घातली होती. ‘रोडामाइन-बी’ असलेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते आणि विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. अनेक अभ्यासांमध्ये त्यापासून कर्करोग होण्याची शक्यता असल्याचेही आढळून आले होते.