Pak Journalist Najam Sethi : पाकिस्तान बांगलादेशाच्या सैन्याच्या माध्यमातून भारतात कारवाया घडवून आणू शकतो !

नजम सेठी, पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार यांनी केला दावा !

डावीकडे नजम सेठी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर पाकिस्तानी नेते आणि तेथील सैन्य बांगलादेशाला जवळ करू लागले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांची दोनदा भेट घेतली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार पुढील महिन्यात बांगलादेश दौर्‍यावर जाणार आहेत. पाकचे सैन्य बांगलादेशाच्या सैन्याला प्रशिक्षणही देणार आहे. पाकिस्तान आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान यांच्यातील हिंसाचारात पाकची हानी होत आहे. यामागे भारत असल्याचा पाकचा आरोप आहे. त्यामुळे भारताचा सूड घेण्यासाठी तेथे कारवाया करण्यासाठी पाकिस्तान बांगलादेशाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आणि नवाझ शरीफ यांचे अत्यंत जवळचे नजम सेठी यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात याची माहिती दिली आहे.

पत्रकार नजम सेठी म्हणाले की,

१. बर्‍याच वर्षांपूर्वी बांगलादेशात उपस्थित असलेल्या सैनिकांना पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण दिले होते. आता पुन्हा चालू होणार्‍या प्रशिक्षणामुळे पाकिस्तानी सैन्य आणि बांगलादेशी सैन्य यांच्यातील मैत्री वाढेल, विचारसरणीचा प्रसार होईल आणि संपर्क वाढेल. यातून पाकिस्तानला २ लाभ होतील. पहिला म्हणजे बांगलादेश सैन्य भारतविरोधी होईल, जे सध्या पाकिस्तानविरोधी आहे. दुसरे म्हणजे पाकिस्तानी सैन्याला बांगलादेशाच्या माध्यमातून भारताचा सूड घेण्याची संधी मिळेल.

२. भारताला सर्वांत मोठी भीती पाकिस्तानी आतंकवाद्यांची आहे. हे आतंकवादी बांगलादेशमार्गे भारतात सहज प्रवेश करू शकतात. शेख हसीना यांच्या काळात गेल्या १५ वर्षांपासून हा प्रकार बंद होता.

३. वर्ष १९७१ च्या बांगलादेशातील पाक सैन्याने केलेल्या नरसंहारासाठी पाकिस्तानने क्षमा मागावी, अशी बांगलादेश सातत्याने मागणी करत आहे. पाकिस्तानी नेत्यांनी वारंवार क्षमा मागितली आहे; पण बांगलादेशाने ती मान्य केलेली नाही. बांगलादेशाच्या मागण्यांपुढे झुकून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार या भेटीत बांगलादेशाची उघडपणे क्षमा मागू शकतात.

संपादकीय भूमिका

जे सर्वांना वाटते, तेच पाकच्या पत्रकाराने उघडपणे सांगितले. यातून बांगलादेशातील स्थितीची भारताला कशी हानी होत आहे, हे लक्षात येते ! भारत अद्यापही या प्रकरणी निष्क्रीय रहात आहे, हे अनाकलनीयच होय !