SAMBHAL Masjid Survey Report : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा पाकीटबंद अहवाल न्यायालयात सादर

मशीद पूर्वीचे मंदिर असल्याचे दर्शवणारे सापडले पुरावे ! – सूत्रांची माहिती

संभल (उत्तरप्रदेश) – संभल न्यायालयाचे आयुक्त रमेश सिंह राघव यांनी येथील शाही जामा मशिदीच्या संरचनेचा सर्वेक्षण अहवाल सीलबंद पाकिटात चंदौसी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) आदित्य सिंह यांना सादर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाकीट उघडण्यात येणार आहे. हा अहवाल ४५ पानांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात या वास्तूच्या जागेवर हिंदु मंदिर असल्याचे भक्कम पुरावे आहेत.

सर्वेक्षण अहवालात अंदाजे साडेचार घंट्यांच्या चित्रीकरणाचा, तसेच छायाचित्रांचा समावेश आहे. यात सुमारे १ सहस्र २०० छायाचित्रे काढण्यात आली. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सुमारे दीड घंट्यांचे चित्रीकरण करण्यात आले, तसेच छायाचित्रेही काढण्यात आले.

मशिदीत काय आढळले ?

१. माहितीनुसार या अहवालात म्हटले आहे की, मशिदीच्या परिसरात २ वटवृक्ष आहेत, जे सहसा हिंदु मंदिरांशी संबंधित असतात आणि तिथे त्यांची पूजा केली जाते.

२. येथे एक विहीरही आहे, ज्याचा एक भाग मशीद परिसराच्या आत आहे आणि दुसरा बाहेर आहे. विहिरीचा बाहेरचा भाग झाकलेला होता.

३. जामा मशिदीच्या आत ५०० हून अधिक फुलांची रेखाचित्रे आणि शिल्प आढळून आली. तसेच मूळ रचनेत नवीन बांधकामात करण्यात आल्याचे दिसून आले.

४.  मंदिराच्या भिंती, खिडक्या आणि विविध प्रकारे सजवलेल्या भिंतींवर सुमारे ५० कलाकृती सापडल्या आहेत. या कलाकृतींना झाकण्यासाठी त्यावर प्लास्टर आणि रंग लावून मंदिराची मूळ वास्तुकला लपवली गेली आहे.

५. घुमटाच्या मध्यभागी घंटा टांगण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी साखळीही सापडली आहे. सध्या त्यावर झुंबर टांगण्यात आले आहे. या प्रकारच्या साखळीचा वापर सहसा मंदिरात घंटा लटकवण्यासाठी किंवा शिवलिंगावर २४ घंटे जलाभिषेक करण्यासाठी भांडे लटकवण्यासाठी केला जातो.

६. घुमटाचा काही भाग सपाट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

संभलची शाही जामा मशीद म्हणजे पूर्वीचे श्री हरिहर मंदिर

संभलच्या कोट गरवी येथे असलेली शाही जामा मशीद मोगलकालीन आहे. ती संभल जिल्ह्यातील सर्वांत जुन्या वास्तूंपैकी एक आहे. बाबरच्या सूचनेनुसार मीर बेग या नेत्याच्या सरदाराने वर्ष १५२९ मध्ये ती बांधली होती. हिंदूंचे श्री हरिहर मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचा हिंदु पक्षाचा दावा आहे. याविषयी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून येथे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी केला होता हिंसाचार

न्यायालयाच्या आदेशानंतर १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी सर्वेक्षण पथक मशिदीमध्ये गेले असता बाहेर जमानाने विरोध चालू केला. त्यामुळे तासाभरात पथकाला तेथून निघावे लागले. त्यानंतर २४ नोव्हेंबर सकाळीच हे पथक मशिदीत सर्वेक्षणासाठी पोचले. त्या वेळी धर्मांध मुसलमानांनी बाहेर हिंसाचार केला. यात ५ मुसलमानांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक केली आहे. तसेच अन्य ९० जणांचा शोध घेतला जात आहे.