Extradition Of Tahawwur Rana : मुंबई आतंकवादी आक्रमणातील आतंकवादी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा !

आतंकवादी तहव्वूर राणा

नवी देहली –  २६ नोव्हेंबर २००८ (२६/११) या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेला आतंकवाद तहव्वूर राणा याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला आहे. भारताचा हा मोठा विजय आहे. राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आहे. वर्ष २००८ मध्ये लष्कर-ए-तोयबाने केलेल्या २६/११ च्या आक्रमणातील त्याच्या भूमिकेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय्.ए.) चौकशी करत आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया चालू असल्याचे ‘एन्.आय्.ए.’च्या अधिकार्‍यांनी सांगितले.

तहव्वूर राणाविरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. ‘एन्.आय्.ए.’ने त्याच्या विरोधात देहली न्यायालयात आरोपपत्रही प्रविष्ट (दाखल) केले होते. त्यात हेडली, तहव्वूर राणा, हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, इलियास काश्मिरी, साजिद मीर, अब्दुर रहमान हाशिम सय्यद, मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली यांची नावे आहेत. ‘एन्.आय्.ए.’च्या म्हणण्यानुसार या आतंकवाद्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांची पहाणी करून तेथे आक्रमण करण्याची योजना सिद्ध केली. राणा याच्यावर हेडली आणि त्याचे इतर सहकारी यांना आर्थिक साहाय्य केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

१७ वर्षांपूर्वीच्या आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेल्या आतंकवाद्याला भारतात आणल्यावर त्याला पोसत बसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे !