एकूण महसूल जमा ४ सहस्र ६१४ कोटी ७७ लाख रुपये
पणजी ३१ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या ९ मासांच्या कालावधीत गोव्याच्या एकूण महसुलात वर्ष २०२३ मधील याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत ३६५ कोटी ४३ लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ३१ डिसेंबरला दिली. ते म्हणाले, ‘‘एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत गोव्याचा एकूण महसूल ४ सहस्र ६१४ कोटी ७७ लाख रुपये आहे. वर्ष २०२३ मध्ये याच कालावधीत ४ सहस्र २४९ कोटी ३४ लाख रुपयांची कमाई झाली. या लक्षणीय वाढीमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) या दोन्ही महसुलांचा समावेश आहे. यावरून राज्याची सुधारित आर्थिक कामगिरी लक्षात येते.’’
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या ९ मासांच्या कालावधीत एकूण महसूल वाढ ८.६० टक्के झाली आहे, तर राज्याच्या वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएस्टीमध्ये) या ९ मासांत ९.६२ टक्के वाढ दिसून आली आहे. ही वाढ कर सुधारणा आणि आर्थिक उलाढालीची परिणामकारकता दर्शवते, तसेच मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅटमध्ये) ६.४१ टक्के वाढ झाली असून त्यामुळे एकूण कमाईमध्ये सकारात्मक योगदान मिळाले आहे. वस्तू आणि सेवा कर आणि मूल्यवर्धित कर मिळून एकूण महसुलात ८.६० टक्के वाढ झाली आहे.
डिसेंबर मासात गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात ७५ कोटी ५१ लाख रुपयांची वाढ
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, ‘‘डिसेंबर २०२४ मध्ये गोव्याच्या महसूल संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच मासातील महसुलाच्या तुलनेत ७५ कोटी ५१ लाख रुपये वाढ झाली आहे.’’