१ जानेवारी १८१८ या दिवशी पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा लढाई झाली. त्या लढाईचा जातीशी संबंध लावून जातीद्वेष पसरवला जातो. त्या अनुषंगाने युवा अभ्यासक अशोक तिडके यांनी कोरेगाव भीमा लढाईविषयी केला जाणारा अपप्रचार आणि वास्तव यांविषयीची माहिती संकलित केली आहे. ती आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. प्रश्न : कोरेगाव भीमा लढाई कि भीमा कोरेगाव लढाई ?
उत्तर : कोरेगाव भीमा लढाई. ऐतिहासिक दाखले आणि जय स्तंभ येथे ‘कोरेगाव भीमा’ असाच उल्लेख आहे. भीमा नदीच्या काठावर असल्यामुळे कोरेगावला ‘कोरेगाव भीमा’ असेही ओळखले जाते.
२. अपप्रचार : कोरेगाव भीमा लढाई ५०० महार विरुद्ध २८ सहस्र ब्राह्मण अशी लढाई होती.
सत्य : इंग्रज विरुद्ध मराठा (पेशवे) अशी ही लढाई होती. मराठ्यांच्या बाजूने स्वतः छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि दुसरे बाजीराव पेशवे होते, तर इंग्रजांचा अधिकारी कॅप्टन स्टाँटन हा लढाई लढत होता. या लढाईत दोन्ही बाजूने विविध जातीधर्माचे सैनिक लढले होते.
३. अपप्रचार : सिदनाक महार हे इंग्रजांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते.
सत्य : सिदनाक महार हे मराठ्यांच्या सैन्यातील शूर योद्धा होते. त्यांनी पेशव्यांच्या बाजूने लढतांना मोठे शौर्य गाजवले आहे. त्यांचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा संबंध नाही. त्यांनी इंग्रजांच्या वतीने अशी कोणतीही लढाई लढलेली नाही.
४. अपप्रचार : मराठ्यांच्या सैन्यात महार जातीच्या सैनिकांना अनुमती नव्हती.
सत्य : महार जातीच्या सैन्याला इंग्रजांनी बंदी घातली होती. मराठ्यांच्या सैन्यात महार सैनिकांनी तर शौर्य गाजवले आहे. सिदनाक महार हे त्याचे उदाहरण. वर्ष १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे भेट दिली असता ‘इंग्रजांच्या सैन्यात महार जातीचा समावेश करावा’, अशी मागणी केली होती.
५. अपप्रचार : कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई होती.
सत्य : कोरेगाव भीमा ही जातीअंताची लढाई नसून महाड येथील चवदार तळे आंदोलन ही जातीअंताची खरी लढाई आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा जय स्तंभास भेट दिली; पण त्यांनीही या लढाईस ‘जातीअंताची लढाई’, असे संबोधलेले नाही.
६. अपप्रचार : कोरेगाव भीमा लढाई, म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड !
सत्य : कोरेगाव भीमा लढाई आणि छत्रपती संभाजी महाराज हत्येचा काहीही संबंध नाही. ही लढाई झाली, तेव्हा स्वतः छत्रपती प्रतापसिंह महाराज उपस्थित होते. शंभूराजांची हत्या औरंगजेबाच्या आदेशावरून झाली होती. मग या लढाईत इंग्रज शंभूराजांच्या हत्येचा सूड घेणार होते का ?
७. प्रश्न : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा लढाईला ‘शौर्य दिवस’ किंवा ‘विजय दिवस’ म्हटले होते का ?
सत्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा कोरेगाव भीमाच्या जय स्तंभास भेट दिली, तेव्हा आपल्या भाषणात ‘महार सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढावे, ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही’, असे म्हटले होते. यावरून बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती लक्षात येते. त्यांनी या लढाईस ‘विजय दिवस’ किंवा ‘शौर्य दिवस’ असे संबोधलेले नाही.
८. अपप्रचार : कोरेगाव भीमा लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.
सत्य : कोरेगाव भीमा लढाई ही अनिर्णित लढाई होती. या लढाईत कुणाचाही स्पष्ट विजय झाला नाही. तथापि इंग्रजांनी जय स्तंभावर या लढाईला ‘डिफेन्स ऑफ कोरेगाव’ (कोरेगावच्या संरक्षणार्थ) असे संबोधले आहे, तसेच इंग्रजांची सर्वाधिक हानी झाली आहे. कॅप्टन स्टाँटन याने ‘आम्हाला लवकर साहाय्य पाठवा, नाहीतर मराठे (मराठ्यांचे सैन्य) उद्यापर्यंत मारून टाकतील’, असे पत्र वरिष्ठांना पाठवले होते. यावरून या लढाईचे अनुमान लावता येते.
– अशोक तिडके
(श्री. सिद्धराम पाटील यांच्या फेसबुकवरून साभार)