सध्याच्या कलियुगात तमोगुणाचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. क्रोध हा अधिक तमोगुणी असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात या तमोगुणी क्रोधाने आपले वास्तव्य केले आहे. राग न येणारी व्यक्ती क्वचितच आढळते. ‘राग येणे’, म्हणजे दुसर्याच्या चुकीची स्वतःला दिलेली शिक्षा होय. ही शिक्षा आपण कळत-नकळत स्वतःला करून घेत असतो. कलियुगात राग हा सर्व आपत्तींचे मूळ कारण आहे. १७ डिसेंबर या दिवशी आपण रागाची व्याख्या, रागाचे प्रकार, राग येण्याची कारणे इत्यादी सूत्रे पाहिली. आता आपण राग येण्यामुळे होणारा परिणाम याविषयी जाणून घेऊया.
(भाग २)
लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/864528.html
७. रागाचा परिणाम
७ अ. शारीरिक परिणाम
७ अ ३. रागामुळे व्यक्तीची सृजनशक्ती आणि सुख-शांती नष्ट होणे : ‘रागामुळे व्यक्तीची सृजनशक्ती नष्ट होते. ‘राग आलेल्या व्यक्तीने स्वतःची आणि इतरांची किती आणि कोणत्या प्रकारची हानी केली’, याचे मोजमाप करणे अशक्य असते. रागामुळे जीवनातील सुख-शांती नष्ट होते. वेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होऊन आयुष्यभर दुःख भोगण्याविना अन्य पर्याय उरत नाही.
७ अ ४. रागाच्या भरात इतरांना इजा करणे : राग आलेल्या व्यक्तीच्या मनात ‘समोरच्या व्यक्तीला खाऊ कि गिळू ?’, असा विचार येत असतो. ती हातांतील वस्तूंची आदळ-आपट करते. ती वस्तू समोरच्याला फेकून मारते. त्याला इजा करते.
७ अ ५. अव्यक्त रागामुळे होणारी हानी : अव्यक्त रागामुळे व्यक्ती आतल्या आत धुमसत रहाते. काही वेळा प्रतिमा जपण्यामुळे राग व्यक्त करण्याचे टाळून तो दाबून ठेवला जातो. अव्यक्त राग कालांतराने महाविस्फोटक बनतो आणि त्या व्यक्तीची अन् संबंधितांची (दोघांचीही) फार मोठी हानी घडवतो. व्यक्त न झालेल्या रागामुळे मनुष्याची मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था यांसारख्या वेगवेगळ्या संस्थांचे कार्य बिघडते. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या व्याधी जडतात, उदा. काही वेळा राग असह्य होऊन त्याचा रक्तदाब वाढतो. त्यावर वेळीच योग्य उपाय न केल्याने त्याला आयुष्यभर दुःख भोगावे लागते.
७ आ. रागामुळे होणारे मानसिक परिणाम
७ आ १. रागीट स्वभावाच्या व्यक्तीला अनेक मानसिक व्याधी जडणे : रागीट स्वभावामुळे व्यक्तीला अनेक मानसिक व्याधी जडतात. तिला दुःख आणि ताण येऊन नैराश्य येते. तिच्या मनाचा गोंधळ होतो. तिचे शरीर आणि मन यांच्यावरील नियंत्रण सुटते अन् विवेकावर आवरण येऊन तिची सारासार विचारशक्ती नष्ट होते.
७ आ २. अँगर (Anger) आणि डेंजर (Danger) : ‘रागा’ला इंग्रजीमध्ये अँगर (Anger) असे म्हणतात आणि त्या (Anger) पूर्वी ‘डी (D)’ हे अक्षर जोडले, तर डेंजर (Danger) म्हणजे ‘धोका’ हा शब्द बनतो. ‘राग हा धोक्याची पहिली पायरी आहे’, असे म्हणता येईल.
७ आ ३. राग आलेल्या व्यक्तीचा संयम सुटणे आणि ‘रागाच्या भरात काय करत आहोत’, याची तिला जाणीवही नसणे : राग आलेल्या व्यक्तीचा स्वतःवरील संयम सुटतो. तिचे स्वतःचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे तिच्याकडून अयोग्य विचार, अयोग्य कृती आणि अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त होतात. ‘रागाच्या भरात आपण काय करत आहोत ?’, याची त्या व्यक्तीला जाणीवही नसते.
७ आ ४. रागामुळे नकारात्मकता वाढते : रागामुळे कृती करण्याचा उत्साह मावळतो. प्रयत्न करणे थांबते. कृतीतील आनंद अनुभवता न आल्याने आणि मनासारखे काही घडत नसल्यामुळे अशा व्यक्तीला नैराश्य येते. ती भयग्रस्त होऊन आळशी बनते. ती सर्व सुखांपासून वंचित रहाते.
७ इ. रागाचे आध्यात्मिक परिणाम
७ इ १. रजोगुण आणि तमोगुण वाढणे : रागामुळे रजोगुण आणि तमोगुण यांमध्ये वाढ होते. व्यक्तीचे अवयव आणि शरीरातील कार्यकारी संस्था यांना चुकीच्या सूचना मिळून अयोग्य अन् चुकीच्या कृती घडतात.
७ इ २. राग आलेल्या व्यक्तीचे रागावलेल्या व्यक्तींशी नवीन देवाण-घेवाण हिशेब निर्माण होऊन संचितात वाढ होते.
७ ई. रागामुळे इतरांवर होणारे परिणाम
७ ई १. रागामुळे चिडचिड झाल्याने समोरच्या व्यक्तीतील सकारात्मकता नष्ट होऊन तिला प्रतिक्रिया येणे : राग आल्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड होते. आजूबाजूची शांतता बिघडते. त्या व्यक्तीची समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता रहात नाही. ऐकून घेतले, तरी ते मनापासून ऐकणे, समजून घेणे आणि त्याला योग्य प्रतिसाद देणे इत्यादी होत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. तिच्यातील सकारात्मकता नष्ट होऊन तिला प्रतिक्रिया येतात. तिने या प्रतिक्रिया इतरांकडे व्यक्त केल्यामुळे त्यांचीही मने कलुषित होतात.
७ ई २. रागावलेल्या व्यक्तीकडून होणार्या अनपेक्षित आणि अयोग्य कृतींमुळे त्या व्यक्तीचेच नव्हे, तर संबंधितांचीही झालेली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक हानी कधीही भरून निघत नाही.
७ ई ३. रागाच्या भरात बोललेल्या अपशब्दांचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर कायमस्वरूपी संस्कार होणे : रागाच्या भरात बोललेल्या अपशब्दांमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर उमटलेला ओरखडा कधीही पुसून टाकता येत नाही. चित्तावर उमटलेला या ओरखड्याचा संस्कार त्या व्यक्तीच्या मनात देवाण-घेवाण पूर्ण होईपर्यंत अनेक जन्म तसाच रहातो.
७ ई ४. रागामुळे कुटुंबियांवर परिणाम होऊन जवळची माणसे दुखावणे आणि दुरावणे : रागामुळे जवळची आणि संबंधित सर्व माणसे दुखावल्यामुळे दुरावतात अन् नाती तुटतात. त्यांच्या मनामध्ये प्रेमभावाऐवजी द्वेष आणि मत्सर निर्माण होतो. सतत रागावणार्या व्यक्तीबद्दल तिच्या मुलांच्या मनात अनादराची भावना निर्माण होते. ती मुले किंवा व्यक्ती कायमच्या दुरावतात.’
(क्रमशः)
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१.२०२१)