सध्याच्या कलियुगात तमोगुणाचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. क्रोध हा अधिक तमोगुणी असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात या तमोगुणी क्रोधाने आपले वास्तव्य केले आहे. राग न येणारी व्यक्ती क्वचितच आढळते. ‘राग येणे’, म्हणजे दुसर्याच्या चुकीची स्वतःला दिलेली शिक्षा होय. ही शिक्षा आपण कळत-नकळत स्वतःला करून घेत असतो. कलियुगात राग हा सर्व आपत्तींचे मूळ कारण आहे. आता आपण रागाचे स्वरूप, राग येण्याची कारणे, राग येण्याचे परिणाम, रागावर नियंत्रण कसे करावे, इत्यादी रागाच्या संदर्भातील सूत्रे पाहूया.
(भाग १)
१. व्याख्या
राग म्हणजे इतरांच्या दोषांचा स्वतःवर उगवलेला सूड आहे.
२. रागाचे प्रकार
रागाचे तीन प्रकार आहेत. १. सत्त्वगुणी २. रजोगुणी आणि ३. तमोगुणी राग. सत्त्वगुणी रागामुळे चांगली कृती करण्याचा प्रयत्न होतो. रजोगुणी रागामुळे स्वार्थासाठी कृती घडते, तर तमोगुणी रागामुळे दुसर्याला पीडा देण्याची कृती होऊन पाप घडते. या प्रकारांनुसार त्या कृतींचे परिणाम संबंधित व्यक्तीला भोगावे लागतात.
३. राग व्यक्त होण्याचे प्रकार
३ अ. उद्रेकाच्या स्वरूपात व्यक्त होणारा राग
३ आ. अव्यक्त राग : राग आल्यावर तो मनातल्या मनात दाबून ठेवला जातो आणि कालांतराने त्याचा ज्वालामुखीप्रमाणे मोठा विस्फोट होतो.
दोन्ही प्रकारांत राग येणार्या व्यक्तीची आणि ज्याच्यावर राग काढला जातो, त्याचीही हानी होते. अव्यक्त किंवा दाबून ठेवलेल्या रागामुळे व्यक्ती सतत तणावाखाली वावरते. अस्वस्थ रहाते. क्रोधाने आतल्या आत क्षुब्ध होऊन धुमसत रहाते. त्यामुळे तिची अधिक हानी होते, तर राग व्यक्त झाल्यावर मनातील सर्व रागाची जळमटे जळून जाऊन मन मोकळे होते आणि व्यक्तीला हलकेपणा जाणवतो.
४. राग कुठे व्यक्त होतो ?
४ अ. हानी होणार्या प्रसंगात राग व्यक्त न होणे : एखाद्या व्यक्तीला राग आला, तरी तो सर्वच ठिकाणी व्यक्त केला जात नाही. राग व्यक्त केल्याने स्वत:ची हानी (नुकसान) होणार आहे किंवा जिथे राग व्यक्त करून स्वत:चा काहीही लाभ होणार नाही, हे लक्षात आल्यावर तिथे राग व्यक्त करण्याचे टाळले जाते, उदा. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यावर व्यक्ती राग व्यक्त करत नाही; कारण तेथे ‘रागावल्यामुळे स्वत:ची हानीच होईल. आपली नोकरी जाईल’, याची भीती तिच्या मनात असते.
५. राग आल्यावर घडणार्या कृती
राग आलेल्या व्यक्तीकडून मोठ्याने बोलणे, मोठ्याने ओरडणे, आदळ-आपट करणे, इतरांच्या अंगावर धावून जाणे, भांडण करणे, मारामारी करणे, अयोग्य कृती करणे, स्वतःला कोंडून घेणे, स्वतःला हानी करून घेणे इत्यादी कृती घडतात.
६. राग येण्याची कारणे
६ अ. स्वभावदोष आणि अहं
६ अ १. अपेक्षा करणे : रागाचे मूळ कारण ‘अपेक्षा’ आहे. ‘अपेक्षा करणे’ हा तीव्र अहंचा पैलू असलेल्या व्यक्तीला अपेक्षापूर्तीच्या अभावामुळे स्वतःचा आणि इतरांचाही राग येतो. अपेक्षा म्हणजे मनात निर्माण झालेली कोणत्यातरी विचारांची चौकट किंवा चित्तावरील संस्कारांनुसार मनात घडवलेली एखादी विशिष्ट प्रतिमा. त्यानुसार कृती घडत नसेल, तर व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊन तिला राग येतो.
६ अ २. अपयश येणे : एखादी कृती करतांना अपयश आल्यावरही व्यक्तीला राग येतो.
६ अ ३. आसक्ती : जिथे काम (वासना, इच्छा) आहे, तिथे क्रोध अगोदरच असतो. आसक्तीमुळे कामना, इच्छा आणि वासना निर्माण होतात. ‘वस्तू, पद आणि प्रतिष्ठा’ यांची आसक्ती व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. ते प्राप्त होईपर्यंत आकर्षण, इच्छा आणि लोभ वाढतात. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची आसक्ती रागाला कारणीभूत होते. व्यक्तीला अपेक्षापूर्ती होण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे राग येतो. स्वार्थामुळे कामात, म्हणजे वासनेची पूर्ती होण्यात येणारा अडथळा व्यक्तीला सहन होत नाही.
६ अ ४. प्रतिक्रिया येणे : एखाद्याचे विचार किंवा त्याने केलेली कृती पटत नसेल, तेव्हा प्रतिक्रिया आल्याने रागाचे प्रकटीकरण होते.
६ अ ५. चित्तावरील अहंकाराचा संस्कार : अनेकदा व्यक्तीचा अहंकार दुखावल्यामुळे तिला राग येतो. राग येण्याच्या कारणांचा संस्कार त्या व्यक्तीच्या चित्तावर झालेला असतो. अभिमान, मत्सर, आसक्ती, तिरस्कार हे त्यांपैकी काही संस्कार आहेत. एखाद्या क्षुल्लक निमित्ताने एखादा संस्कार उफाळून येऊन व्यक्तीला राग येतो. तिची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धीचे कुबुद्धीत रूपांतर होते. व्यक्तीकडून चुकीचे बोलणे आणि वर्तन होऊन रागाचे प्रकटीकरण होते. व्यक्तीला स्वतःचा आणि इतरांचाही राग येतो.
६ अ ६. ‘मी चांगला आणि समोरचा वाईट’, असे वाटून राग येणे : प्रत्येकामध्ये न्यून-अधिक (कमी-जास्त) प्रमाणात अहं असतो; परंतु जेव्हा ‘मी चांगला आणि समोरचा वाईट’ असा तिचा मोठा अपसमज असतो, तेव्हा ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये दोष शोधत रहाते आणि तिच्यावर राग काढते. याउलट ‘समोरचाही चांगला आहे’, असा दृष्टीकोन ठेवल्यावर राग येणार नाही.
६ आ. आध्यात्मिक कारण
६ आ १. दोन व्यक्तींमधील देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करणे : मनुष्याच्या संपर्कात वेगवेगळ्या व्यक्ती येत असतात. त्यामागे काहीतरी पूर्वनियोजित कारण असते. काही वेळा या व्यक्ती त्यांच्यामध्ये शेष (बाकी) राहिलेला देवाण-घेवाण हिशोब पूर्ण करण्याच्या उद्देशाने आलेल्या असतात. त्यांपैकी काही जण कुटुंबीय, शेजारी, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि अधिकारी इत्यादी असतात. त्यांच्यामधील देवाण-घेवाण हिशोब रागाच्या माध्यमातून त्रास देऊन किंवा त्यांच्याकडून त्रास करवून घेऊन पूर्ण केला जातो.
७. रागाचा परिणाम
आपण रागाचा प्रसंग कालांतराने विसरतो; परंतु त्या प्रसंगाच्या वेळी झालेले परिणाम आयुष्यभर टिकून रहातात आणि त्यामुळे दुःख आणि त्रास भोगावा लागतो. रागाच्या प्रकटीकरणानंतर पुढीलप्रमाणे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि आध्यात्मिक परिणाम होतात.
७ अ. शारीरिक परिणाम
७ अ १. राग हा विषाप्रमाणे हानीकारक असून त्याने मन, बुद्धी आणि सर्व शरीर विषमय होणे : रागाचा ती (रागवलेली) व्यक्ती आणि तिच्याशी संबंधित व्यक्ती या दोघांचेही शरीर, मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट परिणाम होतात. राग हे विष आहे. राग आल्यावर त्या व्यक्तीचे मन, बुद्धी आणि सर्व शरीर विषमय होते. ते विष मनुष्याच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये पसरते. त्याला त्याचे अनिष्ट परिणाम आणि दुःख यांना सामोरे जावे लागते अन् त्याचे आयुष्य दुःखमय होते.
७ अ २. राग आल्याने व्यक्ती जवळच्या व्यक्तींच्या समवेतचे संबंध तोडून एकटेपणाचा तुरुंगवास भोगत असणे : राग आलेली व्यक्ती जणू काही धगधगता निखारा हातात घेऊन तो समोरच्या व्यक्तीवर टाकून तिला हानी पोचवण्याचा विचार करत असते; परंतु जोपर्यंत तो निखारा राग आलेल्या व्यक्तीच्या हातात आहे, तोपर्यंत ‘त्या व्यक्तीचीच हानी होत असते’, हे तिच्या लक्षात येत नाही. अहंकाराच्या दोषामुळे रागाने भ्रमिष्ट झालेली व्यक्ती जवळच्या व्यक्तींच्या समवेतचे संबंध तोडून टाकते आणि एकटेपणाचा तुरुंगवास भोगत असते.’
(क्रमशः)
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.