१९ डिसेंबर या दिवशी आपण ‘रागामुळे होणारा परिणाम’ या सूत्राविषयी विस्तृतपणे जाणून घेतले. आजच्या या भागात आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न जाणून घेऊया.
(भाग ३)
लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865014.html
८. रागावर नियंत्रण कसे मिळवावे ?
‘रागाचे भयंकर परिणाम पाहिल्यावर ‘तो कसा नियंत्रित करायचा ?’ हे पहाणे महत्त्वाचे आहे. ‘काम आणि क्रोध जिंकणार्या पुरुषाला सर्वत्र परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार होतो’, असे ‘श्रीमद्भगवद्गीते’त म्हटले आहे, तसेच ‘आपल्यावर अन्याय (अपकार) करणार्यावरही क्रोध करू नये’, असेही सांगितले आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रयत्न करू शकतो.
८ अ. कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न
८ अ १. दीर्घ श्वास घेणे : राग आल्यावर लगेच एक दीर्घ श्वास घ्यावा. त्यामुळे रागाचा आपले मन, बुद्धी आणि शरीर यांच्यावर होणारा दुष्परिणाम टाळला जातो. शरिरातील कार्यरत मज्जासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि अन्य संस्था यांच्या कार्यावर होणारा दुष्परिणाम टाळला जाण्यास साहाय्य होऊन मोठी हानी टाळली जाते.
८ अ २. ‘स्वतःला राग आला आहे’, असे समजल्यावर एकमेकांशी बोलणे टाळणे : प्रथम ज्या व्यक्तीविषयी राग आला आहे, तिच्याशी बोलणे टाळावे; कारण त्या वेळी बोलल्यास शब्दाने शब्द वाढत जाऊन त्याचे पर्यवसान भांडणात होऊ शकते. हे टाळण्यासाठी ‘स्वतःला राग आला आहे’, असे कळल्यावर तेथून दूर जावे.
८ अ ३. शांत रहाणे आणि दुसरीकडे जाऊन नामजप करून नंतर बोलणे : ‘समोरच्या व्यक्तीला राग आला आहे’, असे कळल्यावर ‘आपण नंतर बोलूया’, असे सांगून तेथून दूर जावे. एका खोलीत जाऊन थोडा वेळ शांत बसावे. नामजप करावा. त्यानंतर बाहेर येऊन त्या व्यक्तीशी शांतपणे संभाषण करतांना आपल्यामधील, तसेच समोरच्या व्यक्तीमधील राग उणावल्याचे जाणवते.
८ अ ४. राग आल्यावर समोरची व्यक्ती किंवा तिच्या चुकीच्या कृती यांकडे दुर्लक्ष करणे : एखाद्या व्यक्तीचा राग आल्यावर त्या व्यक्तीकडे किंवा तिच्या चुकीच्या कृतीकडे दुर्लक्ष करून अन्य सेवा किंवा कृती करण्यामध्ये व्यस्त रहावे. त्यामुळे राग उणावतो. नंतर शांतपणे त्या व्यक्तीशी बोलणे शक्य होते. त्या चुकीच्या कृतीचा अभ्यास करून योग्य उपाययोजना करणे शक्य होते.
८ अ ५. राग आल्यावर स्थिती सामान्य होण्यासाठी ‘एक-दोन-तीन ….’ असे अंक मनात मोजणे : राग आल्यावर मनुष्याचे मन आणि शरीर यांची स्थिती पालटलेली असते. ती स्थिती सामान्य होण्यासाठी म्हणजे रागाचा पारा खाली उतरण्यासाठी त्याने मनातल्या मनात ‘एक-दोन-तीन ….’ असे अंक मोजल्याने रागाचा जो वरचा टप्पा असतो, तो हळूहळू खाली उतरतो. यात काही वेळ निघून गेल्याने त्याच्याकडून रागाच्या स्थितीत होणारे बोलणे आणि कृती थांबते.
८ अ ६. व्यक्तीला राग व्यक्त होण्यास संधी देणे
८ अ ६ अ. एखाद्या व्यक्तीला राग आल्यावर तिला बोलण्यास सांगून सर्व राग प्रकट करण्यास वाव देणे : समोरच्या व्यक्तीला राग आला असेल किंवा ती रागाने बोलत असेल, तेव्हा त्यामध्ये अडथळा आणून तिचा राग दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणे टाळावे. त्या व्यक्तीला बोलू देऊन सर्व राग प्रकट करण्यास वाव द्यावा. तिचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे आणि तिच्या बोलण्यात आलेल्या सूत्रांचा अभ्यास करावा. त्यातील काही अयोग्य गोष्टींचे तिला शांतपणे चिंतन करण्यास सांगावे. यामुळे तिचा राग शांत होईल आणि आपल्यालाही तिच्या रागामुळे त्रास होणार नाही.
८ अ ६ आ. मनातील विचार एकांतात मोठ्याने बोलून दाखवल्यास मनात दाबून ठेवलेले रागाचे विचार बाहेर पडणे : राग आलेल्या व्यक्तीने एका खोलीत एकांतात जावे. तेथे ‘प्रसंगांच्या संदर्भातील सर्व सूत्रे, मनातील सर्व विचार, भावभावना कुणापुढे तरी व्यक्त करत आहोत’, असा भाव ठेवून मोठ्याने बोलावे. (तिने शक्यतो देवाला अथवा गुरूंना आत्मनिवेदन करावे.’ – संकलक) असे केल्याने मनात दाबून ठेवलेले रागाचे विचार बाहेर पडतात. मनावरचा ताण जाऊन मोकळेपणा आणि हलकेपणा जाणवतो. रागाचा पारा शून्यावर येतो.
८ आ. मनाच्या स्तरावरील प्रयत्न
८ आ १. अंतर्मुखता वाढवणे : बहिर्मुखतेमुळे साधारणपणे इतरांमधील दोष पहाण्याची मनुष्याची वृत्ती असते. इतरांमधील दोष पाहिल्यानंतर चिडचिड होऊन राग येतो. याउलट स्वतः अंतर्मुख होऊन स्वतःतील दोष पहावेत. त्यामुळे इतरांचे दोष पाहून त्यांच्यावर राग काढण्याची कृती न्यून होईल.
८ आ २. तुलना करणे टाळावे ! : एखाद्या व्यक्तीची दुसर्यांशी तुलना केल्यावर तिच्यात न्यून असलेल्या गोष्टींचा तिला राग येतो, उदा. एखाद्या व्यक्तीच्या मनात ‘अन्य महिलांप्रमाणे आपल्या पत्नीला चांगला स्वयंपाक करता येत नाही’, असा विचार येऊन तिचा राग येतो. तो राग त्या व्यक्तीच्या आतल्या आत धुमसत रहातो. अशा वेळी आपल्या पत्नीची अन्य महिलांशी तुलना करणे टाळून तिच्यातील अन्य गुण पहावेत. असे केल्याने रागाचे कारण दूर होईल.
८ आ ३. राग येण्याला कारणीभूत असलेले स्वतःमधील मूळ स्वभावदोष शोधून ते दूर करणे : स्वतःला पालटण्याची सिद्धता (तयारी) नसलेल्या व्यक्तीला देवही पालटू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला घर, कार्यालय इत्यादी ठिकाणी होणारा त्रास आयुष्यभर भोगावा लागतो. व्यक्तीने राग येण्याला कारणीभूत असलेले स्वतःमधील मूळ स्वभावदोष शोधून ‘ते दूर करायला हवेत’, याची जाणीव ठेवावी आणि ते दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना अन् प्रयत्न करायला हवेत.
८ आ ४. प्रतिदिन स्वयंसूचना देणे : राग येणार्या व्यक्तीने ‘राग कोणत्या दोषामुळे येतो ?’, याचा शोध घेऊन तो स्वभावदोष नष्ट करण्यासाठी योग्य व्यक्तीकडून स्वयंसूचना बनवून घ्यावी. स्वयंसूचना सत्रे प्रतिदिन नियमित केल्याने तो स्वभावदोष दूर होऊन रागावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
८ आ ५. चूक झाल्यावर क्षमायाचना केल्यास रागाचे प्रसंग टाळता येणे : चूक झाल्यावर व्यक्तीने तात्काळ चूक स्वीकारून समोरच्या व्यक्तीची क्षमायाचना केली, तर समोरच्या व्यक्तीला राग व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. ती व्यक्ती निश्चित क्षमा करते. दोघांनी मिळून ‘चूक का झाली ?’, याचा अभ्यास करून त्यावर योग्य उपाययोजना केली, तर रागाचा प्रसंग टळून दोघांमधील प्रेमाचे संबंध दुरावणे टाळता येईल.
८ आ ६.परिस्थिती स्वीकारणे : ‘जे घडत आहे, ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे आणि ते माझ्या साधनेला अनुकूल आहे’, असा विचार केल्याने परिस्थिती सहज स्वीकारली जाते. मग तेथे रागाला थारा मिळत नाही.’
(क्रमशः)
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.