भारताचा सहप्रायोजित प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांकडून संमत
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला.
भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली. लिकटेंस्टीन या देशाने मांडलेला ठराव बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनाको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया यांनी सह-प्रायोजित केला होता.
ठराव संमत झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, सर्वांगीण मानव कल्याणातील भारताचे नेतृत्व ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’ या मूलभूत तत्त्वावर आधारित आहे. वर्ष २०१४ मध्येही भारताने ‘२१ जून’ हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.