३ ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधीत झालेल्या भारत-पाक युद्धात भारताला मिळालेल्या विजयाच्या निमित्ताने…
३ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताच्या १० विमानतळांवर ‘प्री-एम्प्टीव्ह’ आक्रमण (शत्रूचे आक्रमण होण्यापूर्वीच त्याच्या सैन्यबळाची शक्ती न्यून किंवा नष्ट करण्यासाठी हवाई आक्रमण योजणे) करून पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्तानातील ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने समाप्त होऊन भारताचा प्रचंड विजय झाला.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वर्ष १९७१ चे युद्ध म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्ट आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, याचा प्रत्यय देणारे, पूर्व अन् पश्चिम पाकिस्तान यांच्यातील वाढते क्रौर्य, महत्त्वाच्या ३ घटना, पाकिस्तानची युद्धाची सिद्धता आणि भारताची स्थिती अन् ‘आय.एन.एस. विक्रांत’ची स्थिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखक : कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त), भारतीय नौसेना, नाशिक.
भाग ४.
भाग ३. वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/860663.html

९. युद्धज्वर तीव्र

बंगालच्या उपसागरातील भारतीय नौसेनेचा भक्कम वेढा फोडून पूर्व बंगालमध्ये रसद पुरवण्यावरच केवळ पूर्व पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून होते. युद्धाची तीव्रता स्पष्टपणे जाणवू लागली होती. २९ जुलै १९७१ या दिवशी भारतीय संसदेत परराष्ट्रमंत्र्यांनी माहिती दिली, ‘बांगलादेशाच्या हंगामी सरकारच्या विनंतीवरून भारतीय नौसेनेने बंगाली मुक्ती वाहिनीच्या ४०० सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे. भारतीय नौसेनेचे अधिकारी कमांडर एम्.एन्. सामंत त्या योजनेचे नेतृत्व करत होते. २१ नोव्हेंबर १९७१ या दिवशी पाकिस्तान आणि भारतीय सैन्य यांच्यात पूर्व बंगालमधील बोयटा येथे चकमक उडाली. त्याच रात्री पाकिस्तानी लष्करी अध्यक्ष जनरल याह्या खान यांनी घोषित केले, ‘येत्या १० दिवसांत युद्ध चालू होऊ शकते.’ २३ नोव्हेंबर १९७१ या दिवशी जनरल याह्या खान यांनी पाकमध्ये आणीबाणीची परिस्थिती घोषित केली. ३ डिसेंबर १९७१ या दिवशी पाकने भारताच्या उत्तरेतील १० विमानतळांवर ‘प्री-एम्प्टिव्ह’ विमानांद्वारे आक्रमणे करून युद्धाला प्रारंभ केला.
समुद्रावरील हालचाली अपेक्षेप्रमाणे घडत होत्या. भारतीय विमानवाहू युद्धनौकेच्या मागावर पाकिस्तानी पाणबुड्या होत्याच. भारतीय नौसेनेने अफलातून शक्कल लढवली. ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ विमानवाहू जहाज विशाखापट्टणम् बंदरामध्ये आहे’, असा संदेश पाठवला. अर्थातच पाकिस्तानी नौसेनेने तो संदेश ‘टॅप’ केला. परिणामतः पाकची पाणबुडी ‘पी.एन्.एस्. गाझी’ विशाखापट्टणम् बंदराबाहेर तैनात करण्यास पाकची नौसेना चुकली नाही. वाट पहात असलेली ही शिकार भारतीय नौसेनेच्या जाळ्यात आली. अस्त्रे डागली गेली. डिसेंबरच्या एका काळोख्या रात्री ‘पी.एन्.एस्. गाझीला’ जलसमाधी देण्यात आली. याच कालावधीत विमानवाहू जहाज ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ मात्र प्रत्यक्षात अंदमान बेटांमधील बंदरामध्ये सुरक्षित उभे होते. दूरवरच्या आक्रमणांचे आदेश घेऊन ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ने उत्तरेकडे झेप घेतली आणि पूर्व बंगालमधील रॉकबाजार, चितगाव, मोंगला, घल्लन, छल्लाना या शहरांच्या विमानतळांच्या धावपट्ट्यांवर ‘आय.एन्.एस्. विक्रांत’वरील विमानांनी जोरदार हवाई आक्रमणे केली. ३६ घंट्यांच्या आत भारतीय सैन्य दलांनी संपूर्ण पूर्व बंगालवर ‘हवाई सार्वभौमत्व’ प्रस्थापित केले. याचा अर्थ असा, ‘भारताच्या अनुमतीखेरीज कुठलेही विमान पूर्व बंगालवर उडू शकत नव्हते, तसेच सागरी सार्वभौमत्व पूर्व बंगालच्या दक्षिणेस असलेल्या उपसागरातही स्थापन केले होते.’ आता कोणतीही परकीय बोट किंवा विमान बंगालच्या उपसागरावरून भारतीय नौसेनेच्या अनुमतीखेरीज प्रवेश करू शकणार नव्हते.
‘आय.एन्.एस्. विक्रांत’वरील विमानांनी आणि त्यासमवेतच्या बोटींनी १,८०० चौरस मैलांचा परिसर स्वतःच्या नियंत्रणात आणला होता. ‘आय.एन्.एस्. विक्रांत’वरून केलेल्या हवाई आक्रमणांनी एकूण सुमारे ५७ सहस्र टन वजनाच्या १२ बोटी बुडवल्या होत्या, तसेच पाकिस्तानी युद्धनौका ‘पी.एन्.एस्. जेसोर’, ‘पी.एन्.एस्. कोमिला’ आणि ‘पी.एन्.एस्. सिल्हेट’ या जायबंदी केल्या होत्या.
१०. ‘ट्रायडंट फोर्स’ (क्षेपणास्त्र आक्रमणाचे एक सांकेतिक नाव) योजना
३ आणि ४ डिसेंबर १९७१ या दिवशीच्या रात्री भारतीय नौसेनेने पश्चिम पाकिस्तानवर पहिले क्षेपणास्त्र आक्रमण केले. ‘ट्रायडंट’ असे त्याचे सांकेतिक नाव होते. सुयोग्य पूर्वसिद्धता आणि अचूक सराव हे त्यामागे होते. ‘समुद्री चकमक घडेल, तेव्हा पाकच्या बोटी कराचीजवळ गस्त घालत असतील’, असा कयास होता. हे पूर्वानुमान खरे ठरले. त्या क्षेपणास्त्र आक्रमणात अनेक घटकांचा सहभाग आणि समन्वय होता. २ लहान फ्रिगेट्स (एक प्रकारची युद्धनौका), ‘आय.एन्.एस्. तीर’ आणि ‘आय.एन्.एस्. किलतान’ या २ युद्धनौका, ‘औसा’ जातीच्या ३ क्षेपणास्त्र सज्ज बोटी, ‘आय.एन्.एस्. निपट’, ‘आय.एन्.एस्. निरघट’, ‘आय.एन्.एस्. वीर’, या समुहामध्ये समाविष्ट होत्या. पाकने किंवा जगामध्ये कुणीही असा विचार केला नव्हता की, भारतीय नौसेना कराची बंदरावर क्षेपणास्त्राने आक्रमण करू शकेल; कारण भारताजवळ ज्या ‘औसा’ जातीच्या क्षेपणास्त्र सज्ज बोटी होत्या, त्यांची क्षमता फार मोठी नव्हती. त्या केवळ मुंबई बंदराच्या संरक्षणासाठी वापरत असत.
येथे उल्लेख करणे आवश्यक आहे की, भारतीय नौसेना प्रमुख अॅडमिरल नंदा यांच्या कार्यपद्धतीचा ! प्रसंगी प्रत्यक्ष बोटीवरील दुय्यम अधिकार्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही विचार करण्यास ते पुढे असत. भारतीय नौसेनेतील काही तरुण अधिकार्यांनी सुचवल्याप्रमाणे ‘औसा’ बोटी लहान असूनही त्यांना पाण्यातून ओढत नेऊन गुजरातमधील ओखला बंदरापर्यंत न्यायच्या आणि पुढे कराची बंदरावर आक्रमणासाठी वापरण्याची योजना त्यांचीच होती. अजून एक गोष्ट उल्लेखनीय आहे, अरबी समुद्रावर टेहळणी करण्यासाठी पाक नौसेना त्यांच्या वायूसेनेवर सर्वस्वी अवलंबून होती. या माहितीचा भारतीय नौसेनेने पुरेपूर लाभ करून घेतला. पाकिस्तानी वायूसेनेची टेहळणी चुकवून भारतीय नौसेनेने ‘औसा’ बोटी गुजरातमधील ओखला बंदरामार्गे कराचीपर्यंत पोचवल्या होत्या.
याच वेळी दीव बंदरावरून इंधनाची रसद घेऊन ‘ट्रायडंट फोर्स’ची द्वारकेच्या दिशेने आगेकूच चालू असतांना पाकच्या पाणबुड्यांची जोखीम टाळण्यासाठी समुद्रातील उथळ पाण्यातून वाट काढायची होती. द्वारकेजवळ, म्हणजे कराची बंदरापासून अवघ्या १५० मैलांवर आल्यानंतर ‘औसा’ बोटींचा वेग वाढवून अधिकतम, म्हणजे ३२ नॉट वेगाने कराचीकडे आगेकूच चालू झाली. आक्रमण करून परतणार्या बोटींना संरक्षण देण्यासाठी चौथी क्षेपणास्त्र सज्ज बोट द्वारकेजवळ नांगरून ठेवण्यात आली होती.
३ आणि ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री २ ‘फ्रिगेट्स’ आणि क्षेपणास्त्र सज्ज ४ बोटींनी कराची बंदराला वेढून आक्रमण केले. त्या रात्री कराची बंदरामध्ये पाकच्या क्रूझर ‘पी.एन्.एस्. बाबर’ आणि सुरुंगभेदी बोट ‘पी.एन्.एस्. मुहाफिज’ या नांगरलेल्या होत्या. ‘पी.एन्.एस्. शक्का’ नावाची टँकर बोट मनोराजवळ होती, ‘पी.एन्.एस्. शाहजहान’, ‘पी.एन्.एस्. बद्र आलमगीर’ आणि ‘पी.एन्.एस्. तुघरील’ या बोटीसुद्धा कराची बंदरातून कूच करण्याच्या सिद्धतेत होत्या.
(क्रमशः)
भाग ५. वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/861673.html