भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

३ ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधीत झालेल्‍या भारत-पाकिस्‍तान युद्धात मिळालेल्‍या विजयाच्‍या निमित्ताने…

३ डिसेंबर १९७१ या दिवशी भारताच्‍या १० विमानतळांवर ‘प्री-एम्‍प्‍टीव्‍ह’ आक्रमण (शत्रूचे आक्रमण होण्‍यापूर्वीच त्‍याच्‍या सैन्‍यबळाची शक्‍ती न्‍यून किंवा नष्‍ट करण्‍यासाठी हवाई आक्रमण योजणे) करून पाकिस्‍तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पूर्व पाकिस्‍तानातील ९३ सहस्र पाकिस्‍तानी सैनिकांच्‍या शरणागतीने समाप्‍त होऊन भारताचा प्रचंड विजय झाला. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘वर्ष १९७१ चे युद्ध म्‍हणजे राष्‍ट्रीय उद्दिष्‍ट आणि संघभावनेतून युद्ध कसे प्रबोधक ठरू शकते, याचा प्रत्‍यय देणारे, पूर्व अन् पश्‍चिम पाकिस्‍तान यांच्‍यातील वाढते क्रौर्य, महत्त्वाच्‍या ३ घटना आणि पाकिस्‍तानची युद्धाची सिद्धता आणि भारताची स्‍थिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

लेखक : कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त), भारतीय नौसेना, नाशिक

भाग ३.

भाग २. वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/860459.html

९ . ‘आय.एन्.एस्. विक्रांत’विषयीची काळजी

कमांडर विनायक शंकर आगाशे (निवृत्त)

याच कालावधीत भारतीय नौसेनेचे विमानवाहू जहाज ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची सुरक्षा हा संवेदनशील विषय झाला होता. खरेतर ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ ३१ वर्षे जुने असल्‍यामुळे त्‍याविषयी अनेक चिंता निर्माण झालेल्‍या होत्‍या. वेगवेगळ्‍या विश्‍लेषणातून भारतीय नौसेनेने असा निष्‍कर्ष काढला होता की, शत्रूच्‍या शस्‍त्रसज्‍ज पाणबुड्यांपासून ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ला अनेक धोके होते. बंगालच्‍या उपसागरात पाकिस्‍तानी पाणबुडी ‘पी.एन्.एस्. गाझी’ला पाठवून भारतीय नौसेनेच्‍या विमानवाहू ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ला जायबंदी किंवा नष्‍ट करायचे, हा पाकिस्‍तानी नौसेनेचा उद्देश स्‍पष्‍ट दिसत होता; परंतु तसे करण्‍यात भयंकर जोखीम होती. भारतीय नौसेनेच्‍या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या मानबिंदूवर आक्रमण करणे किंवा तिला जलसमाधी देण्‍याने भारतियांचे नीतीधैर्य निश्‍चितच खचले असते.

१० . भारतीय नौसेनेची रणनीती आणि तिने ठरवलेली उद्दिष्‍टे

अशा वेळी भारतीय नौसेनेची रणनीती कणखर असणे आवश्‍यक होते आणि तशी ती आखलीही होती. पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्‍तानची संपूर्ण समुद्री नाकेबंदी हे प्रमुख ध्‍येय होते. पूर्व पाकिस्‍तानातील चितगाव बंदरावर समुद्रातून आक्रमण करणे, रॉकबझार, छल्लना, खुलना आणि मोंगला या बंदरावर आक्रमण करणे, तसेच बंदरावरील अन् खोल समुद्रातील पाकिस्‍तानी जहाजांना उध्‍वस्‍त करणे, महत्त्वाच्‍या लक्ष्यांवर एकाच वेळी आक्रमणे करणे इत्‍यादी. अशी भारतीय नौसेनेची रणनीती होती. ‘रियल अँफिबियस लँडिंग’ (समुद्रमार्गे भूमीवर सैन्‍य उतरवणे) हेही एक विशेष उद्दिष्‍ट होते. श्रीलंकामार्गे पश्‍चिम पाकिस्‍तानकडे जाणार्‍या पाकच्‍या व्‍यापारी आणि सैनिकी जहाजांवर आक्रमण करण्‍यासाठी त्‍या देशाच्‍या सामुद्रिक सज्‍जतेविषयी महत्त्वाची माहिती भारतीय नौसेनेला पुरवणे, हेसुद्धा भारतीय नौसेनेचेच उत्तरदायित्‍व होते. जुन्‍या युद्धनौका ‘आय.एन्.एस्. मगर’, ‘आय.एन्.एस्. गुलदार’ आणि ‘आय.एन्.एस्. घडियाल’ या सज्‍ज करण्‍यात आल्‍या. सामुद्रिक आक्रमणांकरता ‘जनरल सपोर्ट ड्युटी’ (साहाय्‍यभूत) असे त्‍यांचे कार्य होते. पश्‍चिम पाकिस्‍तानी बंदरे कराची आणि ग्‍वादर ही उध्‍वस्‍त करणे, हे उद्दिष्‍ट होते.

अधिकाधिक पाकिस्‍तानी युद्धनौका उध्‍वस्‍त करणे किंवा त्‍यांना आहे त्‍या ठिकाणीच जखडून ठेवणे, हे पश्‍चिमी नौसेना कमांडचे मुख्‍य उद्दिष्‍ट होते. ते साध्‍य करण्‍याने भारतीय व्‍यापारी जहाजांच्‍या मार्गांवरील दळणवळण सुकर होणार होते आणि भारतीय भूभागांवर बाँबची आक्रमणे करण्‍यापासून पाकिस्‍तानी जहाजांना परावृत्त करणे शक्‍य होणार होते. यासाठी त्‍यांच्‍या शोधार्थ कराची बंदराकडे आगेकूच करणे आवश्‍यक होते. ही आगेकूच करतांना भारतीय नौसेनेची जहाजे शत्रूच्‍या टेहळणी फैरींच्‍या कक्षेमध्‍ये येणार होती. त्‍याचा अर्थ जोखीम अपरिहार्य होती. हीच खरी नौदलाची कसोटी होती. भारतीय नौदलाचे तरुण धाडसी अधिकारी ही जोखीम घेण्‍यास उत्‍सुक आणि तत्‍परही होते.

या रणनीतीची दुसरीही बाजू होती. ती म्‍हणजे कराची बंदरावर आक्रमण करणे आणि तो करतांना ग्‍वादर अन् पासनी या बंदरांवर बाँबद्वारे आक्रमणे करून समुद्रकिनार्‍यावर दहशत पसरवणे. पाकची जनता, सरकार आणि सेनादले यांचा आत्‍मविश्‍वास नष्‍ट करणे, हे त्‍यामागील प्रमुख कारण होते. कराची बंदराच्‍या नाकेबंदीतून पाकची परदेशातून येणारी रसद थांबवणे शक्‍य होते. पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा तोडल्‍याने कराची बंदराची नाकेबंदी सफल होणार होती.

पाकने कराची बंदराच्‍या रक्षणाची चोख व्‍यवस्‍था केली होती. भारतीय नौसेनेने त्‍यांच्‍या कक्षेबाहेर समुद्रात खोलवर पाणबुड्या तैनात केल्‍या होत्‍या. कराची बंदराकडे जाणारी व्‍यापारी जहाजे बुडवायचे ठरवले होते. याच कालावधीत एप्रिल १९७१ मध्‍ये एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय झाला होता. पूर्व बंगालमध्‍ये पाकने सैन्‍य विरोधी कारवायात गुंतलेल्‍या मुक्‍ती वाहिनीच्‍या गटांना सीमेलगत पुरेसे पाठबळ द्यायचे निश्‍चित केले होते.  मुक्‍ती वाहिनीच्‍या कार्यकर्त्‍यांना लष्‍करी प्रशिक्षण देणे आणि त्‍यांच्‍याकडून चितगाव बंदराजवळची वीज निर्मिती केंद्रे अन् दळणवळण यंत्रणा नेस्‍तनाबूत करण्‍यासाठी पावले उचलली जात होती.

(क्रमशः)

भाग ४. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/861046.html