खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी सीबीआय अमेरिकेला विनंती करणार
नवी देहली – बोफोर्स प्रकरण पुन्हा उघडले जाऊ शकते. या प्रकरणात अमेरिकेतील खासगी गुप्तहेर मायकेल हर्शमन याच्याकडून माहिती मागण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) लवकरच अमेरिकेला न्यायालयीन विनंतीपत्र पाठणार आहे. हर्शमन यांनी वर्ष १९८७ च्या ६४ कोटी रुपयांच्या (आताच्या सुमारे १ सहस्र कोटी रुपयांच्या) बोफोर्स लाचखोरी घोटाळ्याची महत्त्वाची माहिती भारतीय यंत्रणांना देण्याची सिद्धता दर्शवली होती.
१. तत्कालीन राजीव गांधी सरकारच्या काळात हॉवित्जर तोफांसाठी स्विडिश आस्थापन असणार्या बोफोर्ससमवेत झालेल्या १ सहस्र ४३७ कोटी रुपयांच्या करारात लाच घेतल्याचा आरोप होता.
२. देहली उच्च न्यायालयाने वर्ष २००४ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्दोष मुक्तता केली होती. एका वर्षानंतर न्यायालयाने या प्रकरणातील हिंदुजा बंधूंसह उर्वरित आरोपींवरील सर्व आरोप मागे घेतले. कथित मध्यस्थ ओट्टावियो क्वात्रोची याचीही न्यायालयाने वर्ष २०११ मध्ये निर्दोष मुक्तता केली होती.
३. अधिकार्यांनी सांगितले की, विनंतीपत्र पाठवण्याची प्रक्रिया यावर्षी ऑक्टोबरमध्ये चालू झाली आहे. या प्रक्रियेस सुमारे ९० दिवस लागू शकतात. प्रकरणाच्या तपासासाठी माहिती मिळवणे हा त्याचा उद्देश आहे.