साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्यात कोणते पालट जाणवतात ?’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात झालेले संभाषण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ उपस्थित होते, तसेच अन्य साधकही होते. सत्संगात आलेल्या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. साधनेचा आढावा घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे ‘सौ. सुप्रियाताईंनी स्वतःमध्ये कोणते पालट केले ?’ आणि ‘साधकांना सुप्रियाताईंमध्ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी या सत्संगात चर्चा झाली. त्या वेळी झालेले संभाषण येथे दिले आहे.  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘साधक पुढे कसे जातील ?’, या दृष्टीने चिंतन अल्प होत असून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामुळे आध्यात्मिक आणि समष्टी स्तरांवरील दृष्टीकोन समजले’, असे सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे 

सौ. सुप्रिया माथूर

सौ. सुप्रिया माथूर : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे सत्संग (टीप १) घेतांना साधकांना पुढे नेण्याच्या दृष्टीने विचार करायला मी पुष्कळ न्यून पडते. आपल्याला (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना) अपेक्षित असा साधकांचा विचार करणे मी वाढवायला पाहिजे. माझ्याकडून ‘साधक पुढे कसे जातील ?’, या दृष्टीने चिंतन आणि प्रयत्न अल्प प्रमाणात होतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामुळे पुढच्या टप्प्याचे विचार, तसेच आध्यात्मिक आणि समष्टी स्तरांवर काय दृष्टीकोन असतात ?’, हे मला लक्षात येत आहे.

पूर्वी माझी विचारप्रक्रिया अशी असायची, ‘साधकाला आवश्यक ते सर्व सांगितले आहे, म्हणजे माझ्या स्तरावरचे प्रयत्न झाले आहेत.’ त्यानंतर माझ्याकडून समोरच्या परिस्थितीला दोष देणे व्हायचे; पण श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितल्यावर माझी स्वतःकडे बघण्याची दृष्टी पालटली.

(टीप १ : साधक करत असलेल्या नामजप, प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न, कृतज्ञताभाव, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, या सूत्रांविषयी जाणून घेणे अन् साधकांना त्या संदर्भात साधनेची पुढील दिशा देणे)

२. ‘साधकांना आढाव्याचा ताण न येता त्यांना साधनेचा प्रयत्न करण्यास उत्साह मिळायला पाहिजे’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितल्यावर त्या दृष्टीने प्रयत्न होऊ लागणे   

सौ. सुप्रिया माथूर : काही साधकांना आढाव्यांचा ताण येतो किंवा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचा ताण येतो. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘साधकांना आढाव्यामधून आनंद आणि साधनेचे प्रयत्न करण्यासाठी उत्साह मिळायला पाहिजे. आपण असा आदर्श आढावा घ्यायला हवा की, आढाव्यातून साधकाला प्रगतीसाठी दिशा मिळेल. आनंद मिळेल आणि कृतज्ञताही वाटेल ! आपण आपले अंतरंग असे बनवायला पाहिजे आणि समोरच्या साधकाला असे हाताळायला पाहिजे की, त्याला त्यातून आनंदच मिळेल.’’ ‘प्रत्येक साधकाविषयी त्या त्या टप्प्याला कसा विचार करायला हवा ?’, अशा दृष्टीने माझे सध्या प्रयत्न चालू आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : पूर्वी मीसुद्धा असे आढावे घेत होतो. तेव्हा मलाही जाणवायचे, ‘साधकांना आढाव्यातून आनंद मिळायला पाहिजे.’ मी घेतलेल्या आढाव्यानंतर साधक बाहेर जायचे. तेव्हा अन्य साधक त्यांना म्हणायचे, ‘‘तुमचा व्यष्टी साधनेचा आढावा होता ना ! सगळे हसतमुख चेहर्‍याने कसे बाहेर येत आहेत !’’ तेव्हा साधक सांगायचे, ‘‘आम्हाला आढाव्यातून पुष्कळ आनंद मिळतो आणि शिकायलाही मिळते. आढाव्याला येणार्‍या काही साधकांनी नंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीही गाठली.     (क्रमश:)

(सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगातील संभाषण)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856243.html