उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेली २७ वर्षे राजकारणात आहेत. तत्पूर्वी त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ राजकारणात होते. साध्वी उमा भारती अनेक वर्षे राजकारणात आहेत. साध्वी निरंजन ज्योती केंद्रीय राज्यमंत्री होत्या. भारतीय राजकारणात असे साधू आणि संन्यासी अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही धर्माचा धर्मगुरु, संत, महंत, इमाम, पाद्री, भंते (बौद्ध भिक्खु) आदी राजकारणात येऊ शकतात. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की, ‘अशांनी राजकारणात न येता त्यांच्या धर्माचे कार्य करावे’, तर ते राज्यघटनेच्या विरोधातील विधान असेल. योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले गेलात, तर कापले जाल), या विधानामुळे देशातच नाही, तर संपूर्ण जगातील हिंदूंना एकीचा संदेश मिळाला आहे आणि त्याचा परिणाम हिंदुविरोधी राजकीय पक्षांना पराभवात दिसू लागला आहे. यामुळे ते चवताळले आहेत आणि या घोषणेवर टीका करत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रसारसभेत अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमान करणारी टीका केली. संतांविषयी कसे बोलावे, हेही ८२ वर्षीय खर्गे विसरले. यातून काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचा किती त्रास होत आहे, हे लक्षात येते. खर्गे यांनी थेट योगींना राजकारण सोडून देऊन संन्यस्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. भारतीय धर्मशास्त्रानुसार खर्गे यांचे वय पहाता त्यांनी काही वर्षांपासून संन्यास घेणे अपेक्षित असतांना ते आजही सत्तेसाठी दारोदार जाऊन मतांची भीक मागत फिरत आहेत. ‘काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद नावाला मिरवणारे खर्गे हे गांधी परिवाराचे दासच आहेत’, असे जनता म्हणत असते. ‘गांधी परिवार सांगेल, तसे सांगकाम्याप्रमाणे ते वागतात आणि बोलतात’, असेच जनतेला दिसत आहे. एका संतांवर, महंतांवर, संन्याशावर बोलावे, अशी त्यांची पात्रता तरी आहे का ? ‘केवळ वय वाढले, म्हणजे शहाणपण येते, असे नाही’, हे खर्गे यांच्या बोलण्यातून लक्षात येते. त्यांचे बोलवते धनी कोण आहेत, हेही जनतेला ठाऊक आहे. काँग्रेसचा इतिहासच हिंदु, धर्म, देवता, संत यांचा द्वेष करणारा आहे. देशातून मोगल आणि इंग्रज यांची सत्ता गेल्यानंतर देशात त्यांचेच वारस म्हणून काँग्रेसने ६० हून अधिक वर्षे सत्ता राबवली आणि हिंदूंचे खच्चीकरण केले. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसमुळेच देशाची आणखी शकले होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा काँग्रेसपासून देशाला वाचवण्याचे कार्य उडाणटप्पू आणि गुंड राजकारणी नाही, तर हिंदूंचे खरे (भोंदू नव्हेत) संत, महंत करू शकतात, हे योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने हिंदूंना दिसू लागले आहे. असुरांना सुरांची भीती वाटते, तशी काँग्रेसींना योगी यांची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते त्यांना राजकारणातून संन्यास घेण्याचा सल्ला देत आहेत; मात्र ‘काँग्रेसला इतिहास जमा करत देश काँग्रेसमुक्त झाल्याविना संत थांबू शकत नाहीत’, अशीच आजची स्थिती आहे. हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसला संपवण्याच्या स्थितीला पर्याय नाही, हे खर्गे यांचे विधान पुन्हा अधोरेखित करते.
राजकारण म्हणजे गजकरण !
भारताने वर्ष १९५० मध्ये लोकशाही व्यवस्था स्वीकारून त्यानुसार राज्यघटना निर्माण केली. या व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष शासन चालवण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंचा भारत धर्मविहीन झाला आणि ‘हिंदु धर्माचा विरोध म्हणजे खरी धर्मनिरपेक्षता’, असा अर्थ काँग्रेसने देशात रूढ केला आणि देशातील धर्मापासून दूर गेलेल्या हिंदूंनी मेंढरासारखे ते स्वीकारले अन् गेली ७८ वर्षे ते कापले जात आहेत. योगी आदित्यनाथ हेच आज सांगत आहेत, ‘जातीजातींमध्ये विभागले जाल, तर कापले जाल, त्यामुळे विभागू नका.’ काँग्रेसने हिंदूंना त्यांच्या धर्मापासून दूर नेले आणि त्यांचे मन अन् बुद्धी यांत धर्माविरोधी विचार पेरले. आज त्याची जाणीव हिंदूंना होऊ लागली आहे आणि ते पुन्हा हिंदु म्हणून संघटित होऊ लागले आहेत. यामुळेच हिंदूंमध्ये फूट पाडून सत्ता मिळवणार्यांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी स्पष्ट सांगितले आहे, ‘उडाणटप्पू आणि गुंड हेच केवळ राजकारणात येऊ शकतात, असे कुठेही लिहिलेले नाही’, तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी भगवा फडकवून देशाला संघटित केले’, असेही त्यांनी सांगितले. यातून भगवा रंग सनातन धर्माचा रंग आहे आणि त्या रंगाचे पालन करणारे राजकारणात येत असतील अन् देशाला त्याचे पुनर्वैभव मिळवून देत असतील, तर ते योग्य, तसेच आवश्यक आहे. त्यांचा द्वेष करणार्यांच्या पोटात त्यामुळे गोळा येणेही स्वाभाविक आहे. देशात आज भ्रष्टाचार, आतंकवाद, विविध जिहाद, घुसखोरी, हिंदूंचे अल्पसंख्यांक होणे आदी समस्यांमुळे देश संकटात आहे. पंतप्रधान मोदी देशाचा विकास करत आहेत. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. हे सर्व ठीक असले, तरी देशातील हिंदु, त्यांचा धर्म सुरक्षित असेल, तर याला अर्थ आहे. जर हिंदु नष्ट वा असुरक्षित झाले, तर भारताची स्थिती अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यासारखी होईल. त्यामुळे आज देशात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे भगवे धारण केलेले संन्यासी, संत, त्यागी यांची आवश्यकता आहे. त्यांच्यासारखे निष्काम संन्यासी प्रत्येक राज्यात सरकारमध्ये असतील किंवा त्यांच्या हातात सत्ता असेल, तर देशाचे, हिंदु धर्माचे चित्र कसे असेल, याची कल्पना करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा हाती धरून ५ पातशाह्यांना बुडवून शिवशाही स्थापन केली, तेच कार्य ‘राजकारणाचे भगवेकरण करून’ करणे आवश्यक आहे. त्याविना राजकारणाचे शुद्धीकरण होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘राजकारण म्हणजे गजकरण’, असे म्हटले होते. आताची स्थिती पहाता जनतेच्या दृष्टीने राजकारण गजकरणाच्याही पुढच्या टप्प्याला गेले आहे. ही घाण स्वच्छ करण्यासाठी राजकारणाचे भगवेकरण करणे आवश्यक आहे.
हिंदूंनी धर्माचरण करावे !
राजकारणाचे भगवेकरण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण, साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. मुसलमान दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतात, रमझानच्या मासामध्ये कडक उपवास करतात, धर्मासाठी प्राणत्याग करण्याची सिद्धता ठेवतात. त्या तुलनेत किती हिंदु धर्माचरण करतात आणि धर्माचा अभिमान बाळगून धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे कार्य करण्याची इच्छा बाळगतात ? हा प्रश्न आहे. त्यामुळे हिंदूंचे आध्यात्मिकीकरण होणे आवश्यक आहे. जनता साधना करणारी असेल, तर ती धर्माचरणी आणि सात्त्विक व्यक्तीलाच सत्तेवर बसवेल. याच जनतेतून धर्माचरणी लोकच पुढे राजकारणात येतील आणि हीच आजची आवश्यकता आहे.
‘राजकारणाचे भगवेकरण करण्यासाठी खर्या संतांनी राजकारणाची धुरा वहावी’, असे हिंदूंना वाटत असेल, तर ते चुकीचे ठरू नये ! |