नवी देहली – न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर या दिवशी निवृत्त झाले.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिन्यांचा असेल. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ या दिवशी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती खन्ना यांनी ६५ निवाडे लिहिले आहेत. या कालावधीत ते अनुमाने २७५ खंडपिठांचे सदस्य होते.
न्यायमूर्ती संजीव यांचे काका न्यायमूर्ती हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते; मात्र ज्येष्ठ असूनही इंदिरा सरकारच्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे त्यांना सरन्यायाधीश बनण्यात आले नाही. त्यांच्या जागी न्यायमूर्ती मिर्झा हमीदुल्ला बेग (एम्.एच्. बेग) यांना सरन्यायाधीश बनवण्यात आले. (यातून काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात विरोधकांवर सूड उगवल्याचे स्पष्ट होते. यातून त्या लोकशाहीला जुमानत नव्हत्या, हे दिसून येते ! – संपादक) याच्या निषेधार्थ न्यायमूर्ती हंसराज खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचे त्यागपत्र दिले होते.