मनुष्य बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था यांपैकी कुठल्याही अवस्थेत असला, तरी संग्रह करण्याची त्याची सवय पुष्कळ जुन्या काळापासून आहे. बालपणामध्ये खेळणी जमवण्याचा छंद जोपासला जातो. तारुण्यात आल्यावर धन-संपत्ती जमवण्याची धडपड चालू असते, तर म्हातारपणी अनेक आजारांनी पिच्छा पुरवल्यामुळे वेगवेगळ्या औषधांचा संग्रह जवळ बाळगावा लागतो. संग्रह करण्याची ही कृती एका पिढीनंतर दुसरी पिढी सतत चालूच ठेवते. मनुष्याची संग्रह वृत्तीपासून सुटका नाही. अनेकांना वस्तूंचा अनावश्यक संग्रह करण्याची सवय असते.
आज आपण पहातो आणि वेगवेगळ्या बातम्याही ऐकतो की, बाजारातून कांदा-बटाटा गायब झाला, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे इत्यादी. आता तिसर्या महायुद्धाची नांदी चालू झाली आहे. आपत्काळ चालू झाला आहे. अशा वेळेला काही अत्यावश्यक गोष्टींचा संग्रह करून ठेवणे आवश्यक आहे; परंतु त्या वस्तूंचा आवश्यक तितकाच संग्रह करायला हवा.
या जगात रहायचे आहे, कार्य करायचे आहे, तर त्यासाठी संग्रह करावाच लागणार; परंतु किती संग्रह करावा ? याचा थोडा तारतम्याने विचारही केला पाहिजे. बाजारात एखाद्या आस्थापनाने एखाद्या वस्तूचा मोठ्या प्रमाणात साठा करून गोदामात साठवून ठेवला, तर बाजारात त्या वस्तूचा तुटवडा निर्माण होतो. लोकांची त्या वस्तूची मागणी वाढते. मागणी वाढल्यावर ज्याच्याकडे त्या वस्तूचा साठा आहे, तो मन मानेल, ती किंमत लावून ती वस्तू विकतो. असे होणे अपेक्षित नाही. अतीसंग्रहाने अनागोंदी माजून समाजात क्रोधाची भावना वाढून संग्रह करणार्याला लुटून त्याचा नाश करण्यापर्यंत लोकांची मजल जाते.
अनेक लोक सोने, दागिने यांचा मोठ्या प्रमाणात संग्रह करतात. या संग्रहासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वेळ अन् ऊर्जा खर्चही होत असते; परंतु त्या संग्रहाचा उपयोग इथे आहे, तोपर्यंतच पुष्कळ अल्प प्रमाणात होतो. कधी तरी सणासुदीला त्या सोने-दागिन्यांचा थोड्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे त्यापासून मिळणारे सुख आणि आनंदही अल्पच असतो. दागदागिन्यांची चोरी होण्याची भीतीही असते. यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक गुंतवणूक अनाठायीच म्हणावी लागेल. सोने-दागिन्यांसह कुठलाही संग्रह आपल्या चालू जीवनापुरताच उपयोगाचा असतो. त्याचा आपल्या मृत्यूनंतर कोण, किती, कसा आणि केव्हा वापर करील ? हे आता सांगता येत नाही. त्यामुळे कोणत्याही वस्तूंचा संग्रह, म्हणजे मोहपाशात अडकणेच होय. आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश भगवत्प्राप्ती आहे, त्यासाठी या संग्रहाचा काहीच उपयोग नाही. भगवत्प्राप्तीसाठी मात्र केवळ नामसंग्रहाचाच उपयोग होतो !
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.