चिंचवड (पुणे) येथे शिवचैतन्य जागरण यात्रा आणि भव्य संत संमेलन !
चिंचवड (जिल्हा पुणे) – देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागेल. आगामी काळात सावध रहात हिंदु संस्कृतीवर घाला घालणार्या फुटीरतावादी आणि संस्कृतीविरोधी शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. त्यांच्या शिवचैतन्य जागरण यात्रेमध्ये संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघ पिंपरी-चिंचवड आयोजित संतसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या आरंभी शंखनाद आणि मातृशक्तीने औक्षण करून महाराजांचे स्वागत केले. संत संमेलनाला साधू-संतांबरोबरच विविध मठ आणि मंदिरे यांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित संमेलनाला व्यासपिठावर मोरया गोसावी मंदिराचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त श्री उमाप, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे मुख्य विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे आदी उपस्थित होते. मठ, मंदिरे आणि आश्रम ही हिंदु समाजाची ऊर्जास्थाने असल्याची भूमिका प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मांडली.
हिंदु टिकला, तर राज्यघटना टिकेल !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. हिंदवी स्वराज्यात शास्त्र, साधू, संत, तीर्थस्थाने, तीर्थयात्रा या सर्वांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनाचे कार्य झाले. आज राज्यघटनेच्या रक्षणासाठी संस्कृतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हिंदु टिकला, तर राज्यघटना टिकेल. त्यामुळे संविधान आणि धर्म यांच्या रक्षणासाठी १०० टक्के मतदान व्हायलाच हवे. १०० टक्के मतदान आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणातून आपला देश जगात सर्वश्रेष्ठ बनवूया.’’