नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

पादुकांचे पूजन करतांना श्री. माधव बारसोडे आणि पुरोहित श्री. मधुकर कुलकर्णी

नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सातवा पुण्यतिथी उत्सव ४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत श्री. माधव मामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकावर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत पादुका पूजन आणि आरती झाली. श्री. मधुकर पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

प.पू. काणे महाराजांच्या पादुका

सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी प.पू. भक्तराज महाराज, प.पू. काणे महाराज यांचे भक्त आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराजांचे पुत्र श्री. सुनील कसरेकर आणि श्री. रवींद्र कसरेकर यांची उपस्थिती लाभली. शेवटी प.पू.काणे महाराजांचा सहवास लाभलेले श्री. रामचंद्र देशपांडे आणि श्री. प्रमोद बेहरे यांनी सर्व उपस्थितांना नाम घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

समाधीस्थळी पूजन करतांना श्री. माधव बारसोडे

विशेष अनुभूती

पवमान आणि रुद्राभिषेक झाल्यावर उजव्या पादुकावर वाहिलेले झेंडूचे फुल पादुकांवरून खाली पडले. ‘सूक्ष्मातून शशिकांत ठुसे काका (प.पू. भक्तराज महाराज यांचे दिवंगत भक्त) सर्व पूजाविधी पाहून आनंदी आहेत’, असे जाणवत होते. – श्री. राहुल दवंडे आणि पुरोहित श्री. मधुकर कुलकर्णी