Concluding Day – The Jaipur Dialogues : ‘सनातन हिंदु संकल्प पत्रा’चा प्रस्ताव प्रसिद्ध !

  • ‘जयपूर डायलॉग्ज’चा अंतिम दिवस

  • राजकारण, राष्ट्रवाद, अंतर्गत सुरक्षा आणि हिंदुत्व या सूत्रांवरील चर्चेने कार्यक्रमाचा समारोप !

जयपूर (राजस्थान) : कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारांची वेगवेगळी मते असू शकतात; पण देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. शत्रूबोध करून घेऊन देशद्रोही ओळखावे लागतील आणि घुसखोरांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. तीन दिवसांच्या ‘द जयपूर डायलॉग्ज’कडून आयोजित ‘रिक्लेमिंग भारत’ कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी देश-विदेशातील तज्ञ, साहित्यिक आणि विचारवंत यांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना वरील उत्तरांद्वारे दिशादर्शन केले.

कार्यक्रमाला संबोधित करतांना डावीकडून मेजर जनरल (निवृत्त) राजीव नारायणन् आणि आदि अचिंत

‘जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांनी ‘जयपूर सनातन’च्या घोषणापत्राचे प्रकाशन केले. सनातन धर्म हा राष्ट्रवाद असल्याचे सांगून सनातन हिंदूंच्या भौगोलिक सीमा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे दायित्व भारताने पार पाडण्याचा निर्धार या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ‘जयपूर जाहीरनामा’ आणि ठराव पत्राला मान्यता दिली.

चर्चासत्र : स्वावलंबी भारतासमोरील आव्हाने !

भू-राजकारण (‘जिओ पॉलिटिक्स), भू-अर्थशास्त्र (जिओ इकॉनॉमिक्स) आणि भू-व्यूहरचना (जिओ स्ट्रॅटेजी)’ या चर्चासत्रात विजय सरदाना म्हणाले की, आमची सौदेबाजीची शक्ती अत्यंत कमकुवत आहे. त्यासाठी आम्हाला शक्तीशाली कायदे करण्याची आवश्यकता आहे. याचे कारण भारताची बाजारपेठ मोठी आहे, हा १४५ कोटी नागरिकांचा देश आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्याला आपली अंतर्गत व्यवस्था सुधारावी लागेल आणि आत्मपरीक्षण करावे लागेल.

प्रसिद्ध विचारवंत अंकित शहा म्हणाले की, आपण आपल्या प्राचीन भारताची आठवण ठेवली पाहिजे. भू-राजकारण आणि भू-अर्थशास्त्र इतिहासातून शिकले पाहिजे. यामध्ये जीवनाचे उद्देश आणि प्रयत्न कथन केलेले आहे.

वर्ष २०१४ सारखे हिंदूंनी पुढील ९९ विजय साजरे करायचे आहेत !

‘वर्ष २०२९ चे राजकारण’ या विषयावर बोलतांना युवा पत्रकार अनुपम सिंह, तुहीन सिन्हा, ओंकार चौधरी, शंतनू गुप्ता आणि हर्षवर्धन त्रिपाठी म्हणाले की, वर्ष २०२९ चे राजकारण २०१४ पेक्षा चांगले असेल. काँग्रेस पिछाडीवर आहे. वर्ष २०१४ सारखे हिंदूंनी पुढील ९९ विजय साजरे करायचे आहेत. इंडी आघाडी म्हणजे भ्रष्ट विचारसरणी आणि जातीच्या आधारे फूट पाडण्याचा न संपणारा प्रयत्न आहे. वर्ष २०३४ पर्यंत या देशात काँग्रेसला एकही जागा असता कामा नये. वर्ष १९८४ पासून काँग्रेस सतत नाकारली जात आहे आणि त्यानंतरची सरकारे कशी चालली ?, हे सर्वांना पाहिले आहे. आताच्या स्थिर सरकाराविषयी विरोधकांमध्ये मोठी चिंता आहे. त्यामुळे विविध कथानके रचून देशाला कमकुवत करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

गेली ७६ वर्षे साम्यवाद्यांनी देशाला वाळवीसारखे पोखरले ! : ‘हिंदुत्व विरुद्ध इस्लाम’ या चर्चासत्रातील मत

कार्यक्रमाला संबोधित करतांना डावीकडून अभिजित चावडा, अभिजित अय्यर मित्रा आणि सुशांत सरीन

सायंकाळच्या सत्रात ‘हिंदुत्व विरुद्ध इस्लाम’ या विषयावर नसीर अहमद शेख, आभास मालधयार, नीरज अत्री, नाझिया इलाही खान, कार्तिक गौर आणि ओमेंद्र रत्नू यांनीही परखडपणे त्यांची मते मांडली. ‘साम्यवादी आणि भारतीय मूल्य प्रणाली’ या विषयावर डॉ. सच्चिदानंद शेवडेे म्हणाले की, साम्यवादी अतिशय हुशार असतात. ते काश्मीरमध्ये इस्लामविषयी बोलत नाहीत, तर देशातील इतर राज्यांमध्ये हिंदूंविरुद्ध बोलतात. हिंदू आणि त्यांच्या देवता यांच्यावर ते टीका करतात. गेली ७६ वर्षे त्यांनी देशाला वाळवीसारखे पोखरले; पण आता काळ पालटत आहे.

संदीप बालकृष्णन् म्हणाले की, साम्यवाद्यांनी समाजाला दोन भागांत विभागले आहे. चित्रपट, नाटक, साहित्य, विज्ञान, शिक्षण, कुटुंब इत्यादी सर्व गोष्टी त्यांच्या विचारसरणीनुसार ठरल्या आहेत; ते स्वबळावर निवडणुका जिंकू शकत नाहीत. त्यांना डावे न म्हणता ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) म्हणायला हवे.

अभिजीत चावडा म्हणाले की, पाकिस्तानात ‘आय.एस्.आय.’सारख्या अनेक संघटना कार्यरत आहेत. पाकिस्तानचे तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध नाहीत. या देशांनी अमली पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून त्यांचीअर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. असे करूनही ते अपयशी ठरले आहेत.

अभिजित अय्यर मित्रा म्हणाले की, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण हे देश आर्थिक तस्करी अन् आतंकवाद यांत गुंतलेले आहेत; मात्र तिन्ही देशांत विकास नाही.


हे ही वाचा →

Day 2 Of ‘The Jaipur Dialogues’ : जागतिक पातळीवर भारताला मागे ढकलण्याचे षड्यंत्र !
संपादकीय → ‘रिक्लेमिंग भारत’ अत्यावश्यक !