श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्ताने…
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने स्वामी समर्थ्यांची १४७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १३ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला सुप्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. यामध्ये अनेक मान्यवरांची संगीतसेवा, प्रवचन सेवा, भक्ती संगीत सेवा आणि कीर्तनसेवा होणार आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम देवस्थानातील कै. कल्याणराव उपाख्य बाळासाहेब इंगळे सभा मंडपातील व्यासपिठावर संपन्न होतील.
२७ एप्रिल या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत गोपाळकाला होऊन पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल, अशीही माहिती महेश इंगळे यांनी दिली.
या वेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, मनोज जाधव, मनोहर देगांवकर, संजय पवार, श्रीशैल गवंडी, संतोष पराणे, दत्तात्रय नाडगौडा, विपूल जाधव, दीपक जरीपटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यतिथी दिवशीचे कार्यक्रम

२६ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. त्या दिवशी पहाटे २ ते ४ प्रभातफेरी, पहाटे ४ ते ५ नामस्मरण, पहाटे ५ वा. काकड आरती, यानंतर श्रींचे दर्शन, ११ वाजता महानैवेद्य आरती, दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याचा महानैवेद्य श्रींना अर्पण होईल. दुपारी १२ ते ४ महाप्रसाद आणि प्रसाद वाटप होईल. दुपारी २ ते ४ या वेळेत स्वामी भक्त सुहास पाटील यांच्या श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ महाद्वार कोल्हापूर यांची भजनसेवा संपन्न होईल. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत अक्कलकोट शहरातून श्रींचा सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल.