एस्.टी. बसस्थानके आणि बसगाड्या यांचे आधुनिकीकरण करणार ! – परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर एस्.टी.च्या भूमी विकसित करण्यात येणार आहेत, तसेच बसस्थानके अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले, ‘‘राज्यात ८४२ ठिकाणी एस्.टी. महामंडळाची १ सहस्र ३६० हेक्टर भूमी आहे. या भूमीचे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण, अशा असे ३ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रारंभी ६६ जागांच्या आधुनिकीकरणासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. विकासकांद्वारे जिल्हा, तालुका आणि ग्रामीण या ३ स्तरांवर जागा विकसित करून घेण्यात येणार आहेत. या धोरणामुळे एस्.टी.च्या अविकसित जागाही चांगल्या विकासकांकडून विकसित होण्यास साहाय्य होईल.’’

एस्.टी. महामंडळात २ सहस्र ६४० नवीन गाड्या येणार !

सध्या एस्.टी. महामंडळाच्या सर्व जुन्या बस मोडीत काढण्यात येणार आहेत. नवीन २ सहस्र ६४० गाड्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान गाड्या घेतल्या जातील, असेही परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

नवीन बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार !

‘महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये आपत्कालीन ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकांवर आणि नवीन बसगाड्यांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यासह सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे’, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एस्.टी. कर्मचार्‍यांचे वेतन दरमहा ७ तारखेपर्यंत होईल !

‘आर्थिक अडचणींमुळे एस्.टी कर्मचार्‍यांचे मार्च महिन्याचे पूर्ण वेतन देता आले नाही. कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्यांच्या अधिकार्‍यांना भेटून विनंती करीन. यापुढे एस्.टी. कर्मचार्‍यांचे वेतन दरमहा ७ तारखेला त्यांच्या अधिकोषाच्या खात्यात जमा करण्यात येईल’, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.