आय.एम्.ए.चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्.एम्.सी.च्या माजी अध्यक्षांचा आक्षेप !
पुणे – तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी एम्.एम्.सी.चे (महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे) प्रशासक डॉ. विंकी रूघवानी यांनी दीनानाथ रुग्णालयाला नोटीस बजावली होती. रुग्णालयाने नोटिसीला दिलेल्या प्रतिसादानंतर डॉ. रूघवानी यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांना वैद्यकीय उपचारांतील निष्काळजीपणा झाल्यामुळे नोटीस बजावली आहे आणि उत्तर देण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी दिला आहे. १५ एप्रिलला होणार्या सुनावणीसाठी डॉ. घैसास यांना एम्.एम्.सी. कार्यालयात बोलावण्यात येईल, असे डॉ. रूघवानी यांनी सांगितले.
या विषयी आय.एम्.ए.चे (इंडियन मेडिकल कौन्सिलचे) अध्यक्ष डॉ. दीलीप भानुशाली म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. रुग्णाकडून आगाऊ पैशांची मागणी करणे, हे रुग्णालयाचे धोरण असते. त्यासाठी रुग्णालयाकडे विचारणा करायला हवी. आधुनिक वैद्याला उत्तरदायी धरून नोटीस देता येणार नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तरे म्हणाले की, रुग्णाच्या उपचारात केलेला निष्काळजीपणा किंवा रुग्णाच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्याविरोधात केलेली तक्रार या प्रसंगी एम्.एम्.सी. संबंधित आधुनिक वैद्याला नोटीस बजावू शकते; पण भिसे प्रकरणी वैद्याने रुग्णावर उपचारच केलेले नाहीत. त्यामुळे डॉ. घैसास यांना पाठवलेली नोटीस योग्य नाही.