नागपूर शिक्षण उपसंचालकांनंतर ४ जण अटकेत !

  • बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळा प्रकरण

  • सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

उल्हास नरड

नागपूर – नागपूर शिक्षण विभागातील बनावट ‘शालार्थ आयडी’च्या माध्यमातून अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना नोकरीत घेऊन सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोली येथे अटक करण्यात आली होती. त्याचसमवेत निलंबित केलेल्या वेतन आणि भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांनाही कह्यात घेण्यात आले आहे. आता या प्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपीक सूरज नाईक यांनाही अटक करण्यात आली आहे.

वर्ष २०१९ पासून नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बनावट प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. अनुमाने ५८० बनावट कर्मचार्‍यांच्या नावे वेतन काढण्यात आले. शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या पडताळणीत हा प्रकार उघडकीस आला. उल्हास नरड यांच्यावर अनुभव नसलेल्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदाची मान्यता दिल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

सरकारची फसवणूक करून शिक्षण क्षेत्र कलंकित करणार्‍यांना आजन्म कारागृहातच डांबायला हवे !